एक माणूस आणि कलाकार म्हणून निरनिराळ्या वाटांवर चालताना भेटलेली कितीएक माणसं.. साधी, अनवट, विक्षिप्त, बुद्धिमान, कलासक्त, ध्येयवेडी, सर्जनशील वगैरे.. त्यांची शब्दचित्रं!

स्थळ : आमची प्राणप्रिय सेंट सेबॅस्टियन गोवन हायस्कूल. वर्ग दुसरीचा. दरवर्षी १३ जूनला शाळा उघडण्याची प्रथा. तर असाच तो १३ जूनचा पावसाळी दिवस. नवीन वर्ष. नवीन वर्ग. नव्या पुस्तकाचा वास. अणकुचीदार टोक काढलेल्या पेन्सिली आणि नव्यानंच बाजारात आलेली ‘मॅग्नेट’ कंपासपेटी अशी सगळी साधनसामग्री घेऊन मी नव्या वर्षांला सामोरा जायला सज्ज झालेला. वर्गशिक्षिका कोण असतील, रोल नंबर काय असेल, याची उत्सुकता. नुकतीच ‘प्रेअर’ संपवून सगळे स्थानापन्न झालेले. मी तिसरा-चौथा बाक धरून बसलो होतो. माझ्या बाकावर शेजारी एक कापडी दप्तर पडलं होतं. पण दप्तराचा मालक मी वर्गात आल्यापासून काही मला दिसला नव्हता. प्रेअर झाली तरी वर्गात न आलेला हा शूरवीर कोण, याचा विचार करत मी बसलो असतानाच बाई वर्गात आल्या. आमची कॉन्व्हेन्ट शाळा. त्यामुळे आम्हाला ‘बाई’ नसत; ‘टीचर’ असत. शाळेतला बराचसा स्टाफ हा गोवन ख्रिश्चन. ग्रेटा बरेटो नावाच्या स्कर्ट घालणाऱ्या, बॉयकट असलेल्या बाई आम्हाला ‘क्लास टीचर’ म्हणून लाभल्या होत्या. मला त्या वयातही बरेटोबाईंच्या बॉयकटचं विलक्षण कुतूहल वाटत होतं. अलीकडे ‘दंगल’ सिनेमातल्या गीता-बबिता पाहिल्यावर माझ्या डोळ्यांसमोर याच बरेटोबाई लक्ककन् चमकून गेल्या. असो. तर बाई वर्गात आल्या आणि बाईंच्या मागून रजिस्टरचं बाड हातात घेऊन आमच्याच वयाचा; किंबहुना आमच्यापेक्षा थोडा मोठा, थोडा उंच वाटणारा मुलगा आला. त्यानं शाळेचा गणवेश अंगावर चढवला होता. त्या मुलानं ते रजिस्टर बाईंच्या टेबलवर आपटलं आणि तो थेट येऊन माझ्या शेजारी बसला. ‘बेवारस दप्तर’चं रहस्य उलगडलं! बसताना त्यानं माझ्यावर एक कटाक्ष टाकला आणि मग मला न पाहिल्यासारखं करून तो अध्र्यापेक्षा जास्त बाक अडवून पंगतीला बसल्यासारखा मांडी घालून बसला. वर्ग सुरू झाला. बरेटोबाई काय शिकवत होत्या हे आता आठवण्याचा काहीच संबंध नाही. पण वर्ग सुरू होऊन पंधरा-वीस मिनिटं झाली असतानाच माझा तो बाकमित्र माझ्या कानात कुजबुजला, ‘‘मला चार आणे दे, नाहीतर मी टीचरला सांगेन- तू ‘आय लव यू’ बोलला.’’ मी विजेचा झटका बसल्यासारखं त्याच्याकडे वळून पाहिलं. तो बघत फळ्याकडेच होता, पण बोलत माझ्याशी होता.

‘‘काय?’’

‘‘चार आणे दे, नाहीतर तुझं नाव सांगेन टीचरला.’’

‘‘अरे, पण मी असं काहीच बोललो नाही.’’

‘‘चार आणे दे, नाहीतर नाव सांगतो.’’

त्या दिवशी शाळा संपेपर्यंत माझ्या पोटात गोळा. यानं खरंच नाव सांगितलं तर? टीचर आपल्यावर विश्वास ठेवतील की त्यांचं रजिस्टर उचलून आणण्याचा अधिकार असलेल्या या मुलावर? आणि हो.. तो बालपणीचा काळ किती निष्पाप आणि बाळबोध होता पहा. ‘आय लव यू’ बोलणं हेसुद्धा ज्या काळात अपराधांच्या रकान्यात मोडत होतं तो काळ! त्या दिवशी शाळा संपेपर्यंत तो मुलगा मला छळत राहिला. बरं, मधल्या सुट्टीत काहीतरी मांडवली करू म्हटलं तर मधल्या सुट्टीची घंटा झाल्या झाल्या तो मानगुटीवर बसलेला वेताळ मिस्टर इंडियासारखा गायब झाला. तो थेट तास सुरू झाल्यावरच अवतरला. शाळा सुटताना शेवटी मी रडकुंडीला येऊन त्याला सांगितलं, ‘‘माझ्याकडे चार आणे नाहीत आणि मी ‘आय लव यू’ बोललो नाही.’’ तो फक्त हसला आणि ‘आय आम ए डिस्को डॅन्सर’ गाणं म्हणत निघून गेला. मला काहीच कळेना. तो वळला तेव्हा त्याच्या खाकी कापडी दप्तरावर गडद निळ्या शाईत लिहिलेलं नाव पाहिलं- ‘पांडुरंग’!

पांडुरंग आमच्याच शाळेत शिपायाचं काम करणाऱ्या काशीनाथचा मुलगा होता. वयानं पांडुरंग आम्हा सगळ्यांपेक्षा मोठा होता. आम्हा छटाकभर पोरांमध्ये अध्र्या विजारीतून लांबोडके पाय बाहेर काढणारा पांडुरंग उठून दिसायचा. दुसरीचं अख्खं वर्ष पांडुरंग माझ्या शेजारी बसला; पण तो माझा मित्र कधीच झाला नाही. या महामानवासमोर आपण कसे कमकुवत आणि बिनकामाचे आहोत, हाच भाव मनात येई. पळण्याच्या शर्यतीपासून ते ढांगा टाकून जिने चढून जाण्यापर्यंत कुठल्याही खेळात पांडुरंग मला सहज पिदवत असे. शिवाय त्याचं ते विक्रम-वेताळ स्टाईल ब्लॅकमेलिंग वर्षभर सुरूच राहिलं. ‘‘उद्या माझ्यासाठी टोक काढलेली पेन्सिल आण, नाहीतर चड्डीत बेडूक सोडेन,’’ असं तो एकदा म्हणाला असताना मला त्या रात्री झोप लागली नव्हती. दुसऱ्या दिवशी मी निमूट बकासुराला गाडाभर अन्न देणाऱ्या गावकऱ्याप्रमाणे माझी एक टोक काढलेली ‘नटराज’ त्याला भेट केली होती. वर्गातल्या परीक्षेतसुद्धा पांडुरंगाचा तोच अंमल, तीच हुकूमशाही. आपण लिहीत असलेला पेपर पॅडसकट ओढून घेऊन बिनबोभाट त्याची नक्कल तो स्वत:च्या पेपरवर उतरवत असे. पांडुरंगाला तेव्हाही ‘प’ म्हणता यायचा नाही. ‘कॉपी’ला ‘कॉफी’ म्हणायचा. स्वत:चं नावही ‘फांडुरंग’ सांगायचा.

तर या पांडुरंगाच्या दहशतीतच मी दुसरीचं वर्ष काढलं. नाही म्हणायला तो माझ्याशी बरंही वागत असे. आमची चित्रकला म्हणजे काय वर्णावी! एम. एफ. हुसेनला बुचकळ्यात टाकणाऱ्या रेघोटय़ा मी कागदावर ओढत असे. चित्रकलेचा तास हा माझा शाळेतला सगळ्यात नावडता तास. अगदी दहावीपर्यंत! पण माझी दुसरीची चित्रकलेची वही जर उद्या पुरातत्त्व खात्याला सापडलीच, तर त्यात किमान पाच-सहा ठिकाणी मला ‘ए प्लस’ ग्रेड आहे. याचं कारण एकच : माझी आणि कागदाची चाललेली झटापट पाहून माझ्यावर दया येऊन पांडुरंगनंच ती चित्रं मला काढून दिली होती.

पांडुरंग शिपायाचा मुलगा असल्यानं त्याला आमच्या अजस्र शाळेतले बरेच कप्पे-कोनाडे इत्थंभूत ठाऊक होते. बऱ्याचदा पांडुरंग आपलं दप्तर वर्गात ठेवूनच घरी जात असे. दुसऱ्या दिवशी शाळा भरेपर्यंत ते दप्तर तसंच असे. त्याच्यासाठी शाळा हे त्याच्या घराचंच एक्स्टेन्शन होतं. शाळेतली ‘स्टाफरूम’ हा आम्हा सर्वासाठी मोठय़ा अप्रूपाचा विषय होता. ‘स्टाफरूम’ अशी पाटी लावलेल्या त्या खोलीत फ्लॅपच्या त्या पुढे-मागे होणाऱ्या दरवाज्यांच्या आड नेमकं काय आहे? आपले ‘टीचर्स’ तिथे नेमकं काय करतात? याबद्दल आम्हाला कोण उत्सुकता! एकदा मी एका मधल्या सुट्टीत पांडुरंगला तिथून बाहेर पडताना पाहिलं आणि अचानक मला पांडुरंग शत्रूच्या पाणबुडीतून लीलया बाहेर पडणाऱ्या जेम्स बॉन्डसारखा वाटायला लागला. ‘‘मोट्टा सिमींग पूल आहे आतमध्ये. टीचर्स लोक तिथे सिमींग करतात.’’

‘‘आत स्विमिंग पूल आहे?’’

‘‘हो. आणि एक शार्क मासापण आहे.’’ आम्ही पोरं आठ आणे तासावर आणलेल्या सायकलवर जशा आळीपाळीनं राऊंड मारायचो, तसे आपले निष्पाप वाटणारे शिक्षक मधल्या सुट्टीत एका शार्कवर बसून ‘सिमींग पूल’च्या चकरा मारतायत असं चित्र त्यावेळी माझ्या चिमुकल्या बालबुद्धीनं रंगवलं होतं.

शाळेची वर्ष वारं प्यायलेल्या वासरासारखी भराभर पळतात. दुसरी संपली. तिसरी-चौथीही संपली. प्रायमरी संपली. सेकंडरीत गेलो. मी आणि पांडुरंग पुन्हा कधीच कुठल्या वर्गात एकत्र आलो नाही. पण आमच्यापेक्षा पांडुरंगाचं ‘टाइम मशीन’ जास्त वेगानं पळतंय असंच वाटे. सहावीला जाईपर्यंत पांडुरंग त्याच्या बापाच्या उंचीला आला होता. सातवीपासून उंच मुलांना ‘फुल पॅण्टी’ घालायची परवानगी होती. पण पांडुरंगच्या कमरेखाली मला सहावीतच फुल पॅन्ट दिसली. ‘स्टाफ’चा मुलगा म्हणून पांडुरंगला ही सवलत मिळाली असावी बहुधा. त्या फुल पॅन्टनं पांडुरंगला एका फटक्यात आमच्यापासून वेगळं केलं. सहावीच्या वर्षांत आम्ही सगळे सहावीतलेच राहिलो; पण फुल पॅन्टमधला पांडुरंग ‘दहावीतला’ वाटू लागला. एक दिवस मी पांडुरंगला ‘जपानी बागे’च्या मागच्या बाजूला विडी ओढताना पाहिलं आणि तिथे मला खात्रीच पटली, की दैवाच्या कुठल्यातरी चमत्कारानं तेवढय़ाच वर्षांत देवानं पांडुरंगला आमच्यापेक्षा जास्त मोठं केलंय.

सातवीच्या वर्षांच्या सुरुवातीला पांडुरंग ‘असेंब्ली’च्या रांगेत दिसला. पहिल्या युनिट टेस्टला माझ्या मागच्या बाकावरच तो परीक्षेला होता. अचानक दुसरीच्या वर्षांचा फ्लॅशबॅक सुरू झाला. पांडुरंग बाकाखालून लाथा मारू लागला. त्याला अर्थातच ‘कॉफी’ करायची होती. पण आता मी मोठा झालो होतो. मी काही बधलो नाही. पेपर संपल्यावर वर्गाबाहेर बॅगेत पॅड कोंबताना पांडुरंग हसत बाजूला उभा राहिला. ‘‘दाखवायचं ना यार! उद्या दाखव हां, नाहीतर टीचरला सांगेन, तू काऊ लेनमध्ये जातो.’’ मी दचकलोच. काऊ लेन ही आमच्या इथली वेश्यावस्ती होती. खरंतर, ‘म्हणजे नेमकं काय?’ हे मला त्यावेळी नीटसं कळतदेखील नव्हतं. फक्त तिथून जाताना आपल्याला शाळेत सोडणाऱ्या मोठय़ा माणसांच्या चालण्याचा वेग किंचित वाढतो, एवढंच लक्षात आलं होतं. पण ‘काऊ लेन’ म्हणजे काहीतरी वाईट हा समज मनात पक्का बसला होता. पण पांडुरंग मात्र काऊ लेनचं नाव सराईतासारखं घेत होता. माझा सगळा जुना न्यूनगंड डब्यातून फुटून बाहेर आल्यासारखा माझ्या मनात परत भरून गेला.

सातवीच्या वर्षांतल्या दुसऱ्या-तिसऱ्या महिन्यापासूनच पांडुरंग शाळेत दिसेनासा झाला. आणि मग तो पुन्हा कधीच दिसला नाही. त्यानं शाळा सोडली असावी. का? कशामुळे? काहीच कळलं नाही. कळून घ्यावंसं वाटलंही नाही. पुढे आमच्या देदीप्यमान शालेय कारकीर्दीत अनेक नवे मित्र आणि अनेक नवे पराक्रम जोडले गेले. त्यातले अनेक मित्र आजही ‘मित्र’ आहेत. आणि पराक्रमाचं म्हणाल तर ते आत्मचरित्रासाठी राखून ठेवलेत! या सगळ्या गडबडीत पांडुरंग नावाचा तो शिपायाचा मुलगा विसरला गेला.

कट टू.. साल २०१२. मी ‘सुखांशी भांडतो आम्ही’च्या प्रयोगासाठी ठाण्याहून डोंबिवलीला चाललो होतो. त्याकाळी मी बाइक चालवत असे. ठाणे स्टेशनवर बाइक लावून ट्रेननं डोंबिवलीला जायचं, हा माझा शिरस्ता. मी ठाण्याहून ट्रेन पकडली. ट्रेनमध्ये लोकांनी ओळखू नये म्हणून एक टोपी आणि गॉगल मी घातला होता. तोंडावर पुस्तक. अशा बंदोबस्तात मी बसलेलो असतानाच माझ्या मांडीवर थाप पडली. मी पुस्तक खाली घेतलं. एक मिशीवाला किडकिडीत माणूस बत्तीशी दाखवत माझ्याकडे पाहत होता. ‘‘तू तिथे मी? सत्यजीत?’’ मी नम्र हसलो. पुन्हा पुस्तक तोंडावर घेणार इतक्यात तो म्हणाला, ‘‘फांडुरंग.’’ क्षणभर मला काहीच कळलं नाही. पण दुसऱ्याच क्षणी वीज चमकली. मी पुस्तक खाली केलं. ‘‘पांडुरंग? सेंट सबॅस्टियन?’’ त्यानं मान हलवली. ‘‘मैं आपका सीरियल देखता हूं.’’ हा माझा शाळूसोबती अचानक हिंदीत का बोलू लागला, ते मला कळेना. ‘‘आय टेल वाइफ. सत्यजीत.. माय स्कूल.’’ आपलं कॉन्व्हेन्ट शाळेतलं शिक्षण अगदीच वाया गेलं नाही याचा पुरावा त्यानं लागलीच देऊन टाकला. ‘‘जॉब डोम्बिवली येम.आय.डी.सी. लिवींग बदलापूर..’’ एवढं बोलून पांडुरंगनं घडी केलेला ‘नवाकाळ’ खिशातून काढला आणि तोंडासमोर धरून वाचत राहिला. ठाकुर्ली स्टेशन येईपर्यंत आम्ही समोरासमोर बसून होतो. पण पांडुरंगनं पेपर तोंडासमोरून काढला नाही. ठाकुर्लीला माझ्याबरोबर तोही उठला. ट्रेन थांबायच्या आतच उडी मारून उतरला आणि फाटकाच्या दिशेनं नाहीसा झाला. मला चुकचुकल्यासारखं झालं. वाटलं, बाकी काही नाही, तर निदान हे तरी बोलायला हवं होतं त्यानं-‘‘चार आणे दे, नाहीतर..’’

चिन्मय मांडलेकर aquarian2279@gmail.com