बंगाली, ओडिसी समाजाच्या गणेशोत्सवाची परंपरा; उत्सव संस्कृतीच्या चौकटीत राहूनच साजरा करण्याचा कटाक्ष

कॉस्मोपॉलिटीन अशी ओळख असलेल्या मुंबईचे हे वैशिष्टय़ गणेशोत्सवातही न उमटेल तर नवल. मुंबईत रोजीरोटीसाठी आलेल्या विविध भाषक समाजांमध्येही गणाधिपतीचे कुठे दीड तर कुठे पाच-दहा दिवसांचा पाहुणा म्हणून कोडकौतुक केले जाते. ही कौतुक करण्याची पद्धतीही त्या समाजाची अशी खास. अशा या विविध समाजाच्या संस्कृतीत गणेशोत्सव कसा साजरा केला जातो, याचा हा धांडोळा.

गणपती ही बुद्धीची देवता असल्याचे मानले जाते. त्यामुळे कोणत्याही परीक्षेला सामोरे जाताना गणेशाचे दर्शन घेऊनच विद्यार्थी निघतात. मात्र, ओडिसी समाजामध्ये गणेशोत्सवाच्या काळात अभ्यासाला सक्त मनाई करण्यात आली आहे. बुद्धीच्या देवतेसमोर सगळी अभ्यासाची पुस्तके ठेवण्याची प्रथा येथे असल्याने या काळात कोणीही अभ्यास करत नाही. विशेष म्हणजे, गणेशोत्सवात अभ्यास करणाऱ्या मुलांची शैक्षणिक प्रगतीच होणार नाही, असा समज या समाजात दृढ आहे.

मुंबईमध्ये बंगाली आणि ओडिसी समाजाच्या नागरिकांची संख्या लक्षणीय आहे. या दोन समाजांतूनही गणेशोत्सव धूमधडाक्यात साजरा केला जातो. मात्र, हा उत्सव आपल्या संस्कृतीच्या चौकटीत राहूनच साजरा करण्याकडे कटाक्ष दिला जातो. ‘बंगाली आणि ओडिसी लोक हे साधारणपणे बुद्धिजीवी मानले जातात. या काळात कोणीही अभ्यास करत नाही. या काळात जी मुले अभ्यास करतील, त्यांची प्रगती होणार नाही, अशी समजूत आहे.

या दोन्ही समाजात महाराष्ट्रातील आरत्या म्हटल्या जात नाहीत. आरती म्हणताना गणपती स्तोत्र व मंत्र म्हटले जातात. भजनामध्ये हरे राम., हरे कृष्णचा उच्चारही महत्त्वाचा असतो. आरतीत शंख सोडून इतर कोणत्याही वाद्याचा वापर केला जात नाही. हातांनी टाळ्याही वाजवल्या जात नाहीत. गणपतीची आरती सुरू असताना उलुध्वनी काढली जाते. उलुध्वनी काढताना जीभ दोन्ही गालांना लावून उलुलुलुलु असा आवाज काढला जातो. या समाजात महिलांना अधिक महत्त्व असल्याने महिला अशा प्रकारचा आवाज काढतात. हा आवाज काढल्याने वातावरण शुद्ध होते.

कच्च्या नारळाचे महत्त्व

आपल्या महाराष्ट्राप्रमाणे बंगाल आणि ओडिशा या राज्यांनाही समुद्रकिनारा लाभला आहे. त्यामुळे तेथे नारळ मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. या दोन्ही राज्यांमध्ये गणपतीसमोर एका कलशावर कच्चा नारळ त्याला फुटलेल्या कोंभासह ठेवण्यात येतो. त्याला घट असे म्हणतात. या कलशाभोवती चार लहान काडय़ा लावून त्याला कुंपण घातले जाते. या कुंपणात पुजाऱ्याशिवाय इतरांना हात लावण्याची परवानगी नसते. तर ओडिशा समाजात फक्त कलशावरच फांदीसहीत कच्चा नारळ ठेवला जातो. जर ही फांदी नसेल तरीही ते अशुभ मानले जाते.

नैवेद्य आणि अन्नदान

बंगाली कुटुंबात देवा समोर मोदक, तांदूळ, फुले, कच्चे केळ्यांचे तुकडे, डािंळंबाचे दाने, पपईचा तुकडा, एखादे फूल हे पदार्थ नऊ भागांत विभागून एका ताटामध्ये ठेवले जातात. तसेच दर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येकाला खिचडी, वांग्याची भजी आणि वांगे बटाटय़ाची भाजी दिली जाते. ओडिशा समाजातही गणपती दर्शनासाठी येणाऱ्या सर्वाना अन्नदान दिले जाते.

विसर्जनातही यशापयशाची चाचणी

ओरिसा समाजात विसर्जना वेळी नारळ फोडण्याची प्रथा आहे, कुटुंबातील प्रत्येक मुलाच्या हातात नारळ दिला जातो. ज्या मुलाच्या हातातील नारळ एकाच फटक्यात फुटेल त्याला अभ्यासात यश मिळते असा समज आहे.