पुणे तिथे काय उणे असे म्हटले जाते ते काही खोटे नाही. वेगवेगळ्या नावांचे गणपती आणि मारुतीची मंदिरे हे पुण्याचे वैशिष्टय़. अगदी गणपती म्हटले तरी पुण्यनगरीचे ग्रामदैवत श्री कसबा गणपती, शनिवारवाडय़ानजीकचा पेशवे गणपती, सारसबाग येथील तळ्यातला गणपती, कसब्यातील गुंडाचा गणपती, त्रिशुंडय़ा गणपती आणि रँड वधाचा कट ज्याच्या साक्षीने रचला गेला तो खिंडीतला गणपती असे वेगवेगळे गणपती पुण्यात आहेत. मात्र, केवळ गणेशोत्सव साजरा करण्यापुरते नव्हे तर, गेल्या काही वर्षांत या उत्सवाला विधायक वळण प्राप्त करून देत मानवसेवेचे महामंदिर उभारण्याचा प्रयत्न करणारे ‘श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट’ हे मंडळ आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेला ‘दगडूशेठ गणपती’ जगभरात लौकिक प्राप्त केलेला बँड्र झाला आहे.

सार्वजनिक गणेशोत्सवामध्ये प्रतिष्ठापना केल्या जाणाऱ्या मूर्तीला देवत्व प्राप्त होण्याचे भाग्य दगडूशेठ गणपतीला लाभले आहे. या मंडळाची स्थापना सन १८९३ मध्ये झालेली असली, तरी ‘दगडूशेठ गणपती’ हा लौकिक प्राप्त झाला आहे ती मूर्ती मंडळाने १९६८ मध्ये तयार करून घेतली आहे. प्रसिद्ध शिल्पकार, मूर्तिकार आणि यंत्रविज्ञेचे अभ्यासक (कै.) शंकरअप्पा शिल्पी यांच्या मूर्तिकलेची साक्ष म्हणजे दगडूशेठ गणपतीची ही मूर्ती. ती घडविताना मूर्तिकार नागेश शिल्पी यांचेही या कामात योगदान होते. पुण्यातील क्वीन्स गार्डन परिसरात ही मूर्ती तयार करण्याचे काम सुरू असताना त्या वेळी सूर्यग्रहण आले होते. त्या ग्रहणातील एका विशिष्ट वेळेत मूर्तीमध्ये गणेशयंत्र बसविले, तर त्या मूर्तीचे तेज उत्तरोत्तर वाढत जाईल आणि या मूर्तीला देवत्व प्राप्त होईल अशी शिल्पी यांची श्रद्धा होती. त्यांच्या श्रद्धेचा मंडळाच्या कार्यकर्त्यांनीही आदर केला आणि धार्मिक पद्धतीने विधी करूनच ही मूर्ती घडविण्यात आली. शांत, प्रसन्न आणि पाहताच पावले थबकून राहावीत असे भाव या मूर्तीच्या चेहऱ्यावर आहेत. बैठय़ा मूर्तीचे चारही हात सुटे असून डाव्या हातामध्ये मोदक आहे. तर, उजवा हात वरद म्हणजे आशीर्वाद देणारा आहे. अन्य दोन हातांमध्ये कमळ आणि डोक्यावर मुकुट आहे. मूर्तीच्या सोंडेवरील नक्षीकाम हाही उत्कृष्ट कलाकारीचा नमुना आहे. या मूर्तीचे डोळे हे महत्त्वाचे वैशिष्टय़. या डोळ्यांमध्येच मूर्तीची प्रसन्नता, साविकता आणि उदात्तता एकवटली आहे. कोठूनही पाहिले तरी गणपती आपल्याकडेच पाहत आहेत याची प्रचिती दर्शन घेणाऱ्या भाविकाला येते. मूर्तीच्या बोलक्या डोळ्यांमधून व्यक्त होणारे भाव पाहून भक्त नकळतच नतमस्तक होतो.

व्यक्तिवेध : मीना चंदावरकर
Akshaya Tritiya 2024 Gajkesari Rajyog Ma Lakshmi
अक्षय्य तृतीयेला राजयोगांचा मेळा; ‘या’ राशींच्या कुंडलीत लक्ष्मी सोन्याच्या पावलांनी येऊन देणार करोडपती व्हायची संधी
Loksatta chaturang Think rationally disbelief restless
इतिश्री: भावनेवर तर्कशुद्ध मात!
narayana murthy experienced hunger for 120 hours hitchhiking in Europe 50 years ago but what happens your body starvation 5 day doctor said
नारायण मूर्ती राहिले होते १२० तास उपाशी; पाच दिवस उपाशी राहिल्याने शरीरावर काय परिणाम होतात?

दगडूशेठ गणपतीची ही मूर्ती गणेशोत्सवानंतर वर्षभर अकरा मारुती मंदिराजवळील परांजपे वाडय़ात ठेवली जात असे. पुढील काही वर्षे मंडळाकडे सोने-नाणे, रोकड असे वैभव म्हणता येईल अशा काहीच गोष्टी नव्हत्या. गणेशोत्सवामध्ये मूर्तीपुढे जमलेल्या सोने-चांदीतून मंडळाने मूर्तीसाठी दोन मुकुट तयार केले. हे देखील त्या काळी वैभव ठरले होते. तत्कालीन ‘श्री’ साप्ताहिकाने त्याची दखल घेत ‘सात लाखांचा सोन्याचा गणपती’ असा लेख तेव्हा प्रसिद्ध केला होता. उत्सव काळात पाच किंवा अकरा नारळाचे तोरण अर्पण करणाऱ्या भाविकांची दर्शनासाठी लागलेली रांग हे दगडूशेठ गणपतीचे एक खास वैशिष्टय़ ठरले. पुढे १९८४ मधील गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मंदिरामध्ये गणपतीची स्थापना झाली. या मंदिरासाठी ट्रस्टचे तत्कालीन अध्यक्ष प्रतापराव गोडसे, मामासाहेब रासने आणि अप्पासाहेब सूर्यवंशी यांनी केलेल्या प्रयत्नांना यश आले आणि तेथून ट्रस्टने मागे वळून पाहिलेच नाही. ‘कुली’ चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान सुपरस्टार अमिताभ बच्चन यांना जीवघेणा अपघात झाला होता. त्या वेळी जया बच्चन यांनी दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेऊन नवस केला होता. या अपघातामधून सुखरूप बरे झाल्यानंतर अमिताभ आणि जया बच्चन या दांपत्याने सोन्याचे कान अर्पण केले होते. पूर्वीचे मंदिर अपुरे पडू लागल्यानंतर २००२ मध्ये सध्याचे भव्य मंदिर उभारण्यात आले. ट्रस्टच्या तीनही प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या पुढच्या पिढीच्या हाती सध्या नेतृत्वाचे सुकाणू आहेत. त्यांनीही त्याच निष्ठेने आणि भाविकतेने सारे उपक्रम सुरू ठेवत गणपतीचे पावित्र्य जपले असून ट्रस्टच्या लौकिकामध्येही भर घातली आहे.

गणेशोत्सव हा केवळ आपल्या मंडळापुरताच वलयांकित राहू नये या भूमिकेतून उत्सवाला विधायक वळण प्राप्त करून देण्यासाठी ट्रस्टने राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धा सुरू केली. त्यामुळे उत्तम देखावे सादर करण्याबरोबरच मंडळांमध्ये वर्षभर सामाजिक उपक्रम राबविण्यासाठीची विधायक स्पर्धा सुरू झाली. गणेशोत्सवामध्ये ऋषिपंचमीला हजारो महिलांचा सहभाग असलेली अथर्वशीर्ष उपक्रमाची छायाचित्रे ही विविध वृत्तपत्रांच्या तसेच इंटरनेट आवृत्त्या, संकेतस्थळ, फेसबुक आणि व्हॉट्स अ‍ॅप या आधुनिक माध्यमातून जगभर पोहोचली आहेत. ‘केल्याने होत आहे रे’ याची प्रचिती देत ट्रस्टतर्फे कोंढव्यामध्ये देवदासी आणि अनौरस मुलांचा सांभाळ करून त्यांना योग्य शिक्षण देत सुसंस्कारित करणारे बालसंगोपन केंद्र आणि पिताश्री वृद्धाश्रम चालविण्यात येत आहे. पुरंदर तालुक्यातील पिंगोरी या गावामध्ये जलसंधारणाची कामे यशस्वी केलेल्या ट्रस्टतर्फे ससून रुग्णालयातील रुग्णांना उत्तम भोजनसेवा दिली जात आहे.

पुणे म्हटल्यानंतर शनिवारवाडा, पर्वती, पाताळेश्वर लेणी, राजा दिनकर केळकर संग्रहालय ही स्थळे जशी पटकन आठवतात, तशी ख्याती दगडूशेठ गणपतीला लाभली आहे. या गणरायाचे नित्यनेमाने दर्शन घेणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे. केवळ महाराष्ट्रात आणि देशाच्या विविध प्रांतातूनच नव्हे तर परदेशातूनही पर्यटक पुण्याला येतात, तेव्हा आवर्जून दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेतले जाते. ही किमया केवळ गणेशोत्सव नव्हे तर वर्षभर विविध उपक्रमांच्या माध्यमातून मानवतेचे महामंदिर साकारण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका मंडळाने साध्य केली आहे. प्रथम पूजेचा देव असलेल्या गणपतीमध्ये प्रथम दर्शन घेण्याचा गणपती अशी ख्याती श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला प्राप्त झाली आहे.