सोसायटीच्या आवारात मातीच्या गणेशमूर्तीचे विसर्जन

गणेशोत्सव काळातील होणारा खर्च, प्रदूषण, गोंधळ आणि विसर्जन मिरवणुकीतला ताण या सर्व गोष्टी टाळण्यासाठी नालासोपारा येथील राहुल परिवार सोसायटीने अनोखा उपक्रम राबविला आहे. सोसायटीने आवारात कायमस्वरूपी गणेशाची मूर्ती स्थापन केली असून गणेशोत्सव काळात सात दिवसांसाठी मातीची मूर्ती आणली आहे. या मूर्तीचे विसर्जनही सोसायटीच्या आवारातच करण्यात आले आहे. अशा प्रकारचा हा पहिलाच प्रयोग आहे.

गणेशोत्सव काळात सार्वजनिक मंडळांमध्ये मोठय़ा मूर्ती, भव्यदिव्य देखावे उभे करण्याची चढाओढ लागलेली असते. गृहनिर्माण सोसायटय़ाही भव्यदिव्य मूर्ती आणून गणेशोत्सव साजरा करीत असतात.

नालासोपारा येथील राहुल परिवार सोसायटी गेल्या ११ वर्षांपासून राहुल परिवार गणेशोत्सव मित्रमंडळामार्फत गणेशोत्सव साजरा करत होती. मात्र यामुळे अनेक प्रकारचे प्रदूषण होत असते. पैसा खर्च होतो आणि अनेक धोक्यांना सामोरे जावे लागते. एरवी स्वच्छ भारत आणि पर्यावरण वाचवा असा नारा देत असताना उत्सवाच्या नावाखाली आपणच या गोष्टी वाढवत असतो, ही बाब मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या लक्षात आली. त्यामुळे त्यांनी या वर्षी अभिनव प्रयोग केला. सोसायटीच्या आवारात गणेशाची कायमस्वरूपी फायबरच्या मूर्तीची प्रतिस्थापना करण्यात आली आहे. तर सात दिवसांसाठी अडीच फुटांची मातीची मूर्ती आणली आहे. सोसायटीच्या आवारात छोटा कृत्रिम तलाव खणण्यात आला आहे. गुरुवारी या कृत्रिम तलावात मूर्तीचे विसर्जन करण्यात आले. विसर्जन मिरवणूक सोसायटीच्या आवारात आणि अगदी साधेपणाने करण्यात आली.

याबाबत बोलताना मंडळाचे एक कार्यकर्ते अरुण पांडे यांनी सांगितले की, प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीने पर्यावरणाची हानी होते. शिवाय विसर्जनानंतर गणेशमूर्तीची विटंबना होते.

विसर्जन मिरवणूक काढली तर सर्व लोकांना विसर्जनस्थळी न्यावे लागते. या मिरवणुकीचा खर्च येतो, ध्वनिप्रदूषण होते, वाहतूककोंडी होते आणि पोलीस यंत्रणेवर ताण पडतो. जर मातीची मूर्ती आणून सोसायटीच्या आवारात विसर्जन करण्याची आम्ही कल्पना मांडली आणि ती सर्वाना आवडली असे ते म्हणाले. यापूर्वी आम्ही ५ फुटांची मूर्ती २५ हजार रुपयांना आणायचो तो आमचा खर्च वाचला आहे असेही ते म्हणाले. यामुळे पर्यावरणाचे रक्षण होणार आहे, ध्वनिप्रदूषण रोखले जाईल, आर्थिक बचत होईल तसेच व्यवस्थेवरचा ताण कमी होणार असल्याचे मंडळाने सांगितले. असे केल्याने आमच्या भक्तिभावात आणि उत्सवाच्या आनंदावर काहीच फरक पडला नसल्याचेही ते म्हणाले.  जर प्रत्येक सोसायटीने आपल्या आवारात मातीची मूर्ती आणून सोसायटीतच तिचे प्रतीकात्मक विसर्जन केले तर खूप फरक पडेल याची त्यांना खात्री पटली आहे. सोसायटीने इतर सोसायटय़ांना असा उपक्रम राबविण्यासाठी पत्रके काढून वाटली आहेत. राजेश सिंग, सचिन चौबे सर्वेश सिंग, कृष्णकांत तिवारी, प्रमोद मोर्या आणि हरिमोहन मिश्रा हे कार्यकर्ते यासाठी प्रयत्न करत आहेत.