गणरायाला निरोप देण्यासाठी मराठवाडा सज्ज झाला असून, सर्वत्र विसर्जन मिरवणुकीचे काटेकोर नियोजन करण्यात आले आहे. या निमित्त चोख पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे. औरंगाबाद शहरात अडीच हजारांवर पोलीस, होमगार्ड, राज्य राखीव दल, शिवाय धडक कृतिदल, बीट मार्शल आदींची तैनाती करण्यात आली आहे.
दोन पोलीस उपायुक्त, आठ सहायक आयुक्त, ३६ निरीक्षक, १०० उपनिरीक्षक, १ हजार ९७० पोलीस कर्मचारी, १७० महिला पोलीस, राज्य राखीव दलाची एक तुकडी, ४०० पुरुष व १०० महिला होमगार्ड आदींची कडेकोट बंदोबस्तासाठी तैनाती असणार आहे. उद्या (सोमवारी) सकाळी अकरापासून मध्यरात्रीपर्यंत संस्थान गणपती ते जि. प. मैदान मार्गावर मुख्य विसर्जन मिरवणूक निघणार आहे. सिडको-हडको ते टीव्ही सेंटर, तसेच गजाननमहाराज मंदिर ते शिवाजीनगर या दोन ठिकाणी विसर्जन मिरवणुका निघतील. विसर्जन मिरवणुकांच्या वेळी होणारी वाढती गर्दी लक्षात घेऊन वाहतूक कोंडी व काही अपघात होऊ नये, तसेच कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, या साठी या काळात नमूद केलेल्या मागार्ंवर सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे.