सगळं सुरळीत चाललं होतं. म्हणजे अडथळे होते ते दूर झालेले होते. पण एका गटाची नाटकाबद्दलची नाखुशी होतीच. या गटात अनेक नाटकवाले तर होतेच, पण अनेक पक्षांतले राजकीय नेतेही होते. त्यांपकी प्रमुख म्हणजे त्या वेळचे दैनिक ‘लोकसत्ता’चे प्रमुख संपादक नाटककार विद्याधर गोखले, प्रभाकर पणशीकर, त्यांचे बंधू दाजी पणशीकर, भालचंद्र पेंढारकर, चित्तरंजन कोल्हटकर, वसंत शांताराम देसाई तर राजकीय क्षेत्रातले वसंत साठे, पी. व्ही. नरसिंह राव, कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे, बाळासाहेब ठाकरे हे प्रमुख. या सगळ्यांना नाटकातलं नाना फडणवीसांचं रंगेल रूप दाखवणं हे अमान्य होतं. तेंडुलकरांनी तर नाटकाला ‘अनतिहासिक दंतकथा’ म्हटलं होतं. ते म्हणायचे की, नाटकात घाशीरामच्या संदर्भात जेवढे नाना येतात तेवढेच दिसतात. हे नाटक घाशीरामचे आहे. एकदा नाटकाची तालीम बघायला मुंबईहून तेंडुलकर आणि कुमुद मेहता हे आले. सलग तालीम बघितल्यावर जब्बार त्यांना म्हणाला की, पहिल्या अंकात बुद्धिमान नानांचे राजकीय कौशल्य दिसू शकेल असा प्रवेश लिहिता येईल का? कुमुदताईंचं मतदेखील तसंच होतं. तेंडुलकरांनी थोडा वेळ विचार केला आणि तात्काळ पहिल्या अंकाच्या शेवटी नाना फडणवीसांच्या तोंडी एक लयदार स्वगत लिहून दिलं ते असं –

नाना : जा, घाश्या अक्करमाश्या, केला, केला, तुला कोतवाल. खुशाल हमामा घाल. पण या नानाची चाल तुला ठावी नाही. अरे या वेळी ही राजकारणी बंदूक ठासली आहे दुबारी. पहिल्या बारात लोळवीन तुझी लुसलुशीत पोरगी. पण दुसऱ्या बाराने खेळवील हा नाना अवघी पुण्यनगरी. घाश्या, लेका तू तर उपरा, तूस बसविले आहे या पुण्यनगरीच्या माथी- कशास? येथल्या तमाम कपटींना परस्पर काटशह. ना तू त्यांस सामील होऊ शकणार, झालास तरी त्यास नाही तुझा भरवसा वाटणार! कारण तू परका, तू बाहेरचा. आम्ही कोतावालीवर चढवलेला श्वान दारचा. अरे अक्करमाश्या, घाश्या, चित्पावनाच्या वर असेल तुझा झोक. ठेवशील वचक चोख, करशील कारभार सवाई. चिंता नको. पुन्हा होतील आमचे प्रमाद तुझ्या खाती परस्पर. करनेको हम, भरनेको हमारा कोतवाल. (टाळी वाजवून) सोय खाशी, नानास घाशी. पुन्हा ती लुसलुशीत कोवळी काकडी आयती मोडण्यास हाताशी. वाहवा. या नानाचे तूस आशीर्वाद आहेत हो.

What is space tourism Gopi Thotakura to be the first Indian space tourist
भारतीय व्यक्ती पहिल्यांदाच करणार अंतराळ पर्यटन; काय आहेत त्यामधील आव्हाने?
jallianwala bagh 105 years
जालियनवाला बाग हत्याकांड : १०५ वर्षांपूर्वीच्या रक्तरंजित इतिहासाचे स्मरण! नक्की काय घडले त्या दिवशी?
istanbul fire
इस्तंबूलच्या नाईटक्लबमध्ये भीषण आग, २९ जणांचा होरपळून मृत्यू!
lokmanas
लोकमानस: वालचंद हे मराठीच होते..

(दवंडीवाला घाशीराम हा पुण्याचा कोतवाल झाल्याचे जाहीर करतो.)

तर प्रयोगांचं पाणी पुलाखालून वाहतं राहिलं. बघता बघता पहिल्या १९ प्रयोगांनंतर फेब्रुवारी ७३ मध्ये पी.डी.ए.ने थांबवलेले प्रयोग आमच्या थिएटर अकॅडेमी, पुणे या नव्या संस्थेने जानेवारी ७४ पासून सुरू करून आतादेखील ४-५ र्वष झालेली होती. सखाराम आणि घाशीरामचे वादंग मिटून दोन्ही नाटके प्रयोगस्थ झाली होती. विविध नाटय़ महोत्सवांतून गाजत होती. देशभर या दोन मराठी नाटकांची चर्चा चालू असे. आमची संस्था फक्त घाशीरामचेच प्रयोग करत नव्हती तर या लोकप्रिय झालेल्या नाटकाच्या उत्पन्नातून संस्थेच्या नावावर ‘मिकी आणि मेमसाहेब’ (७३), ‘महानिर्वाण’ (७४), ‘महापूर’ (७५), ‘तीन पशांचा तमाशा’ (७७) अशी नाटकं लागली होती. आनंद मोडकनी बसविलेल्या बा. सी. मर्ढेकरांच्या  ‘बदकांचे गुपित’ या संगीतिकेचे प्रयोगही चालू होते आणि मुख्य म्हणजे या सगळ्या नाटकांचे हौशी रंगभूमीच्या मानानं भरपूर प्रयोग चालू होते. विविध राज्य तसेच राष्ट्रीय पुरस्कार या नाटकांच्या आणि त्या मागच्या कलाकारांच्या वाटय़ाला येत होते. जब्बारचे ‘सामना’, ‘सिंहासन’, ‘जैत रे जैत’ हे चित्रपट गाजत होते. त्यात मोहन आगाशे तर होताच शिवाय तो श्याम बेनेगलांच्या ‘निशांत’ (७५), ‘मंथन’ (७६), ‘भूमिका’ (७७) चित्रपटांतूनही कामं करत होता. त्याचं मुख्य भांडवल होतं नाना फडणविसांची भूमिका. या भूमिकेमुळे त्याला बरीच लोकप्रियता मिळत गेली. सगळ्यांचे नोकरी-उद्योग तसेच चालू होते. शिक्षण संपून नव्याने नोकरी लागलेल्यांची लग्नं होऊन संसार मार्गी लागले होते. संस्था हौशी असल्याने नाटकातून काही पसे मिळावेत हा विचारही कोणाच्या मनात नव्हता. ‘महापूर’मध्ये सुलभाची भूमिका करणारी मंजिरी परांजपे, घाशीराममध्ये ब्राह्मणी असणारी रोहिणी भागवत या ७८ पर्यंत अनुक्रमे देशात-परदेशांत जर्मन आणि फ्रेंच भाषांमधल्या पदव्या मिळवून नोकरीस लागलेल्या होत्या. काही नव्यांची भर पडत होती. माधुरी पुरंदरे तिचा पॅरिसचा मुक्काम आटोपून चित्रकलेचा अभ्यास आणि फ्रेंच भाषा गाठीला बांधून संस्थेत ७४ दरम्यान ‘महापूर’ या आमच्या नाटकाचं नेपथ्य करण्याच्या निमित्ताने दाखल झाली. पुढे ७७ मध्ये ‘तीन पशांचा तमाशा’मधली तिची झीनत या नायकिणीची भूमिका खूप गाजत होती. घाशीरामचे काही ब्राह्मण त्यांच्या व्यावसायिक अडचणींमुळे गळाले होते. मोहन गोखले हा ७६ पासून ‘कस्तुरीमृग’ या वसंत कानेटकर यांच्या नाटकाच्या निमित्ताने मुंबईला व्यावसायिक रंगभूमीवर कार्यरत होण्याच्या प्रयत्नात होता. इकडे घाशीराममध्ये प्रकाश अर्जुनवाडकर, श्रीराम पेंडसे, मकरंद ब्रrो, शरद पायगुडे, देवेंद्र साठे, विनिता भावे, मििलद डोंगरे, अनिल भागवत, दिलीप गोखले, माणिक भंडारी असे कलाकार नव्याने रुजू झालेले होते. तर गुलाबी नायकिणीच्या भूमिकेत काही प्रयोग जयमाला काळे आणि नंतर बरीच र्वष अभिनेत्री उषा चव्हाण यांची बहीण रजनी चव्हाण ही होती.

तर प्रयोग जोरात सुरू होते. पुण्याबाहेरच्या गावातूनही शनिवार-रविवार छोटे दौरे चालू असायचे. पुण्या-मुंबईच्या प्रयोगाच्या वेळी एक गोष्ट लक्षात येत होती की, प्रत्येक प्रयोगाला काही परदेशी प्रेक्षक हमखास येत आहेत. प्रयोग जरी हौशी कलाकारांचा असला तरी तो अत्यंत व्यावसायिक सफाईनं होत असे. त्यामुळे प्रभावित होऊन परदेशी प्रेक्षक प्रयोगांनंतर रेंगाळत. मग मोहन त्यांना नाटकाबद्दल विस्तृत माहिती देत असे. परदेशी प्रेक्षकांना हे नाटक समजावे म्हणून आमचा मित्र आणि संस्थेतील जुनी कलाकार मीनल चव्हाण (गोखले) हिचा नवरा प्रख्यात ब्रिज खेळाडू व जाहिराततज्ज्ञ अविनाश गोखले यांनी त्याच्या फडर्य़ा इंग्लिशमध्ये नाटकाचा नेमका गोषवारा लिहून दिला होता. एकूणच परदेशी पाहुण्यांबद्दल मोहनला विशेष आपुलकी असे. प्रयोग झाला की त्याला भेटायला हे परदेशी प्रेक्षक येत असत अर्थात त्यात स्त्रिया थोडय़ा अधिकच. दोन प्रकारचे परदेशी प्रेक्षक असत. सुट्टीसाठी आलेली, ६५-७० नंतर परदेशात स्थायिक झालेली मराठी कुटुंबं आणि पुण्याच्या मॅक्स म्यूलर भवन, अलियान्स फ्रान्से या संस्था तसेच मुंबईला विविध देशांचे दूतावास यांनी पाठवलेले त्यांचे पाहुणे. ७५ मध्ये जब्बारचा पहिलाच चित्रपट ‘सामना’ बíलन महोत्सवात दाखवला. जब्बार तेव्हा प्रथमच परदेशी जाऊन आला त्या वेळी मेरकेल हा जर्मन अधिकारी बíलनच्या गटे इन्स्टिटय़ूटमधे होता. नंतर त्याची बदली ७७ दरम्यान पुण्याच्या मॅक्स म्यूलर भवनचा संचालक म्हणून झाली. त्या आधीचा संचालक डर्क अंगलरॉथ हा नेहमी घाशीराम बघायला येत असे. तो मेरकेल याला प्रयोगाला घेऊन आला. प्रयोग बघून तो त्याने बíलनच्या नाटय़ महोत्सवाच्या ऑफिसला ‘घाशीराम कोतवाल’विषयी सविस्तर लिहिले आणि मोहनला सुचवलं की, बíलन नाटय़ महोत्सवाला प्रेक्षक म्हणून का जात नाही? म्हणजे सगळे प्रत्यक्ष नजरेखालून घालता येईल. हे सगळे ७९च्या सुरुवातीला चालू होते. मेरकेलच्या सांगण्यावरून मोहनला ७९मध्ये बíलन आंतरराष्ट्रीय नाटय़ महोत्सवात नाटकं बघण्यासाठी बोलावलं. तो पसे इकडून तिकडून जमवून पोलिश एअरच्या स्वस्त तिकिटावर बíलनला जाऊन आला. बíलन महोत्सवाचे संयोजक डॉ. उर्लीच एखार्ट आणि नाटय़ महोत्सवाचे संचालक टॉरस्टीन मास् यांना भेटून नाटकाची सविस्तर माहिती दिली. त्यांनी रीतसर प्रयोगासाठी आमंत्रणाचं पत्र दिलं आणि नाटकाच्या पूर्वप्रसिद्धीसाठी त्या वेळच्या पद्धतीप्रमाणे ध्वनिचित्रफीत पाठवून देण्यास सांगितलं. मोहन बíलन महोत्सवाच्या २५-२७ सप्टेंबर ८० अशा तीन प्रयोगांच्या तारखा पक्क्या करून आला.

तत्पूर्वीचं एक उपकथानक म्हणजे ७६मध्ये पुण्याच्या फिल्म इन्स्टिटय़ूटच्या काही माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन ‘युक्त को-ऑपरेटिव्ह सोसायटी’ स्थापन करून एका राष्ट्रीय बँकेकडून कर्ज घेऊन ‘घाशीराम कोतवाल’ नाटकावर एक अत्यंत अनाकलनीय असंगत असा पूर्ण वेळेचा चित्रपट तयार केला. पटकथा तेंडुलकरांचीच होती. त्यातही मोहन नानाच होता आणि घाशीरामच्या भूमिकेत ओम पुरी होता. या चित्रपटाला कुणी एक असा दिग्दर्शक नव्हता. पण नंतर चित्रपटातून गाजलेले मणी कौल, सद मिर्झा, के. हरिहरन, कमल स्वरूप असे ३-४ दिग्दर्शकीय भूमिकेत होते. कलाकृती कुणा एकाची नाही तर सर्जनात्मक सहकाराने चित्रपट निर्माण करायचा अशी या ‘युक्त’ चमूची संकल्पना होती. प्रत्यक्षात ती यशस्वी झाली असं हा चित्रपट बघून काही म्हणता येणार नाही. हा चित्रपट बíलनला ७६ मध्ये यूथ फोरममध्ये दाखवला गेला. पण त्याची फारशी कोणी तिकडे दाखल नाही घेतली. चित्रपटातला एक कलाकार म्हणून मोहनही तेव्हा बíलनला जाऊन आला.

आता बíलनच्या आंतरराष्ट्रीय नाटय़ महोत्सवाचं आमंत्रण तर आलेलं. पण ते फक्त तीन प्रयोगांचं आणि पाच दिवस निवासाचं! मुख्य खर्च ४० कलाकारांच्या जाण्या-येण्याचा. तो कोण करणार? शिवाय एवढय़ा लांब जाऊन फक्त बíलनलाच प्रयोग करून कसं परत येणार? अन्य युरोपियन देशांत प्रयोग जमू शकणार नाहीत का? असे अनेक प्रश्न पुढय़ात होते. दिल्लीला केंद्राच्या परराष्ट्र खात्याची भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद (Indian Council for Cultural Relations म्हणजेच ICCR) ही १९५२ दरम्यान स्थापन केलेली संस्था, परदेशातील भारताच्या दूतावासाच्या सहकाऱ्यांनी भारतातील कलाकारांचे कार्यक्रम त्या त्या देशाच्या सांस्कृतिक अदान-प्रदान करारानुसार आयोजित करते. कउउफ ही संस्था आंतरराष्ट्रीय करारानुसार कलाकारांच्या जाण्या-येण्याचा खर्च फक्त करी. अन्य सर्व खर्च ज्या देशात कार्यक्रम होणार त्या देशाच्या सरकारी संस्थांनी करायचा करार असे. या संस्थेमार्फत भारतातून जे कार्यक्रम नेहमी परदेशी जायचे ते परंपरागत नृत्य, शास्त्रीय संगीत या कला प्रकारातील असायचे. आधुनिक मराठी नाटक कोण परदेशी पाठवणार? तिकडे ते समजेल का? असे त्यांचे शासकीय प्रश्न असायचे. नाही म्हणायला साहित्य संघ निर्मित बरटोल्ट ब्रेश्ट (१८६८-१९५६) या जगप्रसिद्ध नाटककाराचं ‘कॉकेशियन चॉक सर्कल’ (अजब न्याय वर्तुळाचा) या नाटकाच्या मराठी अवताराचे प्रयोग कउउफ मार्फत ७८ मध्ये त्या वेळच्या पूर्व जर्मनीत वायमार आणि अन्य ठिकाणी झाले. विजया मेहता आणि फ्रिट्झ बेनेविट्झ दोघांनी त्याचं दिग्दर्शन केलं होतं. पण ते मूळचं १९४३-४५ दरम्यान लिहिलेलं जर्मन अभिजात नाटकचं होतं. आमच्या नाटकाचा या बाबतचा वकील म्हणजे मोहन. एक तर त्याचे इंग्रजी उत्तम. म्हणजे बोलणं आणि लिहिणं दोन्ही. तो टायिपग उत्तम करतो आणि मुख्य म्हणजे तो कुठेही घुसत असे. सरकारी अधिकाऱ्यांना शासकीय मुद्दय़ाच्या भाषेत तो पटवत असे. त्यामुळे साहजिकच देशाबाहेरच्या या नियोजित दौऱ्याची सूत्रं मोहनकडे एकहाती आली.

७८-७९ मध्ये मराठी नाटकाचा परदेशी दौरा आखणं जिकिरीचं होतं. नाही संस्थेकडे ऑफिस, बसायला जागा. सगळच हौशी. त्या वेळची दळवळणाची साधनं म्हणजे फोन, तार, एअर मेल. एक एअर मेल पाठवलं की उत्तर यायला किमान २-३ आठवडे लागायचे. फोनवर परदेशी ट्रंककॉल लावणं म्हणजे एक सोहळाच असायचा. इंटरनेट नाही, फॅक्स नाही, मोबाइलची तर बातंच नसे. झेरॉक्स नुकतंच सुरू झालेलं, पण त्यावर गरम मजकूर येऊन तो उडून जात असे. कसे आम्ही दिवस काढले असतील बघा! मोहन, मी आणि नंदू पोळ आम्ही तिघेही ससून हॉस्पिटल परिसरात दिवसभर नोकरीला असल्याने आमच्या या दौऱ्याची सूत्रं ससूनमधूनच हलत. एक तर हे मोहनला सोयीच होतं आणि घाशीरामच्या प्रयोगाबद्दल ससूनमध्ये सगळ्यांना आपुलकी असे. मोहन पत्रं ड्राफ्ट करी. नंदू संस्थेच्या लेटरहेडवर ती ससूनमध्ये टाइप करायचा. ससूनचं टपाल जेव्हा जवळच्या जी.पी.ओ.मध्ये जाई तेव्हा आमच्या दौऱ्याची पत्रंदेखील त्याबरोबर जात. बदल्यात कर्मचाऱ्याला घाशीरामच्या प्रयोगाचा पास. बस्स, काम फत्ते. ७९ दरम्यान बíलनचं आमंत्रण तर आलं, पण पुढे गाडं रेटणार कसं? हा मोहनच्या पुढे प्रश्न होता. हा दौरा ठरवण्यासाठी मोहनने जे कष्ट घेतले त्याला तोड नाही. देशात ७८-७९ दरम्यान राजकीय उलथापालथ चालू होती. आणीबाणीनंतर आलेलं जनता सरकार कोसळण्याच्या बेतात होतं. त्या सुमारास घाशीरामच्या दिल्लीच्या प्रयोगाला पुपुल जयकर (१९१५-१९९७) आणि केंद्राच्या सांस्कृतिक खात्याच्या सहसचिवा, प्रख्यात नíतका, संस्कृततज्ज्ञ, विचारवंत कपिला वात्स्यायन या आल्या होत्या. पुपुल जयकर या तत्त्वज्ञ जे. कृष्णमूर्तीच्या शिष्या आणि इंदिरा गांधींच्या खास विश्वासातल्या. इंदिरा गांधी, मोरारजी देसाई आणि राजीव गांधी या तीनही पंतप्रधानांच्या काळात त्या सांस्कृतिक सल्लागार होत्या. इंदिरा गांधींच्या काळात देशाच्या सांस्कृतिक पटलावर त्यांच्या विचारांचा ठसा ठळक होता. परदेशात १९८० नंतर झालेल्या ‘फेस्टिव्हल ऑफ इंडिया’ या संकल्पनेच्या त्या जनक. भारतातील जवळजवळ ४-५ हजार ग्रामीण भागातील लोकरंगभूमीवरचे कलाकार या फेस्टिव्हलमधून जगभर फिरून आले. पुपुल जयकर प्रयोगानंतर मोहनला म्हणाल्या की, हे नाटक तुम्ही परदेशात नेलं पाहिजे. मोहननं लगेच बíलन नाटय़ महोत्सवाच्या आमंत्रणाचं सांगितलं. त्या कउउफ च्या उपाध्यक्ष होत्या. मोहननं त्यांच्यासमोर कउउफ मार्फत प्रवास खर्चाचा मुद्दा मांडला.

पूर्व आणि पश्चिम जर्मनीच्या भांडणानंतर कम्युनिस्ट अंमलाखाली असलेल्या पूर्व जर्मनीने १९६१ साली बíलन शहरांच्या मध्ये िभत बांधून दोन देशांत फाळणी केली होती. ही फाळणी पुढे १९९० पर्यंत दोन जर्मन राष्ट्रे एक होईपर्यंत टिकली, हा सर्वश्रुत इतिहास ताजाच आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर पूर्व आणि पश्चिम विभागलेल्या जर्मनीत १९५१ पासून पश्चिम बíलनमध्ये चालू असलेला बíलन आंतरराष्ट्रीय नाटय़ महोत्सव म्हणजे एक मोठं प्रस्थ. या महोत्सवात पीटर ब्रूक, युजेनिओ बार्बा, अरीयान मुश्कीनपासून एकेक दिग्गज आपापली नाटकं घेऊन महोत्सवात सहभागी झालेले! असा इतिहास असलेल्या महोत्सवात प्रथमच मराठी नाटक होणार होतं. त्यांचं महोत्सव आयोजनाचं काम वर्षभर चोख चालू असतं. नाटकाची निवड १-२ र्वष आधी करून सर्व तयारी केली जाते. बíलनमधल्या ७-८ विविध पद्धतींच्या व्यावसायिक नाटय़गृहांतून हा महोत्सव ३-४ आठवडे चाले. बघता बघता ८० साल सुरू झालं. ज्यांच्यामार्फत बíलन दौरा ठरत होता त्या पुण्याच्या मॅक्स म्युलर भवनचा संचालक मेरेकेल बदलून त्याच्या जागी टीलमन वॉलड्रॉफ् आला होता. त्याने आल्या आल्या एप्रिल ८०मध्ये मोहनला सागितलं ‘बíलनवरून तार आली आहे की त्यांना घाशीरामची व्हिडीओ कॅसेट मिळाली नाही. त्यामुळे प्रयोग करता येत नाहीत.’ आमच्या नशिबानं तोपर्यंत घाशीरामचा परदेश दौरा ठरतो आहे अशी कुणकुण कोणाला लागलेली नव्हती. त्या वेळी व्हिडीओ तंत्र अगदीच जुजबी होतं. रंगीत टीव्ही यायचे होते. दरम्यान पुण्याचे एक घाशीरामप्रेमी उद्योजक अविनाश वारदेकर (१९३३-२०१२) यांनी त्यांच्याकडच्या व्हिडीओ यंत्रणेवर भरत नाटय़ मंदिरातला घाशीरामचा एक प्रयोग रेकॉर्ड करून दिला आणि कॅसेट कशीबशी तयार झाली. मोहननं जरा आगाऊपणा करून बíलनला कळवलं की, तुमची तार आली नाही असं आम्ही समजतो. त्याने तात्काळ सूत्रे हलवून कउउफ ला सांगून त्यांच्याकडून एक तिकीट दौऱ्याच्या पूर्वतयारीसाठी मिळवलं आणि मे ८० मध्ये तो बíलनला महोत्सवाच्या ऑफिसमध्ये दाखल झाला. त्याने भारतातील नाटय़संस्था कोणत्याही सरकारी मदतीशिवाय कशा चालतात याची कहाणी कथन केली. घाशीरामचं लोकनाटय़ पद्धतीचं सादरीकरण असल्याने आमच्या बíलनच्या प्रयोगासाठी जागा त्यांनी ठरवली ती म्हणजे एका सर्कसच्या तंबूसारख्या नाटय़गृहाची. पण एकदम चकाचक एअरकंडिशन्ड तंबू! अभिनव पद्धतीनं बांधलेलं आकर्षक टेम्पोड्रोम हे नाटय़गृह. त्याचा पुढचा मुक्काम होता अ‍ॅमस्टरडॅम! कारण तिथेही एक आंतरराष्ट्रीय नाटय़ महोत्सव होता. त्या मुक्कामात अनेक देशांच्या नाटय़ प्रतिनिधींशी मोहननं बस्तान बांधले. त्यांपकी प्रमुख म्हणजे लंडनचा मिशेल जुलियन आणि डेब्रा हावर्. हे दोघे ब्रिटिश आंतरराष्ट्रीय नाटय़ संस्था (British Centre of International Theatre Institute) चे प्रतिनिधी होते. त्यांनी घाशीरामचा एकूण ऐवज बघून लंडनचे प्रयोग आयोजित करण्याचं आमंत्रण दिलं. मग फ्रान्समधले पॅरिस, लिल् आणि रीन् इथले प्रयोग ठरवताना पुण्याच्या निर्मलाताई पुरंदरे यांच्या फ्रान्स मित्र मंडळाच्या पॅरिसमधल्या कार्यकर्त्यां मारीओन्न लेन्डॉर्मी आणि फ्रान्समध्ये स्थायिक झालेली पुण्याची पत्रकार वैजू नरवणे यांची मदत झाली. लंडनच्या महाराष्ट्र मंडळाने दहा दिवस २५-३० घरांत ३५ पुणेकर जेवून-खाऊन ठेवून घ्यायचं मान्य केलं. यासाठी लंडन महाराष्ट्र मंडळाचे शरद दंडवते, किशोर वेंगुल्रेकर, मुकुंद सोनपाटकी, चंद्रलेखा वनारसे, अनिल नेने आदींची विशेष मदत झाली. हे सगळं ठरवून मोहन पुण्यात परतला आणि मग जुल ८० ला रीतसर जाहीर झाले की घाशीराम कोतवाल सप्टेंबर ८० मध्ये जर्मनी, हॉलंड, फ्रान्स आणि इंग्लंडच्या दौऱ्यावर जाणार.

शेवटी व्हायचं तेचं झालं. या बातम्या यायला लागल्यावर मागची सगळी घाशीराम-विरोधाच्या मतभेदाची भुतं पुन्हा जागृत झाली. दिल्लीत एव्हाना जानेवारी ८० मध्ये परत सरकार इंदिरा गांधींचं आलेलं होतं. पुण्याचा खासदार म्हणून आमचा मामा बॅ. विठ्ठल गाडगीळ हा मोठय़ा मतांनी निवडून आलेला होता. तर शरद पवार हे ७८ पासून काँग्रेस सोडून विरोधी पक्षात होते. बॅ. ए. आर. अंतुले हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. घाशीरामच्या बातम्यांनी दिल्लीत केंद्रीय नभोवाणीमंत्री वसंत साठे यांचं पित्त खवळलं. त्यांनी हे असलं नाटकं परदेशी जातंच कसं? असं म्हटलं. दै. ‘लोकसत्ता’चे संपादक नाटककार विद्याधर गोखले यांनी ‘घाशीराम परदेशी गेलं नाही पाहिजे. इतकी वष्रे प्रयोग करून नाना फडणविसांची देशात झाली तेवढी नालस्ती पुरे झाली. आता परदेशी तरी नानांची अब्रू सरकारने दौऱ्यावर बंदी आणून वाचवावी,’ असा घणाघाती अग्रलेख ठोकला. इकडे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी, हा दौरा होतो कसा ते बघतोच, अशी भूमिका घेतली.

अखेर झालं काय? हा तिढा सुटला कसा? शेवटी कोर्टानं काय निर्णय दिला? पंतप्रधान इंदिरा गांधींनी त्यांच्या पत्रकात काय म्हटलं? आणि मुख्य म्हणजे सप्टेंबर ८० मध्ये बाळासाहेबांच्या निवासस्थानी, ‘मातोश्री’च्या गच्चीवर त्या रात्री नेमकं काय घडलं? हे सगळं कळायला आपल्याला फक्त पंधरा दिवसांचा धीर धरायला हवा!  ल्ल

 सतीश आळेकर,
satish.alekar@gmail.com

तळटीप : २०१५ मध्ये कुलकण्र्याच्या वाटय़ाला शाई,
तर १९७२ मध्ये तेंडुलकरांना कर्तारसिंग थत्ते
यांच्या छडय़ा! हिस्टरी रिपीट्स!