उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजप विजयी झाल्यास आरक्षणाचे फायदे संपवण्याबाबत मोदी सरकारची हिंमत वाढेल, असा दावा बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्ष मायावती यांनी शनिवारी केला. दलित, आदिवासी व इतर मागासवर्गीयांनी भाजपला बिहारसारखाच धडा शिकवावा, असे आवाहनही त्यांनी केले.

समाजवादी पक्षाला पाठिंबा देऊन तुमचे मत ‘वाया घालवू नका’, असे आवाहन निवडणूक जिंकण्यासाठी दलित आणि मुस्लीम यांचे विजयी समीकरण साधण्याकरिता मुस्लीम मतदारांना चुचकारण्याचा प्रयत्न करणाऱ्या मायावती यांनी अल्पसंख्याक समुदायाच्या लोकांना केले. केवळ बसपच भाजपचा वारू रोखू शकते, असा दावाही त्यांनी केला.

कुठल्याही प्रकारे भाजप उत्तर प्रदेशात सत्तेवर आला, तर त्यामुळे केंद्रातील त्यांच्या सरकारचे मनोधैर्य वाढेल आणि ते दलित, आदिवासी आणि इतर मागासवर्गीयांना मिळणारे आरक्षणाचे फायदे तात्काळ संपवेल, असे मायावती म्हणाल्या.

रा.स्व. संघ आणि भाजप यांनी आरक्षण रद्द करण्याच्या ‘धमक्या’ देऊ नयेत, असा इशारा देतानाच, आरक्षणविरोधी वक्तव्यामुळे हिंदुत्ववादी संघटना आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुखवटा उघड झाला असल्याचा आरोपही त्यांनी केला. आरक्षणाच्या धोरणाचा पुनर्विचार करण्याबाबत संघाचे नेते मनमोहन वैद्य यांनी केलेल्या विधानावर मायावतींनी ही प्रतिक्रिया दिली.

संघ परिवाराची हिंदुत्व विचारसरणी दलितविरोधी आहे, जातिव्यवस्था नष्ट करण्याची डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची मागणी संघ परिवाराला मान्य नाही.  – डी. राजा, भाकप नेते