गोवा आणि पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होत असताना, राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) प्रमुख लालूप्रसाद यादव यांनी भाजप आणि पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. अमित शहा कोणी राजकीय व्यक्ती नाही, ते तर एक उद्योगपती आहेत. ते पैशांचा खेळ करतात, असा आरोप लालूप्रसाद यादव यांनी केला आहे.

देशातील पाच राज्यांतील निवडणुकांचे रण तापले आहे. राजकीय पक्षांच्या नेत्यांमध्ये आरोप – प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. गोवा आणि पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी आज, शनिवारी मतदान होत आहे. त्याचवेळी बिहारमधील दिग्गज आणि राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांनी भाजप आणि पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांच्यावर निशाणा साधला आहे. अमित शहा कुणी राजकीय नेते नाहीत. ते केवळ एक उद्योजक आहेत. पैशांचा खेळ ते करतात, अशी टीका लालूप्रसाद यादव यांनी केली आहे. अमित शहा नेते नाहीत. ते ‘नॉन-पॉलिटिकल’ आहेत, असा हल्लाही त्यांनी यावेळी चढवला आहे.

पंजाब आणि गोवा विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान होत असले तरी, त्याचा जनता कुणाला कौल देणार आहे, याबाबत चर्चा सुरू आहे. निवडणुकांच्या निकालाबाबतही लालूप्रसाद यादव यांनी भविष्यवाणी केली आहे. या निवडणुकांमध्ये भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने घेतलेल्या नोटाबंदीचा परिणाम जाणवेल, असे ते म्हणाले. गोवा आणि पंजाबमधील मतदान पाहता, भाजपचा या दोन्ही ठिकाणी सुपडासाफ होईल, असा अंदाज त्यांनी वर्तवला आहे.

उत्तरप्रदेश, गोवा, पंजाब, उत्तराखंड आणि मणिपूर या पाच राज्यांमध्ये निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. गोवा आणि पंजाबमध्ये आज मतदान होत आहे. पंजाबमध्ये दुपारी एक वाजेपर्यंत ३७ टक्के मतदान तर गोवामध्ये दुपारपर्यंत सरासरी ५३ टक्के मतदान झाले आहे. या दोन्ही राज्यांत ११ मार्च रोजी मतमोजणी होणार आहे. या ठिकाणी जनता कोणत्या पक्षाच्या बाजुने कौल देते, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.