जोडी नंबर एक :
तसे ते दोघं मला ७२ पासून- म्हणजे मी पुणे विद्यापीठात शिकत असल्यापासून माहिती होते. नेहमी ते विद्यापीठातल्या अनिकेत कॅन्टीनच्या अड्डय़ावर असायचे. पण कॅन्टीनमध्ये कमी. नेहमी दिसायचे ते कॅन्टीनशेजारच्या रिक्रिएशन रूममध्ये.. टेबल टेनिस आणि चेस खेळताना. दोघंही खूप सिग्रेटी ओढत. दोघंही विद्यापीठाच्या गणित विभागात संख्याशास्त्राचे-स्टॅटिस्टिक्सचे विद्यार्थी. पण तेव्हा काय कल्पना, की त्यांचा आणि माझा ऋणानुबंध पुढे बी. जे. मेडिकल कॉलेजच्या नोकरीत इतकी र्वष जुळून येईल? काही योगच असे येतात- आणि ते येण्याला काहीही कारणं नसतात, एवढं मात्र खरं! पण हे असे योग प्रत्यक्षात आले तर तो योगायोग. आमच्या नाटकात ते अस्थानी आले तर ती युक्ती आणि जर नाटकाच्या ओघात ते योग चपखल बसले तर ती नाटककाराने केलेली नाटकाची सुयोग्य बांधणी- म्हणजे ‘क्राफ्ट’ या अर्थी.

आमच्या बी. जे. मेडिकल कॉलेजच्या रोगप्रतिबंधक व सामाजिक औषध विभागात ७३ मध्ये सांख्यिकी (वर्ग २) ची दोन शासनमान्य पदे भरायची होती. ‘सांख्यिकी’ म्हणजे स्टॅटिस्टिशियन. त्यांचं काम वैद्यकीय संशोधनाच्या माहितीचं पृथक्करण करणं. साथीच्या विविध रोगांनी तसंच आजारांनी ग्रस्त रुग्ण, त्यांचा आहार, राहणीमान इत्यादीसंबंधी गोळा केलेल्या माहितीचं संख्याशास्त्रानुसार वर्गीकरण करणं, तसंच त्यांना गणिती मापदंड लावून काढलेले निष्कर्ष त्या रोगांचा प्रतिबंध होण्यासाठी व डॉक्टरी निदानासाठी सामाजिक स्तरावर कितपत उपयुक्त ठरतील याचा अंदाज संशोधकांना देणं. थोडक्यात, शितावरून भाताची परीक्षा करणं. पुन्हा योगायोग असा, की या दोन पदांसाठी विभागात अर्ज आले ते वर वर्णन केलेल्या दोघांचेच! हे दोघंजण एकदमच मुलाखतीला गेले. एवढंच नव्हे तर दोघंही निवडले गेले आणि एकाच दिवशी एकाच वेळी विभागात कामावर रुजू झाले. हे सगळं झालं ७३-७४ दरम्यान. त्यांची नोकरीत रुजुवात होऊन आता एक-दोन र्वष होत होती. दरम्यान, दोघांचीही लग्नं ठरली. असं सगळं रीतीला धरून शासकीय नियमाप्रमाणे सुरू होतं.

आमच्या विभागाकडे येणारी साथीच्या रोगांची संशोधनं ही आगीच्या बंबासारखी असत. कारण कधी कोणत्या रोगाची साथ येईल हे अचूक सांगता येत नाही. शहरात जर कुठल्या रोगाची साथ आली तर महानगरपालिकेमार्फत आणि ग्रामीण आरोग्य केंद्र परिसरात साथ आली तर सार्वजनिक आरोग्य विभागातून निरोप यायचा. मग रोगप्रतिबंधक व सामाजिक औषध विभागाची आमची संशोधन टीम ससूनच्या गाडीमधून आगीच्या बंबाप्रमाणे ईप्सित स्थळी कूच करीत असे.

यावेळी साथ आली होती ती काविळीची; आणि ईप्सित स्थळ होतं- येरवडय़ातील जेलजवळचं राज्य शासनाचं ‘येरवडा इंडस्ट्रियल स्कूल.’ जेलसारखीच जुनी, दगडी, ब्रिटिशकालीन इमारत. नावाला शाळा; पण प्रत्यक्षात बेवारशी, अनाथ, प्रवाहपतित अशा किशोरवयीन मुलांचं जेलच. जब्बारच्या ‘उंबरठा’ या चित्रपटाचं सर्व चित्रीकरण ८२ मध्ये याच वास्तुमधलं. प्रा. डॉ. प. वि. साठे यांच्या नेतृत्वाखाली आमची टीम तिथे पोहोचली. सुमारे ३००-४०० किशोरवयीन-म्हणजे १२ ते १७ या वयोगटातील मुलं त्या ठिकाणी निवासासाठी होती. अपुरी जागा, कमालीची अस्वच्छता, अपुरी स्वच्छतागृहे असा सगळा परंपरागत शासकीय यंत्रणेचा सीन होता. एकूण मुलांपैकी जवळपास ८०% मुलं कावीळग्रस्त होती. पाहणी करून डॉ. साठे यांनी कावीळ होण्याची मीमांसा लगेचच केली. कावीळची ही साथ दूषित पाण्यामुळे आली होती. कारण नवीन टाकलेली ड्रेनेज पाइपलाईन ही पिण्याच्या पाण्याच्या पाइपलाईनच्या खालून न टाकता त्या मूर्ख कंत्राटदाराने वरून टाकली होती. कारण मग जास्त खोल खणायला नको. हे कुणाच्या लक्षात येईपर्यंत ड्रेनेज लिक होऊन ते घाण पाणी जमिनीतून खालून जाणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या जुन्या गंजलेल्या पाइपलाईनीत मिसळत होतं. ड्रेनेजची चेम्बर्स फुटलेली होती. स्वच्छतागृह परिसरात सर्वत्र दरुगधी पसरलेली. आणि अशा वातावरणात नळावाटे येणारं दूषित पाणी ही मुलं पीत होती. त्यामुळे सगळ्यांना कावीळ झालेली. या ३००-४०० मुलांची तपासणी, रक्ताचे नमुने घेणं चालू असतानाच कुणीतरी निरोप आणला म्हणून आमच्याबरोबर असणारी ही ‘सांख्यिकीं’ची जोडी त्वरेने निघून गेली. काय बरं असं कारण असावं, की या दोघांना अचानक संशोधन सोडून जावं लागलं?

याचा उलगडा होण्यासाठी संध्याकाळ उजाडली. आमची टीम दमून बी. जे. ला पोचली आणि शिरस्त्यानुसार शेट्टीच्या कॅन्टीनमध्ये गेलो, तर ही जोडी बसलेली. चेहरे चिंताग्रस्त. काय झालं, काही कळेना. मग उलगडा झाला तो असा : विभागात ‘सांख्यिकी’ची दोन पदे होती. या दोन्ही पदांवर हे दोघं रुजू होऊन आता दोन वर्षे झाली होती. पण शासन नियमानुसार जोपर्यंत ही पदे राज्य निवड मंडळ- म्हणजे एम. पी. एस. सी.मार्फत भरली जात नाहीत तोवर या पदांवरची नेमणूक ही हंगामी असते. म्हणजे फक्त एकेक वर्षांची नेमणूक बी. जे. मेडिकलचे डीन करू शकतात. तर त्या दिवशी एक गृहस्थ मुंबईहून आलेले. त्यांच्याकडे मुंबईच्या आरोग्य शिक्षण आणि संशोधन संचालनालयाचा बी. जे. मेडिकलमध्ये आमच्या विभागात ‘सांख्यिकी’ पदावर नेमणूक झाल्याचा आदेश. आता संचालनालयाचा आदेश म्हणजे डीनपेक्षा वरचा. अस्तित्वात पदे दोन. नवीन माणसाला रुजू करून घ्यायचं तर आधी रुजू झालेल्या या आमच्या दोन मित्रांपैकी एकाला जावं लागणार. दोन पदं जर सारखी असतील आणि नेमणूक जर हंगामी असेल, तर दोन्हीपैकी जो ज्युनियर असेल त्याची नेमणूक रद्द होते, हा शासन नियम. पण हे आमचे दोन्ही मित्र एकाच दिवशी, एकाच वेळी पदांवर रुजू झालेले. शासन सेवेत वरिष्ठ आणि कनिष्ठ यांचे माहात्म्य फार! मग दोघांत ज्युनिअर कोण आणि सीनिअर कोण, असा पेच. दोघांची लग्नं ठरलेली. म्हणून त्यांचे चेहरे पडलेले आणि सिगारेटमागून सिगारेट सुरू. सरकारी नोकरीत दोघांपैकी कोण राहणार आणि कोण जाणार? तर मंडळी, सगळं सुरळीत सुरू असताना परिस्थितीने नकळत एकदम असं नाटय़पूर्ण वळण घेतलेलं. दोघंही गप्प. जुजबी बोलणं चालू. निर्माण झालेल्या परिस्थितीचा निचरा होण्यास दोन-तीन दिवस लागले. अर्थातच ही शासकीय चूक होती. ती लक्षात येऊन संचालनालयाचा सुधारित आदेश अखेर आला आणि ते तिसरे गृहस्थ जसे आले तसे अन्य ठिकाणी गेले. ताण निवळला. नोकऱ्या कायम राहिल्या व आमचं काविळीच्या साथीचं संशोधन पुढे मार्गस्थ झालं.

कोण नोकरीत राहणार आणि कोण जाणार, या ताणात या जोडीचे ते दोन-तीन दिवस मी फार जवळून पाहिले. मला या दोघांकडे बघताना वाटत होतं, की मी जणू त्यांचा साक्षीदारच आहे आणि माझ्या समोर त्यांची मैत्री जणू डिसेक्शन टेबलावर निचेष्ट पडलीय. वाटलं की, जसे दोन अनोळखी माणसांत काही कारणांनी मैत्रीचे धागे घट्ट जुळतात, तसंच काही कारणांनी ते क्रमश: विरत जाऊन ती माणसं पुन्हा एकमेकांना पूर्ण अनोळखी होत असतील का? प्रत्यक्षात नाही होणार असं.. पण मग आमच्या नाटकात व्हायला काय हरकत आहे?
तर हा होता प्रसंग ७३-७४ मधला. आणि ही आमची जोडी नंबर एक म्हणजे आमचे मित्र हेमंत अर्णीकर आणि श्रीकांत जोगळेकर. हेमंत हा आमच्या पुणे विद्यापीठातल्या न्युक्लीयर केमिस्ट्रीचे प्राध्यापक डॉ. एच. जे. अर्णीकर यांचा मुलगा. नंतर तो ऑस्ट्रेलियामध्ये उत्तम नोकरीत स्थिरावला आणि श्रीकांत पुण्याच्या व्यंकटेश्वर हॅचरीच्या सेवेत उच्चपदावर गेला. श्रीकांत म्हणजे सर्व खेळांचा चालताबोलता विश्वकोश! विशेषत: क्रिकेटचा. कोण कधी, केव्हा, कसा आऊट झाला? तो बॉल कसा पडला, हे सगळं याचं तोंडपाठ. स्तिमित करणारी स्मरणशक्ती त्याला लाभली होती. दुर्दैवाने आज दोघंही आपल्यात नाहीत.

जोडी नंबर २ :

प्रल्हाद वाघ आणि त्र्यंबक खरे या जोडीतले वाघ हे कायम खुर्चीत बसलेले का असत, आणि खरे हे काऊंटरजवळ कायम उभे का असायचे, याचं कारण मी त्यांना कधी विचारलं नाही आणि ते स्वत:हून काही बोलतील अशी त्यांच्या स्वभावानुसार शक्यताही नव्हती. त्यामुळे ते कोडं अजून तसंच आहे. मी त्यांना ६९ पासून ७४ पर्यंत पाहत होतो. ही जोडी असायची प्रकाश रानडे यांच्या नीलकंठ प्रकाशनच्या टिळक रोडवरच्या चिंचोळ्या दुकानात. वाघ हे उंचीने कमी. दिसायला सावळे. मिश्या राखलेल्या. कायम दुटांगी धोतर. रंग न कळेल असा शर्ट. वर मळखाऊ कोट आणि डोक्यावर काळी किंवा तपकिरी टोपी. ते चष्मा लावायचे; पण त्याला कायम एकच काडी. आणि दुसऱ्या काडीऐवजी दोरा लावून तो कानात जानव्यासारखा अडकवलेला. त्यांनी त्यांच्या चष्म्याला दुसरी काडी कधी का लावून घेतली नाही, याचंही उत्तर ते कायम खुर्चीत का बसलेले असायचे, या प्रश्नाप्रमाणेच आजवर अनुत्तरित राहिलं आहे. त्यांच्याजवळ तपकिरीचा मंद गंधही दरवळत असे. तर दुसरे त्र्यंबक खरे! हे त्यामानाने दिसायला उजळ. व्यवस्थित दाढी केलेली. ब्राह्मणी पद्धतीचं धोतर आणि वर मळखाऊ रंगाचा, गुढघ्याच्या खाली येईल असा फूल शर्ट आणि डोक्याला काळी टोपी. कपाळाला कायम गंध. दोघांचेही चेहरे मात्र अत्यंत निर्विकार. दुकानात कोणीही आलं की हे कायम त्या व्यक्तीचं निरीक्षण अशा पद्धतीने करायचे, की आलेल्या व्यक्तीला पुस्तकाच्या दुकानात आल्याची लाज वाटली पाहिजे. आलेल्या गिऱ्हाईकाने जर काही विचारलं तरच दोघांपैकी कोणीतरी बोलणार. पण स्वत:हून चकार कधी शब्द काढणार नाहीत की गिऱ्हाईकाला विचारणार नाहीत, की काय हवंय, वगैरे. वाघ कायम खुर्चीत हिशेब करीत बसलेले आणि खरे पुस्तकांचे गठ्ठे बांधत उभे. ६३ मध्ये प्रकाशचे वडील दामूअण्णा रानडे यांनी त्यांना बहुधा चित्रशाळा प्रेसमधून आणलं असावं. या जोडीपैकी खरे हे भिक्षुकीदेखील करीत असत.

तो दिवस गुरुवार होता हे मला पक्कं आठवतंय. संध्याकाळी नीलकंठच्या अड्डय़ावर गेलो तर जरा जास्तच शांतता जाणवली. म्हणून बघतो तर चिंचोळ्या दुकानाच्या अंत:पुरात असलेल्या अंदाजे सहा ७ सात फुटांच्या जागेत एक टेबल आणि फक्त दोन खुच्र्या. कारण तेवढीच जागा होती. टेबलामागच्या त्यातल्या त्यात चांगल्या खुर्चीवर नाटककार वसंत कानेटकर बसलेले. हे वातावरणात शांतता असण्याचं कारण होतं. दुकानाच्या मागच्या बाजूला वाडय़ाची मोठी मोरी होती. आणि पलीकडेच लागून एक दुधाची डेअरी असल्याने दुकानात आवाज यायचे ते दुधाची मोठ्ठी ओशट भांडी, पत्र्याच्या मोठय़ा बरण्या घासत असल्याचे. कधीही गेलं तरी हे भांडी घासणं चालूच असायचं. त्या डेअरी मालकाचं आणि नाटक, साहित्याचं एवढं वितुष्ट का होतं, कोण जाणे. पण दुकानात कोणीही आलं- अगदी दुकानात भारतरत्न लता मंगेशकर आलेल्या असतानादेखील या भांडी धुण्यात आणि त्यांच्या मोठय़ाने येणाऱ्या आवाजात कधी खंड पडला नाही याचा मी साक्षीदार आहे.
तर तो दिवस गुरुवार होता. कानेटकरांना कुठं जायचं होतं म्हणून ते निघाले. प्रकाशने माझी त्यांच्याशी ओळख करून दिली. ‘एकांकिका लिहितो’ वगैरे सांगितलं. त्यावर त्यांनी जरा कौतुकानं विचारपूस केली आणि म्हणाले की, ‘एक लक्षात ठेवा. रॉयल्टी घेत चला. प्रयोग कोणाला कधी फुकट करू देऊ नका. नाटकं लिहिता तर मनीऑर्डर घेऊन पोस्टमन रोज घरी यायला हवा..’ असं बोलून ते मार्गस्थ झाले. दुधाच्या भांडय़ांच्या आवाजाचं पाश्र्वसंगीत सुरूच होतं. तेव्हढय़ात प्रकाश एकदम उठून बाहेर टिळक रोडच्या बाजूला गेला. त्र्यंबक खरेही तिथे उभे. आणि बघतो तर प्रल्हाद वाघही चक्क खुर्चीतून किंचित उठल्यासारखं करत होते. म्हणून मी पण गेलो. तर रस्त्यावर एक गोरापान, सडपातळ बांध्याचा, म्हातारा इसम अनवाणी उभा. चेहऱ्यावर बायकी भाव. स्वच्छ दुटांगी धोतर नेसलेला. वर गुढघ्यापर्यंत खाली येणारा हाफ शर्ट घातलेला. कपाळावर गंधाची उभी चिरी. आणि बायकांप्रमाणे भरपूर वाढवलेले, अर्धवट काळे-पांढरे केस मानेवरून खाली सोडलेले. खांद्यावर उदबत्तीच्या पुडय़ांनी भरलेली, शिवून घेतलेली पिशवी. एका पायात काळा दोरा बांधलेला आणि त्यात अडकवलेलं एक घुंगरू. एका हातात उदबत्तीचा पुडा. दुसऱ्या हाताने तो बायकी हावभाव करीत अत्यंत आर्जवी सुरात म्हणत होता, ‘‘काय? घेणार का? छान वासाचा आहे म्हटलं पुडा! घ्या ना!’’ असं म्हणत तो पुडा पुढे करत होता. आणि खरे पुडा घ्यायला गेले की तो त्याचा हात एकदम मागे घेई आणि मग पायांनी किंचित ताल धरल्यासारखा नाचे, एखादी गिरकी घेई, आणि परत पुडा पुढे करत म्हणे, ‘‘अहो, घ्या ना!’’ असं एक-दोन वेळा होऊन मग तो उदबत्तीचा पुडा त्याने खरेंना दिला. खरे म्हणाले की, तो इसम पूर्वी म्हणे संगीत नाटकांमधून किरकोळ स्त्री-भूमिका करत असे. तो दिवस गुरुवार होता हे लक्षात राहण्याचं कारण म्हणजे तो उदबत्तीवाला फक्त दर गुरुवारीच दुकानात येत असे आणि वरीलप्रमाणे कृती करून पुडा दिल्यावर एक रुपया घेऊन जात असे.
तर उदबत्तीचा पुडा देऊन तो गेला. मग वाघ परत आपल्या खुर्चीत पूर्ण बसले आणि खरे काऊंटरवर पूर्ववत उभे. कदाचित पुढच्या गुरुवारची वाट बघत!

जोडी नंबर तीन :

तिसऱ्या जोडीचं लोकेशन होतं- बालगंधर्व रंगमंदिरसमोरची घोले रोडवर पूर्वी असणारी चार मजली खूप जुनी घोल्यांची चाळ. चाळीच्या मालकांपैकी एक विक्रम घोले हा माझा पुणे विद्यापीठात वर्गमित्र हे मागे येऊन गेलेलं आहेच. सगळ्यात वरच्या मजल्यावर तो राहत असे. त्यामुळे त्याच्या घरी जायचं म्हटलं की पाच-सहा अंधारे, कुरकुर वाजणारे, जुनाट लाकडी जिने चढावे लागत.
एक दिवस संध्याकाळी जिने चढत असताना दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्याच्या जिन्यामध्ये एक अंधारी, जेमतेम एखादा माणूस मावेल अशी रिकामी चौकोनी जागा दिसली. जागा अत्यंत स्वच्छ होती. त्यावर अंथरूण टाकलेलं. तेही सुरकुत्या नसलेलं. साधंच, पण नेटकं. त्यावर एक जरासा राकट वाटेल असा मध्यमवयीन इसम पहुडलेला. त्याच्या पायापाशी एक त्याच्याच वयाचा कृश इसम त्याचे पाय चेपत बसलेला. बाजूला एक कंदील लावलेला. त्यामुळे छायाप्रकाश एकदम नाटकासारखा सभोवती पडलेला. नाटकाचा सेट लावल्यासारखंच दृश्य दिसत होतं. ज्या ज्या वेळी मी संध्याकाळी जिना चढायचो त्या वेळी हे दृश्य हमखास दिसायचं. विक्रम एकदा म्हणाला की, जो गादीवर झोपलाय तो पांगळा आहे. त्याला चालता येत नाही. दुसरा जो पाय चेपतोय तो त्या पांगळ्याला पूर्ण सांभाळतो. त्याला तो रोज पाठुंगळी घेऊन जिने चढतो-उतरतो. समोर नदीवर जाऊन त्याला आंघोळ घालतो. त्याचं सगळं तो बघतो. दिवसभर दोघं संभाजी पार्कमध्ये भीक मागतात. संध्याकाळी इथे जिन्यात येतात. बदल्यात पहाटे उठून चाळीचे सगळे जिने झाडून देतात. सगळ्यांचे कचऱ्याचे डबे टाकतात. चाळीत राहणारे त्यांचं उरलेलं अन्न रात्री त्यांना देत असतात. जो पांगळा आहे तो रागीट आहे. तो सांभाळ करणाऱ्याला घाण शिव्या देतो. प्रसंगी त्याला मारतो, तुडवतो. आणि दुसरा काहीही न बोलता त्याचं बोलणं, मार आणि शिव्या खातो. हे सगळं ७१-७२ दरम्यानचं.
या आमच्या तिसऱ्या जोडीला नावं नाहीत.. म्हणजे मला माहिती नाहीत. पण मला आपलं वाटून गेलं की, तो निमूटपणे मार खाणारा, दर गुरुवारी येणारा, जुन्या संगीत नाटकांतून किरकोळ स्त्री-भूमिका केलेला उदबत्तीवाला का बरं असू नये!

तर अशा या तीन भिन्न ठिकाणच्या वेगळ्या काळांतल्या जोडय़ा. या एकत्र यायला ७६ मध्ये आम्हाला ‘घाशीराम’ घेऊन कोचीनला जावं लागलं. महाराष्ट्राबाहेरचा हा आमचा पहिलाच दौरा. त्यात लांबचा म्हणून त्याचं अप्रूप. त्यावेळी अर्नाकुलम्ला जायला जवळजवळ ४० तास लागायचे. ४० नाटकवाले ४० तास सलग एकत्र म्हणजे काय होत असेल बघा! सगळे गप्पा मारमारून कंटाळले तरी प्रवास संपेना. मग मला आग्रह, की नव्या नाटकाची गोष्ट सांग. कारण त्यांना पक्कं माहिती, की मला माझ्या नाटकाची गोष्टच सांगता येत नाही. मी गांगरून जात असे. पण चेष्टा चालूच. मग मी वैतागून म्हटलं की, दोन मध्यमवयीन मित्र असतात. ते दोघं एकाच सरकारी ऑफिसमध्ये एकाच वेळी नोकरीस लागलेले क्लार्क असतात. दोघं एकाच खोलीत पार्टनर म्हणून राहत असतात. ते रोज ऑफिस सुटल्यावर एका अमृततुल्य हॉटेलात चहा घेतात. दोघंही दत्ताचे भक्त असतात. दर गुरुवारी हॉटेलात त्यांना एक उदबत्तीवाला भेटतो. तो वागायला बायकी असतो. कारण पूर्वी तो नाटकांतून स्त्रीपार्टी भूमिका करायचा. काही कारणांनी त्यांची लग्नं राहून जातात. एक दिवस सरकारी आदेश येतो की दोघांपैकी एक पद रद्द केलेलं आहे. आता त्यांच्यात तणाव- की दोघांपैकी कुणाची नोकरी जाणार? मग त्यांच्या मैत्रीचे धागे तुटत तुटत ते दोघं अखेर एकमेकांना पूर्ण अनोळखी होतात..!

अशी वरच्या तीन जोडय़ांची विरघळ सुरू झाली. मग उदबत्तीवाला झाला बर्वे (चंद्रकांत काळे), पांगळा झाला शामराव (मोहन आगाशे) आणि दोन मित्र (खरे आणि वाघांच्या पोशाखासह) झाले जावडेकर (मी) आणि बावडेकर (रमेश मेढेकर). या आमच्या ‘बेगम बर्वे’ नाटकाच्या पहिल्या प्रयोगाला आता ३६ र्वष होऊन गेली. नाटकातील जुन्या नाटय़- संगीताचं संयोजन केलं ऑर्गनवादक राजीव परांजपे यांनी. नाटकाचे मराठीत ७९ पासून जेमतेम ५०-६० प्रयोगच झाले. पुढे हिंदी, गुजराती, इंग्रजी आणि मल्याळम् भाषेतही प्रयोग झाले. नाटकावर भरपूर समीक्षा लिहून आली. थोडाफार गाजावाजा वाटय़ाला आला. पण नाटकाचे प्रयोग मात्र फारसे झाले नाहीत.
असं एकूण ‘बेगम बर्वे’साठी निमित्त ठरलं काविळीच्या साथीचं संशोधन!
satish.alekar@gmail.com

 

Even after eight months engineering students are still waiting for mark sheets
मुंबई : आठ महिन्यांनंतरही अभियांत्रिकीचे विद्यार्थी गुणपत्रिकेच्या प्रतीक्षेत

mumbai university , law students
पुनर्मूल्यांकन अर्जांचा गोंधळ: मुंबई विद्यापीठाच्या विधि शाखेच्या नवव्या सत्राचे विद्यार्थी संभ्रमात

MBBS student medical Nagpur
नागपूर : ‘एमबीबीएस’च्या विद्यार्थ्याने स्वत:ला खोलीत कोंडले !

Pune University Cancels Professor s Guideship for Demanding Bribe
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून ‘त्या’ लाचखोर प्राध्यापिकेवर कारवाई