पाच फूट उंचीची आणि साडेसोळा लाखांची मूर्ती 

मुंबईतील ‘लालबागचा राजा’च्या चरणी साकडे घातले आणि ती मनोकामना पूर्ण झाली म्हणून पिंपरी-चिंचवडच्या एका गणेशभक्ताने लालबागच्या राजाची चक्क सोन्याची प्रतिकृती तयार करवून घेतली आहे. जवळपास पाच फूट उंचीची आणि साडेसोळा लाख रूपये खर्चाची ही सोनेरी मूर्ती चिंचवडच्या रांका ज्वेलर्सने थायलंड येथून बनवून घेतली असून ती पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होऊ लागली आहे.

शहरातील एक गणेशभक्ताने रांका ज्वेलर्स येथून ही मूर्ती तयार करून घेतली आहे. स्वत:चे नाव गुप्त ठेवण्याची विनंती त्यांनी सराफांना केली आहे. ही गणेश मूर्ती पाच  फूट उंच व चार फुट रूंद आहे. त्यासाठी ४०० ग्रॅम सोन्याचा वापर करण्यात आला असून १६ लाख ५४ हजार रूपये खर्च करण्यात आल्याचे सांगण्यात आले. चिंचवड स्टेशन येथे रांका ज्वेलर्सच्या दालनात दर्शनी भागात ही मूर्ती ठेवण्यात आली असून ती पाहण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाल्याचे दिसून येते. गणेश चतुर्थीच्या दिवशी संबंधित भक्ताच्या घरी ही मूर्ती जाणार आहे; तोपर्यंत तरी शहरातील नागरिकांना या मूर्तीचे दर्शन घेता येणार आहे.

यासंदर्भात सराफ तेजपाल रांका यांनी सांगितले की, आपल्या भागात एक गणेश भक्त राहतात. त्यांनी गणरायाला काही साकडे घातले असावे. त्यांची मनोकामना पूर्ण झाल्यानंतर सोन्याची मूर्ती करण्याची भावना त्यांना निर्माण झाली. त्यांच्या संकल्पनेनुसार ही मूर्ती तयार करण्यात आली. त्यासाठी पाच महिने लागले. ‘फ्यूजन’ या विशेष तंत्रज्ञानाचा वापर त्यासाठी करण्यात आला. थायलंड येथे या प्रकारचे तंत्रज्ञान विकसित झालेले आहे. त्यामुळे तेथूनच ही मूर्ती तयार करून घेण्यात आली आहे.