विधानसभा निवडणूक आचारसंहिता केव्हाही लागणार असल्याने निवडणूक रिंगणात उभे राहणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी गौरी-गणपती सणाच्या निमित्ताने गणेश दर्शन घेतले. बहुचर्चित सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सदस्य दादा परब यांनीही इच्छुक असल्याचे सांगितले आहे.
सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून चार माजी आमदारांनी गणेश दर्शन घेतले. माजी आमदार दीपक केसरकर, माजी आमदार शिवराम दळवी, माजी आमदार राजन तेली व माजी आमदार परशुराम उपरकर यांनी गणेश दर्शनासाठी सावंतवाडी, दोडामार्ग व वेंगुर्ले तालुक्यात दौरा केला. दीपक केसरकर शिवसेना व परशुराम उपरकर मनसेतून सावंतवाडी मतदारसंघातून रिंगणात राहतील. त्यांची उमेदवारी जाहीर होणे बाकी आहे. राजन तेली काँग्रेस पक्षाचे आहेत. त्यांनी काँग्रेस नते नारायण राणे यांची सोबत सोडून सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात जोरदार मुसंडी मारली आहे. मात्र ते विधानसभा निवडणुकीत नेमके कोणत्या पक्षातून रिंगणात राहणार हे निश्चित झाले नाही.
राजन तेली यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उमेदवारी देईल अशी चर्चा आहे. मात्र त्यांचा अद्यापि राष्ट्रवादी प्रवेश झालेला नाही. त्यांनी निवडणूक लढविण्याचे निश्चित केले आहे.
शिवराम दळवी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस आहेत. ते निवडणूक रिंगणात उतरण्यास इच्छुक असले नसले तरी त्यांनी मतदारसंघात फेरफटका मारून गणेश दर्शन घेतले. दरम्यान, काँग्रेसचे दादा परब यांनीही अपक्ष म्हणून रिंगणात उतरण्याची तयारी सुरू केली आहे. ते मराठा समाजाचे नेते म्हणून रिंगणात उतरतील, असे बोलले जात आहे.
सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात अर्धा डझन उमेदवार रिंगणात उतरतील. या सर्व उमेदवारांनी निवडणूक लढविण्याची तयारी दर्शविली आहे. दीपक केसरकर, राजन तेली व परशुराम उपरकर यांनी निवडणुकी जय्यत तयारीही केली आहे. त्यांनी तसा दौराही केला आहे.