गणेश मुर्तीकारांचे गाव म्हणून प्रसिध्द असणाऱ्या पेणमधून यंदा तब्बल ४५ हजार गणेशमुर्ती परदेशात पाठवण्यात आल्या आहेत. त्यामुळे देशातील विविध भागांबरोबरच परदेशातूनही आता पेणच्या गणेशमुर्तीना माणगी वाढत असल्याचे दिसून आले आहे.  पेण शहराला गणेशमुर्तीकलेचा १५० वर्षांचा इतिहास लाभला आहे. कै. वामनराव देवधर यांनी सुरु केलेला गणेशमुर्ती बनवण्याचा व्यवसाय आता पेण शहर आणि आसपासच्या परीसरात मोठ्या प्रमाणात फोफावला आहे. आज पेण शहरात गणेशमुर्ती बनवणारे १५० मुर्तीकार कार्यरत आहेत. तर जोहे, हमरापुर, वडखळ आणि कामाल्रे परीसरात गणेश मुर्ती बनवणाऱ्या ४०० हून अधिक कार्यशाळा आहेत. यातून दरवर्षी जवळपास ४० लाख गणेश मुर्त्यां तयार केल्या जातात. ज्या देशाविदेशातही पाठवल्या जातात. यामुर्तीकला व्यवसायातून दरवर्षी ५० ते ६० कोटींची उलाढाल होत असते.

पुर्वी राज्यातील विविध भागांबरोबरच गोवा, कर्नाटक, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश, गुजरात आणि पश्चिम बंगालमधून पेण्याच्या गणपतींना विशेष मागणी होती. आज मात्र देशातील विवीध भांगाबरोबरच परदेशातूनही  पेणच्या गणेश मुर्तीना मोठी मागणी असल्याचे दिसून येत आहे. दरवर्षी पेणमधून परदेशात पाठवण्यात येणाऱ्या गणेश मुर्तीची संख्या झपाट्याने वाढत असल्याचे मुर्तीकार सांगतात. यावर्षी पेण परीसरातून तब्बल ४५ हजार गणेशमुर्ती परदेशात पाठवण्यात आल्या आहेत.

यात प्रामुख्याने अमेरीका, थायलॅण्ड, मलेशिया, ऑस्ट्रेलिया, फिजी, कॅनडा, इंग्लंड, मॉरेशियस, सिंगापुर यासारख्या देशांचा समावेष आहे. महत्वाची बाब म्हणजे आखाती देशातील दुबईसारख्या शहरातून यंदा पेणच्या गणेश मुर्ती मागविण्यात आल्या आहेत. जेएनपीटी बंदरातून जगभरात या मुर्त्यां जुन आणि जुल महिन्यात पाठवण्यात आल्या आहेत.

‘जगभरात जिथे जिथे भारतीय आणि महाराष्ट्रीयन नागरीक मोठ्या संख्येने आहेत, त्या देशांमधून दरवर्षी पेणच्या गणेश मुर्तीना मागणी केली जाते, मुर्तीकार थेट परदेशात गणेशमुर्ती पाठवत नसले तरी मुंबई, नवी मुंबईतील निर्यातदार मुर्त्यां खरेदी करून परदेशात पाठवतात. यावर्षी ४५ हजार गणेशमुर्ती परेदशात पाठवण्यात आल्या आहेत.’   श्रीकांत देवधर, अध्यक्ष पेण गणेश मुर्तीकार संघटना