कुठल्या प्रकारचं जेवण कसं घ्यावं? कटलरी कुठली, कशी वापरावी? चांगला होस्ट किंवा गेस्ट बनण्यासाठीचे डायनिंग एटीकेट.पाश्चिमात्य फाइन डाइनमधले विविध कोर्स पाहिल्यानंतर आता थोडंसं ब्रेकफस्टबद्दल बोलू या. पाश्चात्त्य पद्धतीच्या ब्रेकफस्टमध्ये प्रामुख्याने तीन प्रकार असतात. कॉन्टिनेंटल, अमेरिकन आणि इंग्लिश ब्रेकफस्ट. यातल्या कॉन्टिनेंटलबद्दल थोडंसं..

रात्रभराचा उपास (फास्ट) ज्या खाण्याने मोडला (ब्रेक) जातो, त्या खाण्याला इंग्लिशमध्ये ‘ब्रेकफस्ट’ (उच्चार ब्रेकफास्ट नाही!) म्हणतात. तसंच दुपारच्या जेवणाला ‘लंच’ आणि रात्रीच्या जेवणाला ‘डीनर’ अशी ही खास नावं इंग्रजीत आहेत. आपल्याकडे निदान ब्रेकफस्टला ‘नाश्ता’ किंवा ‘न्याहारी’ असं म्हणतात, पण आपलं बापुडं ‘लंच’ किंवा ‘डीनर’ हे ‘जेवण’च असतं! असो, तर आता आपण पाश्चिमात्य प्रकारच्या ब्रेकफस्टबद्दल जाणून घेऊ या.

सर्वसाधारण समज असा आहे की, जो अंडे-पावाचा नाश्ता भारतीय प्रकारचा नसतो (म्हणजे भुर्जी-पाव, मसाला ऑमलेट-पाव वगरे) तो ‘कॉन्टिनेंटल’ असतो. पण पाश्चात्त्य पद्धतीच्या ब्रेकफस्टमध्ये मुख्यत तीन प्रकार असतात. कॉन्टिनेंटल, अमेरिकन आणि इंग्लिश.

कॉन्टिनेंटल ब्रेकफस्ट :

युरोपमध्ये आणि मुख्यत फ्रान्स आणि स्वित्र्झलडमध्ये, हा ब्रेकफस्ट घ्यायची पद्धत आहे. यात फक्त ज्यूस, कॉफी आणि ब्रेडचे दोन-तीन प्रकार असतात. अनेकदा हॉटेल बुकिंग करताना ‘फ्री कॉन्टिनेंटल ब्रेकफस्ट’च्या मोहात पडून हॉटेल निवडलं जातं आणि जेव्हा ‘फ्री ब्रेकफस्ट’ (अनेकदा ‘लिमिटेड’ही!) येतो तेव्हा आपल्याला आश्चर्याचा धक्का बसतो! एका छोटय़ा ट्रेमध्ये ज्यूस (छोटय़ा ग्लासमध्ये आणि तोही कॅन्ड. फ्रेश नाही.) एका बशीत पावाचे दोन रोल्स आणि कॉफी बघितल्यावर अगदी हिरमोड होतो!

काही हॉटेल्समध्ये ज्यूस न ठेवता कापलेली फळं ठेवतात. चांगल्या हॉटेल्समध्ये फ्रेश ज्यूसपण ऑफर करतात. कॉन्टिनेंटल ब्रेकफस्टची खरी मजा पावांच्या प्रकारात असते. हे आपल्या स्लाइस्ड ब्रेडपेक्षा वेगळे असतात. सर्वात पॉप्युलर आहे क्रॉझाँ (croissant). चंद्रकोरीच्या आकाराच्या गुंडाळीचा हा ब्रेड खूप रिच असतो.. भरपूर बटर घालून बनवलेला. दुसरा प्रकार आहे ‘ब्रिऑश’ – दिसायला ‘कप केकवर चेरी’ असल्या सारखा. हा ब्रेड अतिशय मऊ आणि तलम असतो आणि का नसणार? यातही अंडे, भरपूर बटर असतं. हे ब्रेड्स ‘प्रीझव्र्स’ बरोबर खाल्ले जातात. प्रीझव्र्स म्हणजे जॅमचाच प्रकार. अनेकदा मधही ऑफर करतात. उच्च दर्जाच्या हॉटेल्समध्ये ब्रेडव्यतिरिक्त सीरिअल (cereals) आणि दूध, चीजचे विविध प्रकार, योगर्ट इत्यादी कॉन्टिनेंटल ब्रेकफस्टमध्ये मिळू लागले आहेत. उत्तर युरोपीय देशांत पम्परनिकल आणि राय ब्रेड खाल्ला जातो आणि कोल्ड मीट्समध्ये सलामी, सॉसेज इत्यादी असतं.

पेय सहसा कॉफीच असतं आणि तीही फिल्टर कॉफी. ही कॉफी अनेक जण कोरी (बिन दुधाची) पिणं पसंत करतात आणि म्हणून कॉफीच्या बिया भाजण्यापासून (रोस्ट) ते त्यांची किती जाड/बारीक पूड करावी या सगळ्यावर जातीने लक्ष दिलं जातं. इटलीमध्ये प्यायल्या जाणाऱ्या कॉफी आज आपल्याकडेही खूप पॉप्युलर झाल्या आहेत. उदाहरणार्थ ‘कापुचिनो’ आणि ‘एस्प्रेस्सो’. ज्यांना सकाळी- सकाळी खूप काही खायची इच्छा नसते, त्यांच्यासाठी परदेश दौऱ्यावर हा अगदी सोयीचा ब्रेकफस्ट आहे.

गौरी खेर