मानाच्या पहिल्या पाच गणेशांच्या विसर्जनानंतर मिरवणुकीच्या मुख्य मार्गावर ढोल-ताशांच्या दणदणाटात विद्युत रोषणाईचा झगमगाट गणेशभक्तांनी अनुभवला. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट, अखिल मंडई मंडळ, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट, हुतात्मा बाबू गेनू मंडळ, जिलब्या मारुती मंडळाच्या वैभवशाली मिरवणुकीने रंगत आणली. गणेशाच्या दर्शनासाठी व मिरवणुकीचे वैभव पाहण्यासाठी भाविकांची रस्त्याच्या दुतर्फा मोठी गर्दी झाली होती.

 ——— मानाच्या गणेशांचे सलग दर्शन नाही
 
 लक्ष्मी रस्त्याने होनाजी तरुण मंडळाचा गणपती रात्री बेलबाग चौकातून पुढे गेला. सकाळी साडेदहा वाजता सुरू झालेल्या मिरवणुकीमध्ये तोपर्यंत केवळ २० गणेश मंडळे विसर्जनासाठी मार्गस्थ झाली होती. त्यानंतर यंदा अमृतमहोत्सव साजरा करीत असलेल्या श्री गजानन मंडळाचा गणपती गणपती चौकामध्ये आला. त्यापाठोपाठ जिलब्या मारुती मंडळ आणि हुतात्मा बाबू गेनू मंडळाचे गणपती लक्ष्मी रस्त्यावर आले. ज्या गणरायाच्या दर्शनासाठी रात्र जागविली ते मानाचे गणपती आता मार्गस्थ होतील, अशी अपेक्षा असलेल्या पुणेकरांना दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागली. हुतात्मा बाबू गेनू मंडळाचा गणपती गेल्यानंतर पोलीस सहआयुक्त संजय कुमार यांनी शिवाजी रस्त्यावरील दत्त मंदिरापाशी रांगेत असलेल्या पाच मंडळांना सोडण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट, अखिल मंडई मंडळ आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट हे मानाचे गणपती या पाच मंडळांनंतर मध्यरात्रीच्या सुमारास बेलबाग चौकामध्ये आले. मिरवणुकीची जबाबदारी असलेल्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना पुण्याच्या रुढी-परंपरेची कल्पना नसल्यामुळे भाविकांना मानाच्या गणपतींचे सलगपणे दर्शन घेता आले नाही याकडे विघ्नहर्ता न्यासाचे विश्वस्त आणि गणेश मंडळांसाठी न्यायालयीन लढाई लढणाऱ्या वकिलाने लक्ष वेधले.

———- पारंपरिक लाकडी रथावर आकर्षक रोषणाई

 हिंदूुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती हा लौकिक असलेल्या श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्टची मिरवणूक रात्री पावणेबाराच्या सुमारास बेलबाग चौकात आली. खळदकर बंधू यांच्या नगारावादनाच्या गाडय़ासह श्रीराम, आवर्तन आणि परशुराम ही तीन ढोल-ताशा पथके मिरवणुकीच्या अग्रभागी होती. पारंपरिक लाकडी रथामध्ये विराजमान झालेल्या ‘श्रीं’च्या मूर्तीवर विविध रंगांची आकर्षक रोषणाई करण्यात आली होती. पोलीस उपायुक्त चंद्रशेखर दैठणकर यांच्या हस्ते आरती झाली आणि गणपती लक्ष्मी रस्त्याने विसर्जनासाठी मार्गस्थ झाला.

——– शारदा- गजाननासाठी भव्य रथ
 
तब्बल ३३ फूट उंचीच्या ‘विश्वविजेता रथा’मध्ये अखिल मंडई मंडळाच्या शारदा-गजाननाची मूर्ती विराजमान झाली होती. भारताच्या नकाशाच्या पाश्र्वभूमीवर पाच सिंह असलेल्या रथाचे सारथ्य करणारी भारतमाता, भगवान श्रीराम आणि भगवान श्रीकृष्ण यांच्या भव्य मूर्ती हे विशाल ताजणेकर यांनी साकारलेल्या रथाचे खास आकर्षण ठरले. नयनरम्य प्रकाशयोजनेमुळे या रथाचे सौंदर्य खुलून दिसले. शिवगर्जना ढोल-ताशा पथक मिरवणुकीच्या अग्रभागी होते. पोलीस आयुक्त सतीश माथूर यांच्या हस्ते शारदा-गजाननाची आरती झाल्यावर अखिल मंडई मंडळाचा गणपती मार्गस्थ झाला.

——– ‘मयूरेश्वर रथा’ने डोळ्यांचे पारणे फेडले

 ७२ मोरांच्या प्रतिकृती असलेल्या शिल्पकार विवेक खटावकर यांनी साकारलेल्या ‘मयूरेश्वर रथा’मध्ये श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती विराजमान झाला होता. ‘श्रीं’च्या मूर्तीमागे फुललेला मोराचा पिसारा आणि अंबर दिव्यांसह रंगीत दिव्यांच्या प्रकाशझोतामध्ये रथ डोळ्यांचे पारणे फेडणारा झाला. पारंपरिक दिव्यांऐवजी छोटय़ा आकारातील एलईडी दिव्यांचा वापर केल्यामुळे रथाचे सौंदर्य उजळून निघाले. डोळे उघडे ठेवून नयनरम्य रथाकडे पाहावे की डोळे बंद करून गणेशाचे रूप साठवावे अशी भाविकांची द्विधा मन:स्थिती झाली होती. झाडे लावण्यासंबंधी जनजागृती करणाऱ्या ‘जय गणेश निसर्ग संवर्धन अभियान रथा’मध्ये सनई-चौघडा वादन करणारे कलाकार भाविकांना आकृष्ट करून घेत होते. भक्तिगीतांसह देशभक्तिपर गीतांच्या मधुर सुरावटी सादर करणाऱ्या प्रभात आणि दरबार बँडपथकांचे वादन श्रवण करतानाच शिवगर्जना ढोल-ताशा पथकाचा तालही पुणेकरांनी अनुभवला. पोलीस आयुक्त सतीश माथूर यांच्या हस्ते आरती झाल्यानंतर गणपती लक्ष्मी रस्त्याने मार्गस्थ झाला. या गणपतीनंतर िनंबाळकर तालीम मंडळ, धक्क्य़ा मारुती मंडळ, डोके तालीम संघ, विक्रांत मित्र मंडळ, आदर्श सेवा मंडळ, जय महाराष्ट्र युवक मंडळ, रामेश्वर चौक तरुण मंडळ आणि कडबे आळी तालीम मंडळ ही मंडळे लक्ष्मी रस्त्याने गेली.

——– विद्युत रोषणाई पाहण्यासाठी गर्दी

सकाळी पहिल्या पाच मानाच्या गणेशांच्या विसर्जनानंतर व रात्रीच्या मानाच्या गणेशांचे विसर्जन होण्यापूर्वी व त्यानंतर मार्गावर आलेल्या विविध मंडळांनीही आकर्षक विद्युत रोषणाई व देखावे साकारले होती. या मिरवणुका पाहण्यासाठीही मोठी गर्दी झाली होती. बालविकास मंडळाच्या ढोल पथकामध्ये शिवराय व मावळ्यांची वेशभूषा करून सहभागी झालेले कलाकार लक्ष वेधून घेत होते. नारायणपेठेतील राजाच्या मिरवणुकीत जेजुरीच्या खंडेरायाचा देखावा साकारला होता. वीर हनुमान मंडळाने कन्याकुमारीच्या पाश्र्वभूमीवर स्वामी विवेकानंदांचा देखावा साकारला होता. होनाजी तरुण मंडळाने शिंपल्याचा वापर करून लक्षवेधी रथ साकारला होता. गणपती चौक मंडळाच्या गणेशाची भव्य मूर्ती मिरवणुकीत लक्ष वेधून घेत होती. नेहरू तरुण मंडळाचा विश्वशांती रथ व जय बजरंग मंडळाने साकारलेली हनुमानाची भव्य मूर्तीही आकर्षण ठरली.

——— मंगळवारची मिरवणूक ध्वनिक्षेपकांच्या भिंतींचीच!

रात्रीच्या विद्युत रोषणाईच्या लखलखाटानंतर मंगळवारी सकाळच्या मिरवणुकीचा ताबा हृदयात धडकी भरवणाऱ्या ध्वनिक्षेपकांच्या भिंतींनी घेतला. ‘आता माझी सटकली’ पासून ‘शिट्टी वाजली, गाडी सुटली’पर्यंतच्या गाण्यांचा ठणठणाट आणि त्यांच्या तालावर बेभान होऊन नाचणारे कार्यकर्ते हेच सकाळच्या मिरवणुकीचे चित्र होते. यातील काही कार्यकर्त्यांची ‘धुंदी’ उतरल्यामुळे त्यांच्यात नवाच जोर संचारल्याचेही बघायला मिळाले. लवकर मार्गस्थ न होता टिळक चौक आणि खंडूजी बाबा चौकात अधिकाधिक वेळ नाचायला कसे मिळेल याकडेच बऱ्याचशा मंडळांचा कल दिसला. खंडूजी बाबा चौकात डीजे लावून रेंगाळणाऱ्या मंडळांना पुढे ढकलण्यासाठी पोलिसांना वारंवार प्रयत्न करावे लागत होते.   

 

मानाची मंडळे, बेलबाग चौकातील वेळ, टिळक चौकातील वेळ, विजर्सनाची वेळ
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट – रात्री ११.४५, पहाटे ४.१५, ४.४५
अखिल मंडई मंडळ – रात्री १.००, पहाटे ६, ६.१७
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती – रात्री २.००, पहाटे ६.००, ६.५५