बदलापूरमधील गृहसंकुलातील सर्व सदस्यांच्या घरी शाडूच्या मूर्तीची प्रतिष्ठापना

रहिवासी संकुलातील रहिवाशांचे एकमत होणे सध्याच्या काळात अशक्यप्राय अशी गोष्ट झाली आहे. मात्र असे असतानाही पर्यावरणपूरकतेच्या विषयावर शाडू मातीच्याच मूर्तीवर एकमत होत सोसायटीतील सर्वच सदस्यांनी एकाच उंचीच्या आणि फक्त शाडूच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करून घरच्या घरीच विसर्जन करण्याचा संकल्प केल्याने बदलापुरातील ट्रोगन हिल सोसायटीत सध्या पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा श्रीगणेशा झाला आहे.

विविध रंगांच्या आणि रूपांच्या गणेशमूर्ती सध्या बाजारात उपलब्ध आहेत. शाडू मातीच्या मूर्तीवर रंगरंगोटी करताना मोठय़ा प्रमाणावर अडचणी येतात. त्यात जो चकचकीतपणा प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीना देता येतो, तो चकचकीतपणा शाडू मातीच्या मूर्तीना देता येत नाही, असे अनेक मूर्तिकार सांगतात. त्यामुळे बदलणाऱ्या ट्रेंडनुसार मूर्तीची मागणी करणारे गणेशभक्त प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीकडे वळतात. मात्र गणेशमूर्तीचे रूप महत्त्वाचे नसून त्याचे विधिवत पूजन आणि यथायोग्य आदर्श विसर्जन होणेही तितकेच महत्त्वाचे आहे. याच मुद्दय़ाला हाती घेत बदलापूर पश्चिमेतील पाटीलनगर येथील ट्रोगन हिल सोसायटीने सार्वजनिक गणेशमूर्तीसह घरगुती गणेशमूर्तीही शाडूच्या मातीच्याच निवडताना समाजासमोर नवा आदर्श ठेवला आहे. ज्या ज्या घरात आज गणेशाचे पूजन केले जाते, त्या फक्त शाडू मातीच्याच आहेत. तसेच पर्यावरणपूरक सजावट करण्याचा सोसायटीने आदर्शच रुजवला आहे.

नदीपात्रात होणाऱ्या मोठय़ा प्रमाणावर विसर्जनामुळे नदीपात्रात मोठय़ा प्रमाणात मूर्ती अस्ताव्यस्त पडलेल्या असतात. अनेकदा आपल्या मूर्तीचे विसर्जन योग्य व्हावे, यासाठी अनेक गणेशभक्त आपली मूर्ती खोल पाण्यात नेण्याचा प्रयत्न करतात. मात्र या वेळी इतर मूर्ती अनेकदा पायाखाली येतात. त्यामुळे अशा मूर्तीची विटंबना होते. पाच दिवस भक्तिभावाने पूजा करून अखेरच्या दिवशी मूर्तीची विटंबना होणार असेल तर त्या पुजेला अर्थ नसतो.

-गोविंद कुंभार, अध्यक्ष.

सध्या सर्वच गणेशमूर्ती शाडूच्या असून त्यांच्या विसर्जनासाठी सोसायटीच्या आवारातच विसर्जनाची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यामुळे नदीत होणाऱ्या प्रदूषणात आमचा तरी सहभाग नसेल याचा आम्हाला अभिमान आहे. इतर सोसायटींनीही अशाच प्रकारे पुढाकार घ्यावा.

 -पुंडलिक नरेकर, रहिवासी.