गणरायासोबत यल्लमा, दूर्गा, कालीचीही आराधना

तृतीयपंथीयांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन नेहमीच दूषित राहिला आहे. लोकलमध्ये, सिग्नलवर दानासाठी हात पुढे करणाऱ्या तृतीयपंथीयांबद्दल अनेकांच्या मनात चीड असते. मात्र हेच तृतीयपंथीय गणेशोत्सवाच्या काळात आपल्या दातृत्वाची प्रचीती देतात. इतरांच्या दातृत्वावर आपले पोट भरणाऱ्या तृतीयपंथीयांतर्फे गणेशोत्सवात दररोज अन्नदान करण्याची प्रथा आहे. अगदी हलाखीची परिस्थिती असली तरी या प्रथेत खंड पडू दिला जात नाही, हे विशेष.

गेल्या अनेक वर्षांपासून तृतीयपंथीयांच्या अस्तित्वाकरिता, त्यांच्या हक्कांकरिता विविध स्तरांवर लढाई सुरू आहे. समाजाच्या पूर्वग्रहदूषित मानसिकतेला धक्का देऊन शिक्षणाबरोबरच रोजगारासाठी प्रयत्न करणारे तृतीयपंथीय हिंदू धर्मातील आद्य दैवत गणरायाची सेवा अतिशय प्रेमाने आणि मनोभावे करतात. तृतीयपंथीय सुरुवातीपासून देवीची पूजा करीत आले आहेत. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये मुंबईतील वेगवेगळ्या धर्माच्या आणि पंथांच्या सान्निध्यात राहिल्यामुळे तृतीयपंथी गणपती या देवतेची स्थापना आणि पूजा करीत आहेत. घराघरांमध्ये तृतीयपंथीयांच्या देव्हाऱ्यात यल्लमा, दूर्गा, काली यांच्याबरोबर गणपती या देवाचा सहभाग वाढत चालला आहे.

जाईचा मोहराचा नैवेद्य

तृतीयपंथीयांच्या प्रथेप्रमाणे गणेशाला दिल्या जाणाऱ्या नैवेद्यात ‘जाईचा मोहरा’ या भाजीचा अंतर्भाव असणे गरजेचे असते. ‘जाईचा मोहरा’ हा जंगलांमध्ये येणाऱ्या भाजीचा प्रकार असून गणेशोत्सवाच्या काळात ही भाजी बाजारात मिळते. गावरान मेवा, देवरूपी भाजी आणि गणपतीचा आवडता पदार्थ म्हणून याची ख्याती आहे. त्याचबरोबर पाच लहान मुलांना जेवणासाठी बोलावले जाते. तृतीयपंथीयांमध्ये गणेशोत्सव काळात दान करणे महत्त्वाचे मानले जाते. गणपतीच्या रूपाने पाच मुले आपल्या घरी जेवून जातात ही त्यामागची भावना आहे. त्याचबरोबर या सात दिवसांत देव जागविण्याची प्रथा आहे. या सात दिवसांच्या जागरणात एका दिवशी तृतीयपंथीयांना बोलावून नाच सादर केला जातो, तर उरलेल्या दिवसांमध्ये राहत असलेल्या ठिकाणी भंडारा भरविला जातो.

स्वहस्ते प्रतिष्ठापना

चेंबूरमध्ये राहणाऱ्या पायल या तृतीयपंथीयाकडे सात दिवसांच्या गणपतीची प्रतिष्ठापना केली जाते. गेली १२ वर्षे त्यांच्याकडे गणपतीची स्थापना केली जाते. यासाठी भटजीला न बोलवता गणेशाची प्रतिष्ठापना आणि पूजा तृतीयपंथीयच करतात. शंभर भटजींचे पुण्य एका तृतीयपंथीय व्यक्तीमध्ये असते, असा समज असल्याने प्रतिष्ठापना ही स्वत:च्या हातांनीच केली जाते.