सकाळी सनईवादन, संध्याकाळी कीर्तन अशा मंगलमय वातावरणात उत्सवाचे आयोजन

पेशवेकाळापासून पुण्यनगरीचे भूषण असलेले सरदार आबासाहेब मुजूमदार यांच्या मुजूमदार वाडय़ामध्ये मंगळवारी भाद्रपद शुद्ध प्रतिपदेपासून (२२ ऑगस्ट) गणेशोत्सवास प्रारंभ होत आहे. दररोज सकाळी सनईवादन आणि सायंकाळी कीर्तन अशा पारंपरिक पद्धतीने साजरा होणाऱ्या या गणेशोत्सवाची शनिवारी ऋषिपंचमीला (२६ ऑगस्ट) सांगता होणार आहे.

शनिवारवाडय़ाजवळच ग्रामदैवत कसबा गणपती परिसरात सरदार मुजूमदार यांच्या वाडय़ातील गणेश महालामध्ये पारंपरिक पद्धतीने भाद्रपद शुद्ध प्रतिपदेला वल्लभेष गणेशाची प्रतिष्ठापना होते. देवघरातून श्रींची पंचधातूची मूर्ती वाजत-गाजत गणेश महालामध्ये आणली जाते. तेथील लाकडी कोरीव कामाच्या मयूरासनावर विधीपूर्वक या दहा हातांच्या शस्त्रधारी मूर्तीची विधीवत प्रतिष्ठापना केली जाते. या गणेशाच्या सर्व हातांमध्ये आयुधे असून शारदेसह पितळी मखरात कमळावर ही मूर्ती आसनस्थ झालेली आहे. लघुरुद्र, ब्रह्मणेस्पतीसुक्त आणि अथर्वशीर्ष आवर्तने होऊन दररोज षोडशोपचार पूजा केली जाते. दररोज २१ पुरणाच्या मोदकांचा नैवेद्य दाखवून सुवासिनींसमवेत प्रसादाचे भोजन केले जात असे. ऋषिपंचमी हा उत्सवाच्या सांगतेचा दिवस असतो. त्या दिवशी रात्री तीर्थप्रसादाचे कीर्तन म्हणजेच लळीत झाल्यावर मखरावर पडदा टाकून मूर्ती पुनरागमनायच म्हणत परत देवघरात नेऊन ठेवायची अशी मुजूमदार घराण्याची प्रथा आहे.

आबासाहेब मुजूमदार यांचे नातू प्रताप मुजूमदार आणि नातसून अनुपमा मुजूमदार हे या उत्सवाची परंपरा जतन करीत आहेत.  पुणेकरांना सरदार मुजूमदारांचा गणपती उत्सव स्मरणात आहे तो येथील गाण्याच्या बैठकांमुळे. प्रतिपदेपासून ते पंचमीपर्यंत हंडय़ा-झुंबरांनी सुशोभित गणेश महालामध्ये पं. रामकृष्णबुवा वझे, पं. भास्करबुवा बखले, मास्तर कृष्णराव, उस्ताद बडे गुलाम अली खाँ, अमानत अली खाँ, बालगंधर्व, छोटा गंधर्व, सनईसम्राट प्रभाशंकर गायकवाड, पं. भीमसेन जोशी अशा दिग्गज कलाकारांच्या गायन मैफली या गणरायाच्या चरणी सेवा रुजू करण्याच्या उद्देशातून झाल्या आहेत. तर, नामवंत कीर्तनकारांची कीर्तने झाली आहेत, अशी माहिती प्रताप मुजूमदार यांनी दिली. गणेशोत्सवाचे यंदा २५२ वे वर्ष असून उत्सवामध्ये दररोज सकाळी नऊ वाजता प्रमोद गायकवाड यांचे सनईवादन होणार आहे. पुंडलिकबुवा हळबे, वासुदेवबुवा बुरसे, मििलदबुवा बडवे, मोरेश्वरबुवा जोशी चऱ्होलीकर, शेखरबुवा व्यास यांचे कीर्तन होणार आहे. यंदाच्या उत्सवात ‘वस्त्रे पेशवाईतील’ हे प्रदर्शन भरविण्यात येणार असून ऋषिपंचमीपर्यंत दररोज सायंकाळी पाच ते सात या वेळात ते खुले राहणार आहे, अशी माहिती अनुपमा यांनी दिली.

मुजूमदार वाडय़ामध्ये दोनदा गणेशोत्सव</strong>

सरदार मुजूमदार वाडय़ामध्ये भाद्रपद शुद्ध प्रतिपदा ते ऋषिपंचमी असा पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा केला जातो. हा मूळ उत्सव असतो. मात्र, त्याबरोबरीनेच गणेश चतुर्थीलाही शाडू मातीची मूर्ती आणून तिची प्रतिष्ठापना केली जाते. या गणपतीचे गौरीविसर्जनाबरोबर विसर्जन होते. अशा पद्धतीने आमच्याकडे दोनदा गणेशोत्सव साजरा केला जातो.