लोकेशन होतं हिंगणे स्त्री-शिक्षण संस्थेचं डेक्कन जिमखान्यावरचं होस्टेल- ‘महिला निवास’! इमारतीच्या तळमजल्यावरचा मॉन्टेसरीचा हॉल. छोटी बाकं बाजूला करून सतरंज्या घातलेल्या. इथं पीडीएच्या नाटकाच्या तालमी चालत. नोकरी करणाऱ्या महिलांचं होस्टेल असल्यानं वरती त्यांची मोठी मेस होती. चहा, फराळ तिथून मागवण्याची सोय होती. तेंडुलकरांची नऊ पानांच्या पुढची पानं आता लिहून झाली होती. तेंडुलकर त्यांच्या ‘घाशीराम कोतवाल’ या नाटकाचं वाचन करणार असल्यानं आमच्या अण्णा राजगुरूची लगबग चालली होती. पीडीएचा कोणताही कार्यक्रम असला की सर्व व्यवस्था अण्णाकडेच असायची. गंमत म्हणजे एकदा का कार्यक्रम सुरू झाला, की तो निवांत तर व्हायचाच; पण त्याचा डोळाही लागत असे. कारण तो वाडिया कॉलेजचा स्पोर्ट्स डायरेक्टर होता. त्याला सकाळी सहाला ग्राऊंडवर जाण्यासाठी घर सोडावं लागे. नाटकाची रात्रीची जागरणं व दुपारी संस्थेची अन्य कामं यामुळे त्याची झोप पुरी व्हायची नाही. कोणत्याही नाटकाचं वाचन सुरू झालं की आमचं एक लक्ष असायचं- अण्णा जागा आहे की त्याचा डोळा लागलाय, याकडे. जर वाचनाच्या वेळी त्याचा डोळा लागला तर ते नाटक नक्की चालणार, असा शुभशकुन मानणाऱ्या चावट कलाकारांचा एक गटही आमच्यात होता. हा गट दाखला द्यायचा की बघा- ‘अशी पाखरे येती’च्या वाचनाला अण्णाचा डोळा लागला आणि नाटकाचे वर्षांत शंभर प्रयोग झाले. काही झालं तरी आमच्यात आणि अण्णामध्ये खास जिवाभावाचं नातं होतं. कारण नाटकाची सर्व व्यवस्था तो एकटय़ानं सांभाळत असे.

..तर सतरंज्या टाकलेल्या होत्या. मुंबईवरून आलेल्या नाटककाराच्या प्रतीक्षेत सगळे होते. तेंडुलकर मुंबईहून मुद्दाम नाटय़वाचनासाठी आले होते. तसे ते पुण्याला पीडीएमध्ये पूर्वी आलेले होते. ‘अशी पाखरे येती’चं वाचन व नंतर तालमी बघायला. अण्णानी त्यांना स्टेशनवरून आणण्याची जबाबदारी एक-दोन वेळा माझ्याकडे दिली होती. ‘एक झुलता पूल’चं स्क्रिप्ट त्यांनी अत्यंत काळजीपूर्वक वाचून नंतर त्यावर सविस्तर चर्चा केली होती. पुण्यात टिळक रोडला त्यांचे धाकटे बंधू व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांच्या घरी त्यांचा मुक्काम असे. त्यांच्या वृद्ध आईचा मुक्काम तिथेच असायचा. त्यांच्या शालेय जीवनाची अनेक र्वष याच घरात गेली होती. ते ‘नूमवि’चे विद्यार्थी. विनोदी लेखक वि. वि. बोकील हे त्यांचे शिक्षक होते. बोकिलांनी लिहिलेला ‘विषुववृत्तावरची घोसाळी’ हा धडा आमच्या वेळेपर्यंत शाळेच्या ‘मंगल वाचन’ या मराठीच्या पाठय़पुस्तकात होता. आमच्या दोन पिढय़ांमधला जणू तो एक साहित्यिक दुवा होता. त्यांच्या घराशेजारीच टिळक रोडला प्रकाश रानडे यांचे ‘नीलकंठ प्रकाशन’ हे दुकान आहे. तेंडुलकरांनी प्रकाशला ‘अशी पाखरे येती’ नाटक प्रकाशनासाठी दिलं होतं. ७२ च्या मार्चमध्ये मुंबईला सुरू झालेलं ‘सखाराम बाईंडर’देखील त्यांनीच छापलं होतं. तेंडुलकर राहत होते त्याच घराजवळ प्रकाशनं ‘शब्दकोशातले सगळे शब्द इथे सुंदर होऊन मिळतात’ असा देवीदास बागूल यांनी लिहून दिलेल्या ओळीचा एक मोठा कापडी बॅनर भररस्त्यावर कमानीसारखा लावला होता. त्याखाली ‘सखाराम बाईंडर’ पहिली आवृत्ती संपली’ असं लिहून घेतलं होतं. अशा आमच्या पुण्याच्या पाटय़ा! ७२ मध्ये ‘सखाराम’ रंगमंचावर आल्यावर उडालेल्या असंतोषाच्या धुराळ्याच्या पाश्र्वभूमीवर पुण्यात भररस्त्यात असा बॅनर लावणं हे धाडसाचंच होतं. ‘सखाराम’चा प्रयोग मुंबईत शिवसेनेनं उधळला होता. सर्वत्र जहाल चर्चा सुरू होती की, अशा नाटकांनी समाजाची नीतिमत्ता ढासळेल. नाटकावर अश्लीलतेचा खटलाही चालू होता. सर्व वृत्तपत्रांतून रोज काहीबाही लिहून येत होतं. नाटकाच्या निषेधाच्या सभा होत होत्या. तर एका बाजूला ‘सखाराम’ची हिंदी, इंग्रजी भाषांतरं करणंही सुरू होतं. लेखक, निर्माता- दिग्दर्शक कमलाकर सारंग, कलाकार लालन सारंग, निळू फुले हे त्यांना येत असलेले शिव्या देणारे निनावी फोन आणि घाणेरडी पत्रं यांनी हैराण झालेले होते. कमलाकर एकटा कोर्टात लढत होता. या परिस्थितीला कारणीभूत असलेल्या नाटककाराच्या नव्या नाटकाचं वाचन व्हायचं होतं म्हणून सतरंज्या पसरलेल्या होत्या.

तेंडुलकरांनी ७२ मध्ये ‘सखाराम’ आणि ‘घाशीराम’ ही दोन्ही नाटकं जवळपास एकाच वेळी लिहिली. ‘घाशीराम कोतवाल’चं पहिलं वाचन त्यांनी एनसीपीएच्या साहाय्यक संचालिका कुमुद मेहता यांच्या कारमायकेल रोडवरच्या बंगल्यात केलं. वाचनाला जब्बार गेला होता. तसंच पु. ल. देशपांडे आणि सुनीताबाईही होत्या. वाचनानंतर जब्बारच्या डोक्यात आलं की, नाटकाचं संगीत पुलंनी करावं. पण विचारल्यावर त्यांनी तसा रस दाखवला नाही. ‘घाशीराम’ ऐकल्यापासून जब्बारच्या डोक्यात सतत तेच असे, की नाटकाचं संगीत कोण देणार? तो एकतर्फी नाटकावर बोलत असे, कारण आम्ही कोणीच ते नाटक ऐकलं किंवा वाचलेलं नव्हतं. आमची उत्सुकता ताणलेली होती.

अखेर त्या दिवशी प्रकाश रानडे तेंडुलकरांना त्याच्या फियाट गाडीमधून घेऊन महिला निवासवर पोहोचला. वाचनाला भालबा, जयंत धर्माधिकारी, शशिकांत कुलकर्णी, वसंत नूलकर, श्रीपाद आडकर, दत्ता कळसकर, सेवा चौहान, श्रीराम खरे हे सगळे पीडीए नाटय़संस्थेच्या कार्यकारिणीचे ज्येष्ठ सदस्य हजर होते. ही मंडळी हे नाटक राज्य नाटय़स्पर्धेत जब्बारनं संस्थेतर्फे करायचं, याबद्दलचा अधिकृत निर्णय घेणार होते. जब्बारसोबत आमचा स्टडी ग्रुपचा १०-१२ तरुणांचा गट होता. त्यात रमेश मेढेकर, सुरेश बसाळे, अरविंद ठकार, रमेश टिळेकर, सुनील कुलकर्णी, मोहन आगाशे, विद्याधर वाटवे, श्रीनिवास पानवलकर असे बरेच होते.

तेंडुलकरांनी वाचन सुरू केलं. माईक वगैरे अर्थातच नव्हता. त्यांचा आवाज पातळ. त्यामुळे लक्ष देऊन ऐकावं लागे. दोन अंकी नाटकाची जेमतेम ३६-४० पानं होती. नंतर छापलेली संहितादेखील ४९-५० पानीच आहे. त्यांचं वाचन मात्र नेमकं आणि मुद्दय़ावर आघात करणारं असायचं. उदाहरणार्थ म्हणजे ‘श्रीगणराय नर्तन करी आम्ही पुण्याचे बामन हरी’ म्हणताना ‘बामन हरी’ हे लक्षात यायचंच. ‘बामन हरी’च का? ‘ब्राह्मण हरी’ का नाही? तर नाटकाचा ढाचा परंपरागत लोककलांचा होता; पण व्यंकटेश माडगूळकरांचं ‘बिनबियांचं झाड’, पु. ल. देशपांडेंचा ‘पुढारी पाहिजे’, वसंत सबनीस यांचं ‘विच्छा माझी पुरी करा’ या गाजलेल्या नागर लोकनाटय़ांसारखा नव्हता. नाटकाची रचना आणि आशयाची मांडणी पूर्ण दृश्यात्मक होती. ब्राह्मणांची रांग पूर्ण प्रयोग झुलवत ठेवायची किंवा कसे? संवाद लयबद्ध लिहिले आहेत. ते मंचावर म्हणायचे कसे? आणि एकूणच संगीताचा ढाचा कसा असावा, हे ठरवणं हे दिग्दर्शकाला, संगीत व नृत्य-दिग्दर्शकाला आव्हानच होतं. कारण तेंडुलकरांनी पहिलं नमन आणि दुसऱ्या अंकातलं नानांच्या सातव्या लग्नाचं गाणं वगळता एकाही गाण्याचे शब्द लिहिले नव्हते. कशा प्रकारचं गाणं असावं याचा उल्लेख फक्त केला होता. म्हणजे पहिल्या अंकातील एका प्रसंगात ‘सूत्रधार हरदास बनून देवळात कीर्तन करतो आहे. अभंग रंगात आला आहे. नाना फडणवीस किंचित नाचत येतात आणि आसनस्थ होतात.’ आता ‘किंचित नाचणं’ असं नाटककारानं लिहिलं आहे. दिग्दर्शकानं ‘किंचित नाचणं’ याचा अन्वयार्थ लावून नटाला नेमक्या काय सूचना द्यायच्या? नटानं ‘किंचित नाचायचं’ म्हणजे प्रयोगात नेमकं काय करायचं?

एका बाजूला स्त्रीवर्ग बसला आहे. त्यामधील एका कोवळ्या मुलीवर नानांची नजर खिळते. हरदास झालेल्या सूत्रधाराच्या ते लक्षात येतं. मग अभंगाची एकदम लावणी होते. हे नानांच्या लक्षात येतं. ते भानावर येत सूत्रधाराकडे दृष्टिक्षेप टाकतात. सूत्रधार चपापून सावरत परत अभंग सुरू करतो. पण आता चाल अभंगाची आहे; पण शब्द लावणीचे आहेत. संहितेत फक्त र्अध पान व्यापलेला हा प्रसंग प्रत्यक्ष प्रयोगात दहा मिनिटं चालत असे आणि त्यासाठी संपूर्ण रंगमंचाचा अवकाश व्यापून जात असे. ज्यांनी ‘थिएटर अ‍ॅकॅडमी, पुणे’चा प्रयोग बघितला असेल त्यांना मोहन आगाशेची ‘किंचित नाचत’ होणारी एण्ट्री स्मरणात असेलच. तर असं हे दृश्यात्मक नाटक असणार होतं. एका पातळीवर नाटकाचा आशय लिखित शब्दांतून फक्त नाटकाच्या गोष्टीपुरता व्यक्त होत होता, तर दुसऱ्या पातळीवर अन्वयार्थ नाटकाच्या लिखित वाक्यांच्या उपसंहितेमधून- म्हणजे ‘सब-टेक्स्ट’मधून अधोरेखित होत होता. एकव्यक्तिकेंद्रित अमर्याद सत्ता जनतेला सर्वभ्रष्ट तर करतेच; पण सार्वत्रिक ऱ्हासासही कारणीभूत होते. लेखकाने गोष्टीचा काळ ऐतिहासिक घेतला होता, पण त्याचं सादरीकरण लोककलांच्या फोडणीतून- म्हणजे अनैतिहासिक पद्धतीनं होतं. त्यातून चालू राजकारणावर.. एकूणच सत्तेच्या राजकारणासंदर्भात अनेक अर्थ सहज निघू शकतात. इथे वानगी म्हणून नाना आहेत. पण गंमत म्हणजे प्रत्यक्ष प्रयोगात रंगमंचावर नाचगाणीयुक्त निर्भेळ करमणूक चालू असताना त्याजागी आपण आपल्या अनुभवविश्वाच्या परिघानुकूल शोषण करणारी यंत्रणा, तत्त्व, विचारसरणी, स्वानुभव यांची कल्पना करू शकतो. सर्वच अभिजात कलाकृतींबद्दल असंच म्हणता येईल. फक्त अभिजातता लादता येत नाही. कालौघात समकालीनत्वानं ती उमलून येत असते.

वाचनावर एकूण प्रतिक्रिया गप्प बसण्याचीच होती. तेंडुलकर तर मुळातच कमी बोलणारे. तेही गप्प. आमच्या तरुणवर्गात मात्र उत्सुकता- की कोण कुठलं काम करणार? गाणार कोण? नाचणार कसं? एकूण सगळा अवघड प्रकार दिसतोय. पीडीएमधल्या ज्येष्ठांची खरी चर्चा तेंडुलकर तिथून गेल्यावर झाली. एकूण हे नाटक संस्थेनं करू नये असा सूर होता. कारण त्यातील नाना फडणवीसांचं चित्रण आणि ब्राह्मणांवरच्या टीकेचा सूर! पण भालबा त्यांना समजावीत होते की, आपण लेखकाला शब्द दिला आहे, तेव्हा नाटक जब्बारला करू दे. स्पर्धेचा प्रयोग झाल्यावर पुढे बघू. आम्हाला नाटकात वावगं असं काही वाटत नव्हतं. कारण हे सगळं खरं नसून व्यंगचित्रात्मक होतं. इतिहासाचा नाममात्र आधार होता; पण हे नाटक काही ऐतिहासिक नाही. सगळी पात्रं नाचताहेत, गाताहेत. अगदी नानासुद्धा नाचतच येतात.

एकदा नाटक बसवायचं ठरवल्यानंतर जब्बारच्या पुण्याला नियमित चकरा सुरू झाल्या. त्यानं जाहीर केलं की, ऑगस्ट ७२ मध्ये तालमी सुरू करून अंदाजे डिसेंबरमध्ये राज्य नाटय़स्पर्धेत प्रयोग. आणि जब्बारनं मला त्याचा साहाय्यक दिग्दर्शक केलं. याचं कारण कदाचित ‘एक झुलता पूल’चं स्पर्धेतलं यश असावं. शिवाय त्याचा दौंडला दवाखाना नुकताच सुरू झालेला होता. त्यामुळे तो दौंडवरून तालमींना ट्रेननं उशिरा रात्री १० पर्यंत येणार. तोपर्यंत आदल्या दिवशी बसलेल्या सीनची मी तालीम घ्यायची. इकडे जब्बार-मणीचा संसारही विस्तारत होता. त्यांची मोठी मुलगी जस्मीन (सध्याची लंडनस्थित डॉ. जस्मिन पटेल!) हिची मार्च ७२ मध्येच एन्ट्री झाली होती. हे कौटुंबिक कारणही होतंच. नाटकाची निर्मिती अण्णा बघणार होता. जब्बारची धावपळ होणार हे उघड होतं. आमच्यापुढे अडचणी भरपूर होत्या. संगीत दिग्दर्शक शोधायचा होता. अंदाजे सुरांत गाणारे ४० कलाकार हेरायचे होते. वादक शोधायचे होते. एवढय़ा संचाला घेऊन तालमीची जागा मिळणं आवश्यक होतं. ४० कलाकारांची काळानुरूप वेशभूषा कशी करून घ्यायची, हाही प्रश्न होताच. आणि या सगळ्या कलाव्यवहारात वर माझी नव्यानं लागलेली बी. जे. मेडिकलमधली नोकरी टिकवायची! तेंडुलकरांचं वाचन जुलैमध्ये झालेलं. पुढची जुळवाजुळव कशी करायची, अशा चिंतेत असतानाच आमच्या अण्णानं एकदम गणेश चतुर्थीला (११ सप्टेंबर ७२) नाटकाचा मुहूर्त ठरवला. तो म्हणे की त्याशिवाय सगळ्याला गती येणार नाही!

मुहूर्त ठरल्यावर एक झालं- की जब्बार, मी, अनिल जोगळेकर आणि अण्णा यांच्या भेटी नियमित व्हायला लागल्या. पु. ल. तर नाही म्हणाले होते. मग अनिलच्या डोक्यात आलं की अण्णासाहेब म्हणजे प्रसिद्ध संगीतकार सी. रामचंद्र (रामचंद्र नरहर चितळकर.. १९१८-१९८२) पुण्यात फग्र्युसन कॉलेजसमोरच्या शिरोळे रोडवर राहतात.. त्यांना विचारू. अनिल चित्रपट संगीताचा वेडा. सिनेमा संगीताची सर्व माहिती त्याला अचूक. संगीतपरंपरा आणि नवता यांच्या अचूक मेळाचे भान  सी. रामचंद्र यांच्याइतकं दुसऱ्या कोणात नाही. एका बाजूला ‘ये जिंदगी उसी की हैं’, ‘आधा है चंद्रमा रात आधी’, ‘कितना हसीन मौसम’, ‘तू छुपी ही कहां’, ‘ऐ मेरे वतन के लोगों’ यासारखी गाणी, तर दुसरीकडे ‘शोला जो भडके’, ‘इना मीना डिका’ अशी गाणी. दोन्ही बाजू जबरदस्त. त्यांच्या बंगल्यावर एका रविवारी सकाळी वाचन झालं. अण्णासाहेब चितळकर एकदम उंच, रुबाबदार व्यक्तिमत्त्व. त्यांचे स्नेही वामनराव चोरघडे व विमल चोरघडे हेही हजर होते. नाटक त्यांना आवडलं असावं, पण विशेष बोलले नाहीत. वाचनानंतर त्यांनी विचारलं की, ‘गाण्याच्या रेकॉर्डस् कोण काढणार? एक एलपी निघेल की दोन?’ आम्ही गप्प. आता हौशी नाटय़संस्थेच्या संगीत नाटकाच्या कोण रेकॉर्डस् काढणार? शिवाय हे नाटक काही परंपरागत संगीत नाटक नव्हतं. काही जुळून न आल्यानं आम्ही इतर गप्पा मारून परत!

आमचा पुढचा मुक्काम होता पं. अभिषेकीबुवा! त्यावेळी ‘कटय़ार काळजात घुसली’चे प्रयोग जोरदार चालू होते. जितेंद्र अभिषेकी यांच्या संगीतानं मराठी नाटय़संगीताचा ढाचाच बदलून टाकला होता. कानेटकरांच्या ‘लेकुरे उदंड जाहली’ नाटकाला त्यांनी दिलेल्या संगीतानं एकदम नवा नाटय़संगीत बाज आलेला होता. आठवा-‘आमच्या या घरात माणसांना लागलंय खूळ.. यातली गोम अशी आहे की..आम्हाला नाही मूल!’ श्रीकांत मोघे हे म्हणत असत. संवाद कधी संपतो नि गाणं कधी सुरू झालं, हे कळायचंच नाही. जणू संगीत आणि संवाद यामधली जागाच अभिषेकीबुवांनी आपल्या संगीत- प्रतिभेने पुसून टाकली होती. व्यावसायिक नाटय़क्षेत्रात त्यांचा विलक्षण दरारा असायचा. अभिषेकीबुवांना साहित्यात रुची. त्यांच्या कथा, कविता ‘सत्यकथा’- सारख्या मासिकात प्रसिद्ध होत. त्यांचं वाचन अद्ययावत असायचं. जब्बारबरोबर एक दिवस आम्ही बुवांना भेटायला गेलो. ते तेव्हा जरा विरक्तीच्या मूडमध्ये एकटेच लोणावळा-कामशेतदरम्यान एका छोटय़ा बंगल्यात राहत होते. शिष्य बरोबर असायचे. अंगावर त्यांनी धवल वस्त्र परिधान केले होते. गळ्यात रुद्राक्षाची माळ होती. त्या पोशाखातही बुवा अत्यंत तेजस्वी आणि रुबाबदार दिसत होते. त्यांनी नाटक ऐकलं. त्यांना ते आवडलं. म्हणाले की जेवून जा! मग त्यांनी चूल पेटवली आणि ते खिचडी करायला लागले. अत्यंत मन:पूर्वक ते स्वयंपाक करत होते. एका बाजूला त्यांचं सुरेल गुणगुणणं चालू होतं. नंतर म्हणाले की, ‘नाटक अप्रतिम आहे. नव्या पद्धतीचं एक्स्परिमेंटल आहे. काळानुरूप आणि राजकीय आहे. करायला मजा येईल. पण मी व्यावसायिक गायक- वादकांचा संच घेऊन करीन. हौशी राज्य नाटय़स्पर्धा काही मला जमेल असं वाटत नाही.’ आम्ही आपले खिचडी खाऊन पुण्याला परत!

आता काय बरं करायचं? अण्णानं ठरवलेला ११ सप्टेंबरचा मुहूर्त तर जवळ येत चालला होता. परतीच्या प्रवासात जब्बार एकदम म्हणाला.. ‘भोवरा गरगरतो आहे आणि माझ्या चिमुकल्या मनात प्रचंड विश्वमालेचं शल्य अजून सलतं आहे! विश्वमाला पिसाटपणे भिरभिरते आहे. पण कोण्या एका चिमुकल्या ग्रहावर लाखांच्या समुदायात गरगरणाऱ्या मला मात्र भोवळ येत आहे. भोवळ येत आहे.. भोवरा गरगरतो आहे!’

याचा उलगडा असा की- वसंत कानेटकरांचं ‘देवांचं मनोराज्य’ या १९५८ साली केलेल्या नाटकाचं भालबांनी दोन-तीन वर्षांपूर्वी राज्य नाटय़स्पर्धेच्या निमित्तानं पुनर्निर्माण केलं होतं. त्यात प्रमुख भूमिका जब्बारची होती. नाटकाच्या सुरुवातीला कानेटकरांनी एक छोटं स्वगत लिहिलं होतं. स्टेज अंधारात असताना धीरगंभीर आणि घुमणाऱ्या आवाजात ते ऐकू येत असे. त्याची सुरुवात वरीलप्रमाणं होती. ‘भोवरा गरगरतो आहे..’! तो साऊंड ट्रॅक आणि नाटकाचं पाश्र्वसंगीत केलं होतं पं. रविशंकर यांचे पुण्यातले शिष्य भास्कर चंदावरकरांनी. त्यावेळी ते फिल्म इन्स्टिटय़ूटमध्ये संगीताचे प्राध्यापक होते. महाराष्ट्रीय कलोपासकच्या सगळ्या नाटकांना पाश्र्वसंगीत त्यांचंच असायचं. ‘देवांचं मनोराज्य’च्या रेकॉर्डिगच्या वेळी जब्बारची आणि त्यांची गाठ पडली होती. त्यांची काम करण्याची पद्धत, त्यांचं वाचन, एकूणच त्यांचा कलेकडे बघण्याचा दृष्टिकोन बघता त्यांचं आणि आम्हा तरुण मंडळींचं जमेल असं जब्बारला वाटलं असावं. कर्वे रोडच्या नळ स्टॉपजवळच्या एका बंगल्यात ते तेव्हा राहायचे. त्यांनी आणि त्यांच्या पत्नी मीनाताईंनी अत्यंत कलात्मकरीत्या सजवलेलं त्यांचं घर होतं. दोघांची अभिरुची उभयतांना पूरक. पण कार्यक्षेत्रं वेगळी. बालशिक्षण हे मीनाताईंचं क्षेत्र. त्यांनी यशस्वीरीत्या राबविलेला अभिनव विद्यालयातला बालशिक्षणाचा प्रकल्प आजही शालेय शिक्षण क्षेत्रात सर्वत्र नावाजला जातो. भास्करराव जगभर फिरून आलेले. सर्वच क्षेत्रांत त्यांना रुची आणि अचूक माहिती. सोप्या भाषेत क्लिष्ट तत्त्वांचं निरूपण करणं हा त्यांचा हातखंडा. तऱ्हेतऱ्हेची वाद्यं घरी मांडून ठेवलेली. ते स्वत: उत्तम चित्रकार होते. अगणित पुस्तकं घरी. त्यावेळचा त्यांचा छंद म्हणजे छोटय़ा अ‍ॅनिमेशन फिल्म्स तयार करणं. तर भास्करराव म्हणजे आमचा वर्ल्ड एन्सायक्लोपीडियाच होता. शेवटी जमलं. जब्बारला हे आधी कसं सुचलं नाही? एकूण एखाद्या गोष्टीची वेळच यावी लागते. मुहूर्त तर जवळ आलेला! संगीतकार तर ठरला. आता सुरांत गाणारे चाळीस ब्राह्मण शोधणं! पण एवढे आणायचे कुठून?

अरे हो, एक महत्त्वाचं सांगायचं राहिलंच. तेंडुलकरांचं वाचन संपलं आणि आमच्या सगळ्यांचं लक्ष अभावितपणे अण्णाकडे गेलं. तर त्याचा डोळा लागला होता. म्हणजे आता नाटक चालणारबिलणार की काय?

 

सतीश आळेकर -satish.alekar@gmail.com