गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीत उस्मानाबाद शहरात राजकीय नेत्यांचा झेंडा नाच चांगलाच रंगला. मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये निवडणुकीपूर्वी मिसळता यावे म्हणून राष्ट्रवादीचे माजी मंत्री राणाजगजितसिंह पाटील झेंडा घेऊन उतरले. त्यांच्या बरोबर डॉ. पद्मसिंह पाटील यांनीही पताका हाती घेतली आणि कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. राष्ट्रवादीचे नेते झेंडा फडकवीत असल्याने शिवसेनेच्या आमदारांनीही मग झेंडा नाच केला. राजकीय नेत्यांच्या या नव्या चालीमुळे गणपती मिरवणुकीत मात्र रंगत आली.
गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर याऽऽचा जयघोष करीत, लेझीम, झांज, ढोल-ताशांच्या निनादात विघ्नहर्त्यां गणेशाला जिल्ह्यातील गणेशभक्तांनी सोमवारी भावपूर्ण निरोप दिला.
 श्री गणेशाच्या मिरवणुकीसाठी रथ सजावट, विद्युत रोषणाईने मिरवणूक मार्गालगत गणेश मंडळांनी सजावट केली होती. शहरातील बाल हनुमान गणेश मंडळ, त्रिमूर्ती गणेश मंडळ, श्री गणेश मंडळ, समता मध्यवर्ती गणेश मंडळ, साई परिवार, महाराज युवा प्रतिष्ठान आदींसह विविध २१ मंडळांनी सार्वजनिक मिरवणुकीत सहभाग नोंदवला होता. लेझीम, टिपरी, ढोलपथक, झांजपथक आदींनी आपापले कलाविष्कार सादर केले. जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने सर्व मंडळांचे स्वागत काळा मारुती मंदिर परिसरात करण्यात आले. शहर व परिसरातील नागरिकांना सुरू असलेली गणेश विसर्जन मिरवणूक पाहता यावी, यासाठी ई-न्यूज वाहिनीच्या वतीने थेट प्रक्षेपणाची सोय करण्यात आली होती. त्यामुळे राजकीय नेत्यांनाही गणपतीसमोर चमकून घेण्याची संधी होती. निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर कार्यकर्त्यांमध्ये किती लोकप्रिय आहोत, हे दिसावे अशा पद्धतीने झेंडा नाच रंगला.