काँग्रेस नेते आणि माजी क्रिकेटपटू नवज्योत सिंग सिद्धू यांनी पंजाब विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षच जिंकेल, असा दावा केला आहे. अमृतसर पूर्वमधून सिद्धू निवडणुकीच्या आखाड्यात उतरले आहेत. सिद्धू यांनी पत्नी नवज्योत कौर यांच्यासोबत मतदान केंद्रात जाऊन मतदान केले. केंद्राबाहेर आल्यानंतर त्यांनी काँग्रेस विजयी होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.

पंजाबमध्ये काँग्रेसचे सरकार सत्तेत येईल, असा दावा त्यांनी मतदान केंद्राबाहेर पत्रकारांशी बोलताना केला. या धर्मयुद्धात सत्याचाच विजय होणार आहे. काँग्रेसचे सरकार सत्तेत येईल, असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे. येथे काँग्रेसचा झेंडा फडकणार आहे, असा विश्वासही सिद्धू यांनी व्यक्त केला. यावेळी सिद्धू यांच्यासोबत त्यांच्या पत्नी नवज्योत कौर आणि मुलगा करणसिंग हेही उपस्थित होते. सिद्धू यांचा विजय नक्की आहे, असा विश्वास करणने व्यक्त केला. आम्ही जिंकू, असा पूर्ण विश्वास आहे. आम्ही दारोदारी प्रचार केला आहे. त्यावेळी आम्हाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे, असेही तो म्हणाला.

भाजपचे माजी खासदार असलेले सिद्धू यांनी सोडचिठ्ठी देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पंजाब विधानसभा निवडणुकीत काँग्रेसकडून उमेदवारीही मिळवली आहे. पंजाबला ज्यांनी लुटले आहे, त्यांना उद्ध्वस्त करायचे आहे, असे सांगून त्यांनी बादल सरकारवर हल्लाबोल चढवला होता. पंजाब विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने सिद्धू यांना अमृतसर पूर्व विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली असून, त्यांची खरी लढत भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश कुमार हनी यांच्याशी होत आहे.

सिद्धूंनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर शिरोमणी अकाली दलावर टीका केली होती. त्यानंतर बादल कुटुंबीयांनीही त्यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. शिरोमणी अकाली दलाने पंजाबला कुठे-कुठे विकले आहे, याचा भंडाफोड करणार असल्याचा दावा त्यांनी केला होता. सिद्धूंच्या या टीकेला शिरोमणी अकाली दलानेही चोख प्रत्युत्तर दिले होते. हे दलबदलू आहेत, जे सौदे करतात, त्यांना जनता ओळखत नाही का?, असा सवाल शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख व मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांनी केला होता. हे स्थलांतरित करणारे पक्षी आहेत. ते कोणासाठी काम करतात हे जनतेला चांगलेच ठाऊक असल्याचेही ते म्हणाले होते. सिद्धू यांनीही शिरोमणी अकाली दल आणि बादल कुटुंबीयांवर जोरदार हल्ला चढवला होता. आपले इमले बांधण्यासाठी बादल कुटुंबीयांनी पंजाब कसा विकायला काढला आहे, याचा भंडाफोड करणार असल्याचे सिद्धू म्हणाले होते.