कुठल्या प्रकारचं जेवण कसं घ्यावं? कटलरी कुठली, कशी वापरावी? चांगला होस्ट किंवा गेस्ट बनण्यासाठीचे डायनिंग एटिकेट. युरोपीय देशांमध्ये चीज हा त्यांच्या आहाराचा अविभाज्य भाग आहे आणि सँडवीच, पिझ्झाच्या पलीकडे त्याचा स्वयंपाकात वापरही भरपूर होतो. पण सर्वात मुख्य वापर खाण्यात होतो.. अगदी एक स्वतंत्र कोर्स म्हणून! या चीज कोर्सविषयी आणि चीजच्या नानाविध प्रकारांविषयी..

काही वर्षांपूर्वी एका गुर्मे स्टोरच्या स्टाफचं ट्रेनिंग राबवलं. खास विषय होता ‘चीज’. याबद्दल एका ओळखीच्या बाईंना सांगितलं तर त्यांना खूपच आश्चर्य वाटलं ‘‘त्यात कसलं आलंय ट्रेनिंग? किराणाच्या दुकानात जाऊ न सरळ ब्लॉक, क्यूब किंवा स्लाइस सांगितलं की चीज मिळत.’’ त्या चीजमध्ये आणि किराणाच्या दुकानातल्या चीजमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे हे सांगितल्यावर त्यांना खूपच आश्चर्य वाटलं. किराणा दुकानातलं चीज हे ‘प्रोसेस्ड’ चीज असतं आणि संपूर्णपणे मशीनमध्ये बनतं. गुर्मे स्टोरमध्ये अनेक तऱ्हेची चीझेस मिळतात आणि त्यापैकी बरीचशी हाताने बनविली जातात हे ऐकून त्यांना अचंबाही वाटला!
अर्थात अचंबा वाटण्यासारखीच गोष्ट आहे, कारण एकटय़ा फ्रान्समध्ये ४००हून अधिक प्रकारची चीज बनविली जातात. इटली, स्पेन, स्वित्र्झलड, हॉलंड, ब्रिटनसारखे इतर युरोपीय देश धरले तर गणती करण्यातच किती वेळ जाईल! आणि त्यातही स्तुत्य गोष्ट म्हणजे प्रत्येक देशाने आपल्या चीजचं अस्तित्व कायदेशीररीत्या स्वत:कडे जपून ठेवलं आहे. युरोपीय महासंघाच्या ॅीॠ१ंस्र्ँ्रूं’ कल्ल्िरूं३्रल्ल (भौगोलिक चिन्ह) च्या नियामनुसार कोणतेही खाद्यपदार्थ जे त्या विशिष्ट जागेवरून येतात आणि त्या जागेचं नाव लावतात, ते इतर कोणीही दुसऱ्या ठिकाणी बनवू शकत नाहीत. उदाहरणार्थ पार्मेसन चीज हे इटलीमधल्या पारमा इलाख्यातूनच यायला पाहिजे.
इटलीतच इतर कुठेही ते चीज बनवलं तरी त्याला पार्मेसन म्हणता येणार नाही. युरोपीय देशांमध्ये चीज हा त्यांच्या आहाराचा अविभाज्य भाग आहे. चीज ही ब्रेडबरोबर खाण्याची गोष्ट आपण मानतो. सँडवीच आणि पिझ्झामध्येही चीज आवर्जून असलंच पाहिजे हे आपल्याला माहिती असतं. पण युरोपीय देशांत सँडवीच, पिझ्झाच्या पलीकडे त्याचा स्वयंपाकात वापरही भरपूर होतो. सर्वात मुख्य वापर त्याचा खाण्यात होतो. अगदी एक स्वतंत्र कोर्स म्हणून! हो.. त्यांच्याकडे चीज नुसतं खातात. वेगवेगळ्या चीजचा मनापासून आस्वाद घेण्यासाठी त्यांच्याकडे वेगळा कोर्स असतो. खूप लोक जेवणानंतर गोड खायच्या ऐवजी चीज खाणं पसंत करतात. कोर्स म्हणून खाल्लं जाणारं चीज प्रोसेस्ड नसून हाताने बनवलेलं असतं.
कोर्स म्हणून चीज खाताना त्याबरोबर अकंपनीमेन्टपण दिले जातात. क्रॅकर बिस्किट्स, सेलेरीची देठं, प्रेत्झेल्स, द्राक्ष, पेर, सफरचंद इत्यादी अकंपनीमेन्ट्स असतात. कोणत्या प्रकारच्या चीजबरोबर कोणतं अकंपनीमेन्ट जाईल हे ठरलेलं असत. चीज हे एका लाकडाच्या चीज बोर्डवर किंवा प्लॅटरमध्ये सव्‍‌र्ह करतात. ते कापून उचलायला एक वेगळी सुरी असते ज्याला चीज नाइफ म्हणतात.
चीज दुधापासून बनवलं जातं, हे आपल्याला माहिती आहे. पण ते बनवतात कसं, त्या पद्धतीनुसार त्याचे प्रकार ठरतात. याशिवाय चीज बनवताना फ्लेवर्स घालण्याचीही पद्धत आहे. ते फ्लेवर्ड चीज असतं. या सर्व प्रकारांविषयी पुढच्या लेखात..

– गौरी खेर