भरून आलेल्या आभाळातून पाऊसधारा बरसेल अशी स्थिती असतानाही पावसाने दिलेली हुलकावणी.. तिन्हीसांजेपासूनच कुटुंबीयांसमवेत घराबाहेर पडलेले गणेशभक्त.. मानाच्या गणपतींचे दर्शन घेतानाच ऐतिहासिक, पौराणिक, सामाजिक आणि वैज्ञानिक विषयांवरील देखावे पाहण्यात दंग झालेले नागरिक.. अशा उत्साही वातावरणाने यंदाच्या गणेशोत्सवामध्ये अनोखा रंग भरला आणि पायी जाण्याचा आनंद लुटत देखावे पाहण्यामध्ये मग्न झालेल्या गणेशभक्तांनी रविवारच्या सुट्टीपूर्वीची शनिवारची रात्र जागविली.
गौरींसह घरातील गणपतीचे विसर्जन झाल्यामुळे गृहिणींना मिळालेली फुरसत, सकाळची शाळा आणि अभ्यास संपवून तयार झालेले बालचमू, दुसऱ्या शनिवारमुळे शासकीय कर्मचाऱ्यांना मिळालेली सुटी असा योग साधत रविवारच्या सुटीपूर्वीची रात्र गणरायाच्या दर्शनासाठी राखून ठेवली गेली. सायंकाळपासूनच उपनगरांतून नागरिक कुटुंबीयांसमवेत घराबाहेर पडले आणि शहराच्या मध्यभागातील रस्ते गर्दीने फुलू लागले. माणसांच्या गर्दीतून वाट काढत पुढे सरकणे दुचाकीस्वारांना अवघड जाऊ लागले. शनिवारवाडय़ापासून स्वारगेट येथील जेधे चौकापर्यंतचा शिवाजी रस्ता आणि चित्रकलाचार्य नारायणराव पूरम चौकापासून ते शनिवारवाडय़ार्पयचा बाजीराव रस्ता हा गणेशभक्तांसाठी पादचारी मार्ग झाला होता.
कसबा गणपती, तांबडी जोगेश्वरी या ग्रामदैवतांसह गुरुजी तालीम मंडळ, तुळशीबाग आणि केसरीवाडा या मानाच्या गणपतींचे दर्शन घेताना नकळत नमस्कारासाठी भाविकांचे हात जोडले जात होते. हुतात्मा बाबू गेनू मंडळाने साकारलेले काश्मीरमधील दाल लेक, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टने साकारलेल्या चामुंडेश्वरी मंदिराच्या प्रतिकृतीची विद्युत रोषणाई पाहताना आणि मत्स्यकन्या लेण्यामध्ये झोपाळ्यावर विराजमान झालेल्या अखिल मंडई मंडळाच्या शारदा-गजाननाचे दर्शन घेतले गेले. नातूवाडा मित्र मंडळ आणि मेहुणपुरा मित्र मंडळाचा वैज्ञानिक देखावा, अखिल नवी पेठ हत्ती गणपती मंडळ आणि खजिना विहीर मंडळाचा पौराणिक देखावा नागरिकांचे लक्ष वेधून घेणारा ठरला. नातूबाग मित्र मंडळासह चिमण्या गणपती मंडळाने ‘एलईडी’चा वापर करून साकारलेली विद्युत रोषणाई पाहताना नागरिक थक्क होत होते. देखावे पाहून थकलेले पाय पोटपूजा करण्यासाठी हॉटेलमध्ये विसावले आणि काही वेळाच्या विश्रांतीनंतर पुन्हा नव्याने सजावट पाहण्यासाठी सारे सज्ज झाले.