राष्ट्रीय लोक दलाशी आघाडी न करण्याचा समाजवादी पक्षाचा निर्णय; फक्त काँग्रेसला सोबत घेणार

पश्चिम उत्तर प्रदेशात प्रभावशाली असलेल्या अजितसिंह यांच्या राष्ट्रीय लोक दलाशी (आरएलडी) आघाडी न करण्याचा निर्णय समाजवादी पक्षाने गुरुवारी घेतला. यामुळे भाजपला रोखण्यासाठी बिहारच्या धर्तीवर उत्तर प्रदेशातही महाआघाडी होण्याची शक्यता संपुष्टात आली.

‘आमचा आरएलडीशी संपर्क नाही आणि संबंध नाही. फक्त काँग्रेसशीच आमची आघाडी असेल. आम्ही ४०३ पैकी तिनशे जागा लढवू आणि उरलेल्या जागा काँग्रेसला देऊ,’ अशी घोषणा समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व मुख्यमंत्री अखिलेशसिंह यादव यांचे घनिष्ठ किरण्मोय नंदा यांनी गुरुवारी केली. या घोषणेने महाआघाडी होणार नसल्याचे स्पष्ट झाले.

यादव-मुस्लिमांचे पाठबळ असलेला समाजवादी पक्ष, जाटबहुल ‘आरएलडी’ आणि ‘धर्मनिरपेक्ष मतां’ची काही टक्के बेगमी असणाऱ्या काँग्रेसला एकत्र आणून महाआघाडी करण्याचे घाटत होते. अजितसिंह व त्यांचे पुत्र जयंत चौधरी यांच्यासाठी काँग्रेस अधिक आग्रही होती. पण २०१३च्या मुझफ्फरनगर दंगलीचे घाव मिटलेले नसताना जाटबहुल आरएलडीशी युती केल्यास मुस्लीम दुखावण्याची भीती समाजवादी पक्षाला वाटल्याचे समजते. त्यातून आरएलडीशी आघाडी न करण्याचा निर्णय घेतला. काहींच्या मते अजितसिंह जागावाटपामध्ये अडून बसल्याने महाआघाडी होऊ  शकली नाही. अजितसिंहांना किमान तीस जागा हव्या होत्या आणि वीसपेक्षा जास्त देण्यास अखिलेश तयार नव्हते. त्यानेही दोन्ही पक्षात अंतर वाढले.

मिरत, मथुरा, मोरादाबाद, गाझियाबाद, गौतम बुद्धनगर (नोएडा), बुलंदशहर, अलीगढ, मुझफ्फरनगर, रामपूर, सहारनपूर आदी जिल्ह्यांचा समावेश असलेल्या पश्चिम उत्तर प्रदेशामध्ये आरएलडीची ताकत आहे. २०१२च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचे नऊ  आमदार विजयी झाले होते; पण मोदींच्या झंझावातात आणि मुझफ्फरनगर दंगलीनंतरच्या टोकाच्या धार्मिक ध्रुवीकरणात २०१४च्या लोकसभा निवडणुकीत आरएलडीचा साफ धुव्वा उडाला होता. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त सत्यपालसिंह यांनी खुद्द अजितसिंहांचा बागपतमधून धक्कादायक पराभव केला होता, तर त्यांचे पुत्र जयंत चौधरींना प्रसिद्ध अभिनेत्री हेमामालिनी यांनी मथुरेतून तब्बल सव्वातीन लाख मतांनी धूळ चारली होती.

मुस्लीम प्रतिक्रियेचे सावट..

  • २०१३मधील मुझफ्फरनगर दंगलीनंतर पश्चिम उत्तर प्रदेशातील शक्तिशाली जाट आणि मुस्लिमांत अविश्वासाचे आणि तणावाचे वातावरण आहे. त्या दंगलीत साठ जणांचा जीव गेला आणि सुमारे चाळीस हजार जणांवर घरदारे सोडण्याची वेळ आली.
  • एकीकडे राष्ट्रीय लोक दल जाटबहुल पक्ष आहे, तर दुसरीकडे मुस्लिमांचा कल समाजवादी पक्षाकडे. पण दंगलीचे व्रण अद्याप न भरल्याने जाटांच्या पक्षाशी केलेली युती मुस्लिमांना रुचणार नसल्याची समाजवादी पक्षाला भीती.
  • त्यामुळेच आठ-दहा जागांसाठी राज्यभरातील मुस्लिमांच्या मनात भ्रम निर्माण करणे परवडणारे नसल्याचा निष्कर्ष. विशेषत: मुस्लिम मतांसाठी मायावतींनी जंगजंग पछाडले असताना हा धोका स्वीकारण्यात शहाणपण नसल्याचाही निष्कर्ष.