पाश्चिमात्य फाइन डाइनमधले विविध कोर्स पाहिल्यानंतर आता थोडंसं खाण्याच्या किंवा खिलवण्याच्या विविध पद्धतींकडे बघावं लागेल. आपल्या टेबलासमोर आपली डिश तयार करून सव्‍‌र्ह करणाऱ्या गेरीदों सव्‍‌र्हिसबद्दल..
गेरीदाँ या फ्रेंच शब्दाचा अर्थ म्हणजे एक छोटं, सुबक टेबल. रेस्टराँमध्ये गेरीदों सव्‍‌र्हिस म्हणजे आपल्या जेवणाच्या टेबलपाशी येऊन आपल्या समोर पदार्थ बनविणे. याला ट्रॉली सव्‍‌र्हिसपण म्हणतात. कारण टेबल कितीही छोटं असलं तरी ट्रॉली त्यापेक्षा रेस्टराँभर फिरवायला सोपी असते.
बरेचसे पदार्थ गेरीदों सव्‍‌र्हिसने सव्‍‌र्ह केले जातात. आपण जो पदार्थ खाणार आहोत तो आपल्या समोर बनवला जात आहे, याचं सुख काही वेगळंच असतं. सलाडपासून डीझर्ट आणि त्यानंतर प्यायच्या कॉफीपर्यंत, अशा बऱ्याच पदार्थाची गेरीदों सव्‍‌र्हिस करता येते. ही सव्‍‌र्हिस ऑफर करायची काही कारणं आहेत. सर्वात पहिलं म्हणजे काही पदार्थ एका विशिष्ट टेम्परेचरला सव्‍‌र्ह करायला लागतात आणि किचनमधून आणेपर्यंत तसे राहात नाहीत. अशा वेळी गेरीदों सव्‍‌र्हिस करणं उत्तम असतं. दुसरं म्हणजे यात एक प्रकारचं मनोरंजनपण असतं. त्याला लागणाऱ्या कौशल्यामुळे अशी सव्‍‌र्हिस सोफिस्टिकेटेड वातावरणाची निर्मिती करते. शेवटचं आणि महत्त्वाचं म्हणजे इतरांसाठी बनविला जाणारा पदार्थ आकर्षक वाटला तर बाकीचे डायनर्स पण तो पदार्थ ऑर्डर करण्याची शक्यता वाढते. नुसतं मेन्यूमध्ये वाचून तो पदार्थ कसा असेल याची कल्पना करण्यापेक्षा तो आपल्या डोळ्यांसमोर बनतो आहे, हे कधीही उजवंच ठरतं.
जे पदार्थ सव्‍‌र्ह होतात, त्या प्रत्येकाची ट्रॉली वेगळी असते. उदाहरणार्थ सलाड ट्रॉलीमध्ये सर्व पदार्थ बर्फाच्या चुऱ्यावर ठेवतात म्हणजे ते जास्त काळ फ्रेश राहतात. ते वितळणारं पाणी धरून ठेवायची सोय त्या ट्रॉलीमध्ये असते. शिवाय खाली मििक्सग बोल, मीठ-मिरी, ड्रेसिंग आणि प्लेट्स ठेवायला जागा असते. कार्विग ट्रॉलीवर आपल्या समोर मांसाहारी पदार्थाचं कार्विग केलं जातं-छोटय़ा तुकडय़ांपासून अगदी तलम, पारदर्शक स्लायसेसपर्यंत. त्याबरोबर सव्‍‌र्ह होणारे सॉसेस पण ट्रॉलीवर असतात.
डेझर्ट ट्रॉली आपल्या टेबलजवळ येऊन सव्‍‌र्हिस होणं म्हणजे आपल्या संयमाची पराकोटीची परीक्षाच! मेन्यूमधून नवीन पदार्थ ऑर्डर करताना आपण त्याबद्दल नुसताच अंदाज बांधत असतो. इथे तर आपल्या समोर, टेबल जवळ जेव्हा ती ट्रॉली येते, ज्यावर असंख्य सुबक डेझर्टस मांडलेले असतात, तेव्हा अक्षरश: हे घेऊ का ते घेऊ असं होतं! त्यातून वेटर जर तरबेज सेल्समन असला तर आपण बरंच काही ऑर्डर करून जातो!
सर्वात सुंदर आणि लक्षवेधक सव्‍‌र्हिस ‘फ्लाम्बे’ची असते. फ्लाम्बे म्हणजे अल्कोहोल जाळून त्याच्या ज्वाळा त्या पदार्थाभोवती ओतणं किंवा पदार्थावर अल्कोहोल घालून पेटवण. सोफिस्टिकेटेड रेस्टराँमधल्या अंधूक उजेडात त्या ज्वाळांच्या गुंफणात जेव्हा तो पदार्थ सव्‍‌र्ह होतो, तेव्हा तो सर्व डायनर्सचे लक्ष वेधून घेतो. ‘स्नेक कॉफी’ नामक एका प्रकारामध्ये तर मोसंबीच्या गोल विळख्यात कापलेल्या सालीवरून जेव्हा जळता अल्कोहोल सोडला जातो तेव्हा तर बरेच डायनर्स आपलं जेवण थांबवून ते पाहत राहतात. चीज आणि लिक्युअर्सची सव्‍‌र्हिसदेखील ट्रॉलीवरून करता येते.

-गौरी खेर