मोदक हे गणपतीचे सगळ्यात आवडीचे. तेव्हा गणपतीला मोदकांचा नैवैद्य देण्याची प्रथा आहे. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकाराचे मोदक तयार केले जातात. त्यातल्याच विड्याच्या पानांच्या मोदकांबद्दल आणि ते कसे तयार करतात याबद्दल आपण जाणून घेऊयात…

साहित्य :

पारीसाठी मैदा – एक वाटी, बारीक रवा – एक वाटी, वनस्पती तुपाचे मोहन – अर्धी वाटी, मीठ – अर्धा चमचा, सारणासाठी सुक्या खोबऱ्याचा कीस – एक वाटी, बडीशेप – अर्धी वाटी, खडीसाखर व गुलकंद – प्रत्येकी पाव वाटी, विडय़ाची पानं – सात ते आठ, गुंजांची पानं – पाव वाटी, तेल किंवा तूप – तळण्यासाठी

कृती :

पारीचे सर्व साहित्य एकत्र करा. तूप व्यवस्थित लावून घ्या. पीठ मळून घ्या. तासभर ठेवा. सारणासाठी विडय़ाची पानं बारीक चिरून घ्या. सुकं खोबरं हलकेच भाजून घ्या. गार झाल्यावर त्यात बडीशेप, गुलकंद, गुंजांची पानं, विडय़ाची पानं सर्व छान एकत्र करून घ्या. पारीचे पीठ एकसारखे छान मळून घ्या. त्याचे छोटे छोटे गोळे करून घ्या. पारी लाटून त्यात सारण भरा. मोदक तयार करून घ्या. हे मोदक तेलात किंवा तुपात तळून घ्या. गणपतीसाठी हा वेगळ्या प्रकारचा मोदक चवीला खूप छान लागतो.

मंजिरी कपडेकर – response.lokprabha@expressindia.com
सौजन्य- लोकप्रभा