फाइन डाइनमध्ये केवळ पाश्चिमात्य समावेश हल्ली होत नाही. पौर्वात्य पदार्थ  सव्‍‌र्ह करणाऱ्या उच्चभ्रू रेस्टराँमध्ये त्याच संस्कृतीप्रमाणे कटलरी वापरण्यावर भर असतो. उच्चभ्रू आशियायी रेस्टराँमध्ये चॉपस्टिक्स हटकून दिसतातच. चॉपस्टिक्सचा वापर कसा करावा?

फाइन डाइनमध्ये आतापर्यंत आपण पाश्चिमात्य खाद्यपदार्थाविषयी पाहिलं. हल्ली फाइन डाइन रेस्टॉरंट्समध्ये पौर्वात्य खाद्यसंस्कृतीमधील पदार्थ आवर्जून सव्‍‌र्ह केले जातात. उच्च प्रतीच्या पूर्व आशियायी रेस्टराँमध्ये हे पदार्थ खाण्यासाठी छान, सुबक चॉपस्टिक्स असतात. चॉपस्टिक्स वापरायची सवय नसेल तर तिथेच नेमकी अडचण होते. चॉपस्टिक्स थेट टेबलवर न ठेवता ‘चॉपस्टिक्स रेस्ट’वर ठेवल्या जातात. ही ‘रेस्ट’ म्हणजे एक छोटासा सिरॅमिकचा तुकडा असतो. इतर सर्वसाधारण रेस्टराँँमध्ये कागदाच्या आवरणात घातलेल्या बांबूच्या डिस्पोझेबल चॉपस्टिक्स असतात. आता या चॉपस्टिक्स कशा वापरायच्या ते पाहू..

चॉपस्टिक्स एकमेकांना चिकटलेल्या असतात. दोन्ही हातांमध्ये त्या दोन चॉपस्टिक्स धरून एकमेकींपासून अलक करा.

पहिली चॉपस्टिक अशी धरा की, त्याचा जाड भाग अंगठय़ाच्या खाली आणि पातळ भाग मधल्या बोटाच्या मधल्या भागावर स्थिरावला जाईल. ही बेस चॉपस्टिक किंवा स्थिर चॉपस्टिक असते. व्यवस्थित पकड घट्ट रहावी म्हणून अंगठय़ाच्या वरच्या भागाने ही चॉपस्टिक धरावी.

आता दुसरी चॉपस्टिक चाफेकळीच्या कडेने पकडा. अंगठय़ाच्या टोकाने ही चॉपस्टिक पेन्सिल धरल्याप्रमाणे पकडून ठेवा.

दोन्ही चॉपस्टिक्सची टोकं जोडून प्लेटवर टेकवा. टेबलापासून तिरकी धरलेली असावीत. हातातून वर खाली सरकवून त्यांची टोके जोडून घ्या.

आता वरच्या चॉपस्टिकला थोडं प्रेशर द्यायचं. चाफेकळी आणि अंगठय़ाने असा दाब देता येईल. हे करताना खालची चॉपस्टिक हलता कामा नये. ती स्थिर असली पाहिजे. त्यासाठी तुमचा अंगठा एकाच ठिकाणी असला पाहिजे. चाफेकळी आणि मधलं बोट यांचा वापर करून वरची चॉपस्टिक हलवता येते. खालच्या चॉपस्टिकच्या टोकाला वरच्या चॉपस्टिकचे टोक जोडून पुन्हा विलग करता यायला हवं.

चॉपस्टिक्सच्या दोन टोकांमध्ये पदार्थाचा तुकडा पकडून तो प्लेटमधून तोंडाजवळ आणता येईल. सुरुवातीला कदाचित अंगावर सांडू नये म्हणून प्लेटवर तोंड थोडं वाकवावं लागेल. पण सवय झाल्यानंतर त्याची गरज पडणार नाही.

चॉपस्टिक्स वापरताना काय काळजी घ्यावी. चॉपस्टिक्स वापरताना कुठले बॅड मॅनर्स समजले जातात या गोष्टी पुढच्या भागात पाहू या.