गेल्या शुक्रवारी गणेश चतुर्थीच्या दिवशी घरोघरी विराजमान झालेल्या जिल्ह्य़ातील १ लाख १७ हजार बाप्पांना आज अत्यंत भक्तीमय वातावरणात आणि ढोल-ताशांच्या गजरात निरोप देण्यात आला. मंडणगडपासून राजापूपर्यंत संपन्न झालेला हा विसर्जन सोहळा अत्यंत शांततेत पार पडला. बाप्पांना निरोप देण्यासाठी नदी, खाडी, तलाव आणि समुद्रकिनाऱ्यावर गणेश भक्तांनी तोबा गर्दी केली होती. कुठेही अनुचित प्रकार घडल्याचे वृत्त नाही. रत्नागिरी शहराच्या मांडवी, भगवती, इलावा, मिऱ्या, साखर तर काळबादेवी, भाटय़े, राजिवडा, पुणसोप, पूर्णगड, पावस आदी किनारे भक्तांनी फुलून गेले होते. रात्री उशिरापर्यंत विसर्जन सुरू होते. गणरायाबरोबरच गौरीचेही विसर्जन करण्यात आले.
गणेश चतुर्थीच्या दिवशी (२९ ऑगस्ट) जिल्ह्य़ात १ लाख ६० हजार गणेश मूर्तीचे वाजत-गाजत आगमन झाले होते. यामध्ये १ लाख ५४ हजार घरगुती तर १०८ सार्वजनिक गणेश मूर्तीची समावेश होता. त्यापैकी ९ हजार ८३६ गणेश मूर्तीचे दीड दिवसांनी विसर्जन करण्यात आले होते. आज गौरी विसर्जनाबरोबर १ लाख १ हजार ७८९ घरगुती तर १४ सार्वजनिक गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यात आले. यामध्ये रत्नागिरी शहर पोलीस स्थानकाच्या हद्दीतील ५,५३१ घरगुती व ५ सार्व. गणेश मूर्तीचा समावेश होता याव्यतिरिक्त जयगडमधील २ सार्वजनिक व १७०१ घरगुती, संगमेश्वर ९६५६ घरगुती, राजापूर १०६७० घरगुती नाटे- २९५० घरगुती, लांजा ११,७७० घरगुती, देवरुख ८,१३० घरगुती, सावर्डे- ९३२३ घरगुती, चिपळूण ७२५० घरगुती व ३ सार्वजनिक गुहागर ९०२० घरगुती, अलोरे ५३३० घरगुती व १ सार्वजनिक, चिपळूण २५०० घरगुती व १ सार्वजनिक, मंडणगड ३०२५ घरगुती व १ सार्वजनिक बाणकोट ३१५ घरगुती, पूर्णगड ३२७५ घरगुती व १ सार्वजनिक आणि दाभोळ १२७९ घरगुती गणेश मूर्तीचा समावेश होता.
दरम्यान, गौरी-गणपती विसर्जनात कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि विसर्जन सोहळा शांततेत पार पडावा यासाठी जिल्ह्य़ात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.