विशेष मुलांसाठी गेल्या ३४ वर्षांपासून काम करणाऱ्या जीवनज्योत या संस्थेचा कारभार पारदर्शी राहील हे आग्रहाने पाहिले जाते. सर्व पदाधिकारी, शिक्षक, कर्मचारी आणि अन्य सेवक मिळून ५० जण संस्थेचे काम करतात आणि या सर्वाच्या संघभावनेतून संस्थेचे काम सुरू आहे. शाळेसाठी अनुदान मिळत असले, तरी इतरही खर्च खूप मोठा आहे. त्यामुळे समाजातून निधी संकलन करूनच संस्थेचा हा व्याप सांभाळला जात आहे.
विशेष मुलांसाठी काम करणे किंवा त्यांच्यासाठी शाळा चालवणे ही काही सोपी गोष्ट नाही. विशेष मुलांसाठी चालणाऱ्या पुण्यातल्या जीवनज्योत मंडळाचे काम बघितले की ही गोष्ट सोपी नाही हे आपल्याही लगेच लक्षात येते. म्हणूनच हे अवघड कार्य ज्यांनी स्वत:हून स्वीकारले त्या मीनाताई इनामदार यांच्याकडे पाहिल्यानंतर त्यांच्या कष्टांची आणि चिकाटीचीही जाणीव आपल्याला होते. कमालीच्या निरलस आणि सेवावृत्तीने त्या गेली चौतीस वर्षे जीवनज्योत संस्थेच्या माध्यमातून कार्यमग्न आहेत. संस्थेचे वैशिष्टय़ एकाच वाक्यात सांगायचे, तर विशेष मुलांचा सांभाळ करतानाही इथे कोणी मुलांवर चिडत नाही, कोणी मुलांना रागावत नाही. उलट, सगळा व्यवहार त्यांच्याशी प्रेमाने, मायेने केला जातो आणि म्हणून मुलेही आनंदात असतात. इथे मुलांचा सांभाळ केला जात नाही, तर इथे मुलांना सामावून घेतले जाते..
अर्थात हे सारे काही आपोआप घडलेले नाही. विशेष मुलांसाठी शाळा सुरू करावी, या हेतूने मीनाताई इनामदार जागेच्या शोधात होत्या. ही गोष्ट आहे १९८० सालातली; पण विशेष मुलांसाठीची शाळा ही कल्पना ऐकल्यावर लोक वाडय़ाचे वा घराचे दारच लावून घ्यायचे. काही जण त्यांना ‘उद्या या’ सांगायचे. अर्थात, ‘उद्या या’ याचा अर्थ जागा मिळणार नाही असा असायचा; पण मीनाताईंना ते कळायचे नाही आणि जागा मिळेल का, हे विचारण्यासाठी त्या चिकाटीने पुन्हा दुसऱ्या दिवशीही तिथेच जायच्या. या कामात मीनाताईंना नलिनी कर्वे या मैत्रिणीची सोबत होती; पण खूप वणवण करूनही जागा मिळत नव्हती. अखेर प्रभात रस्त्यावर कर्नाटक हायस्कूलजवळ असलेल्या भोंडे कॉलनीत एक छोटी जागा रोज काही तासांसाठी वापरायला मिळाली. जागा मिळाली, पण भाडे होते दोनशे रुपये. पण तेवढे पैसेच नव्हते. त्यामुळे ते कोठून आणायचे, हा प्रश्न पुन्हा उभा राहिला. कशी तरी तोंडमिळवणी सुरू झाली आणि विशेष मुलांसाठी ‘जीवनज्योत मंडळ’ हा ट्रस्ट स्थापन होऊन शाळा सुरू झाली.. गेली चौतीस वर्षे विशेष मुलांसाठी लक्षणीय कार्य करीत असलेल्या पुण्यातील जीवनज्योत मंडळाच्या कामाला आरंभ झाला तो असा.
मुळात मीनाताईंना विशेष मुलांसाठी का शाळा सुरू करावीशी वाटली, हे समजले की या कामामागची त्यांची प्रेरणाही लक्षात येते. मीनाताई मूळच्या मीना गोपाळ जोगळेकर. रेवदंडा हे त्यांच्या आईचे आजोळ. तेथेच त्यांचे बालपण गेले आणि पुढे मुंबईत रुपारेल व रामनारायण रुईया महाविद्यालयातून त्यांनी बीएपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. याच दरम्यान संरक्षण खात्यात नोकरीला असलेल्या रामचंद्र इनामदार यांच्याशी त्यांचा विवाह झाला आणि १९६२ मध्ये त्या पुण्यात आल्या. वर्षभराने संसारात मुलाचे आगमन झाले, त्याचे नाव विजय. पुढे नऊ वर्षांनंतर संसारात एका कन्येचे आगमन झाले, तिचे नाव सुजाता. महिनाभरातच लक्षात आले की, सुजाता ‘विशेष मुलगी’ आहे. मीनाताईंसाठी तो मोठाच धक्का ठरला. मन निराश झाले. त्यातून सावरताना बराच कालावधी गेला; पण हळूहळू मीनाताई सावरल्या. निराशा झटकून आपणच आपला मार्ग शोधला पाहिजे ही जाणीव झाली आणि त्यांनी सुजाताला ‘कामायनी’ या विशेष मुलांच्या शाळेत दाखल केले. सुजाताला कामायनीमध्ये भरती करून मीनाताई थांबल्या नाहीत, तर त्यांनीही संस्थेतर्फे चालवल्या जाणाऱ्या ‘डिप्लोमा इन टीचिंग मेंटली रिटार्डेड’ या अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊन पूर्ण केला.
विशेष मुलांसाठी शाळा सुरू करण्याचा निश्चय त्यांनी याच कालावधीत केला. सुरुवातीला जागा मिळण्यापासूनच विरोध झाला. एक छोटी जागा वापरायला मिळाली, पण मुलांचीही वानवाच होती. सुरुवात झाली सहा मुलांच्या प्रवेशाने. शुल्कही नाममात्रच होते. शाळा चालवण्याची मीनाताईंची इच्छा मात्र प्रबळ होती. हळूहळू मुलांची संख्या वाढू लागली. त्यामुळे जागाही कमी पडू लागली. पुन्हा जागेचा शोध सुरू झाला. अ‍ॅड. शांताराम जावडेकर या वेळी पुढे आले आणि त्यांनी कर्वे रस्त्यालगत असलेल्या तरटे कॉलनीतील एक मोकळा भूखंड नव्याण्णव वर्षांच्या कराराने शाळेसाठी मिळवून दिला. श्री. महादेवराव तरटे यांनी ही जागा संस्थेला दिल्यामुळे जागेचा प्रश्न मिटला; पण सुरुवातीला इथेही विरोध झालाच. या मुलांची शाळा आमच्या भागात नको असा सूर व्यक्त होऊ लागला.
संस्थेला मिळालेली ही जागा अगदी पडीक अशा स्वरूपाची होती. जागेत असलेले आंब्याचे एक मोठे झाड या वेळी उपयोगाला आले आणि त्या झाडाखालच्या पारावर शाळा सुरू झाली. शाळेचा सगळा संसार उघडय़ावरच होता. शाळेच्या वस्तू, साहित्य, कागदपत्रे ठेवण्यासाठी देणगी म्हणून काही कपाटे मिळाली होती. ती कपाटेही उघडय़ावरच ठेवावी लागत होती. मीनाताई सांगतात, जागेला कुंपण घालणे आवश्यक होते; पण त्यासाठी एक हजार रुपये खर्च येणार होता. तेवढे पैसे कोठून आणणार? त्यामुळे रोज घरी जाताना ती कपाटे आम्ही बंद करून जायचो आणि दुसऱ्या दिवशी येऊन ती जागेवर आहेत ना हे पाहायचो. हळूहळू परिस्थिती सुधारू लागली. शाळेला शासकीय अनुदान सुरू झाले. मुलांची संख्या वाढली. या कामाची गरज लोकांना पटली. पुढे १९८५ मध्ये रामचंद्र इनामदार यांनी स्वेच्छानिवृत्ती घेऊन याच कामासाठी पूर्ण वेळ देण्याचा निर्णय घेतला.
विशेष मुलांच्या सर्वागीण विकासासाठी जीवनज्योत मंडळातर्फे पाच प्रकारची कामे सुरू आहेत. विशेष मुलांसाठी बालमार्गदर्शन केंद्र, कै. ज. र. तरटे मुक्तशाळा, व्यवसाय प्रशिक्षण केंद्र, पालक मार्गदर्शन केंद्र आणि जीवनज्योत वसतिगृह असे या कामांचे स्वरूप आहे. सहा मुलांनिशी सुरू झालेल्या शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या आता १६० वर गेली आहे. विशेष मुलांना शिक्षण देण्याचा हेतू त्यांची बौद्धिक प्रगती व्हावी असा नसतो. विशेष मुलांचा वेळ आनंदात जावा, त्यांना एकाकीपण जाणवू नये, स्वत:च्या शारीरिक गरजा त्यांना ओळखता याव्यात, थोडे व्यवहारज्ञान यावे, एकाग्रता यावी, दैनंदिन व्यवहार सुलभपणे करता यावेत असा या मुलांना शिक्षण देण्याचा उद्देश असतो. त्यासाठी निरीक्षण केले जाते, त्यांचे शारीरिक वय, त्यांचा बुद्धय़ांक आणि त्यांचे मानसिक वय निश्चित केले जाते आणि त्यानुसार त्यांना संस्थेत शिक्षण दिले जाते. मुक्तशाळेनंतरचा पुढचा टप्पा आहे व्यवसाय प्रशिक्षण केंद्राचा. अठरा वर्षांवरील आणि पन्नास ते साठ बुद्धय़ांक असलेली मुले-मुली इथे आहेत. कापडी पिशव्या शिवणे, भरतकाम, पर्स तयार करणे, कागदी पिशव्या तयार करणे, मेणबत्त्या, तोरणे, फुलांच्या माळा, शुभेच्छापत्र, राख्या तयार करणे, साबणाची पावडर तयार करणे असे अनेकविध प्रकारचे प्रशिक्षण मुलांना दिले जाते. या वस्तू तयार केल्याबद्दल त्यांना थोडे विद्यावेतनही दिले जाते. या वस्तू लोकांसमोर याव्यात यासाठी प्रदर्शने भरवली जातात. चकली, लाडू, शंकरपाळे असे फराळाचे पदार्थही उद्योग केंद्रात वर्षभर तयार केले जातात आणि उद्योग केंद्रातील सर्व वस्तूंना, खाद्य पदार्थाना, कलाकुसरीच्या वस्तूंना वर्षभर चांगली मागणीदेखील असते.
शाळा, उद्योग केंद्राबरोबरच पौड रस्त्यावर जीवनज्योत मंडळाने स्वतंत्र वसतिगृहदेखील सुरू केले आहे. विशेष मुलांसाठी वसतिगृह चालवणे ही सोपी गोष्ट नाही; ते एक आव्हानच आहे, पण मीनाताईंनी ते आव्हानही १९९४ मध्ये स्वीकारले आणि संस्था आता एक उत्तम वसतिगृह चालवीत आहे. सुरुवातीला पाच मुलींनिशी हे काम सुरू झाले आणि आता परगावच्याही मुली इथे आहेत. मुला-मुलींची एकूण संख्या आहे चाळीस. इथे मुला-मुलींसाठी स्वतंत्र इमारती आहेत. मुलांचे आरोग्य, स्वच्छता, जेवणखाण, व्यायाम याकडे अतिशय काटेकोरपणे लक्ष देतानाच मुलांबरोबर मायेचा व्यवहार करणारे शिक्षक, कर्मचारी, सेवक यांचीही खूप आवश्यकता असते. तशा पद्धतीने काम करणारी मंडळी या वसतिगृहात आहेत. या मुलांना रोज वसतिगृहातून शाळेत नेण्या-आणण्यासाठी बसची सोय आहे. त्याबरोबरच पुण्याच्या विविध भागांतून जी मुले शाळेत येतात त्यांच्यासाठी देखील बसची व्यवस्था आहे.
जीवनज्योत मंडळ, पुणे
स्वत:ची विशेष मुलगी हीच मीनाताईंच्या कामाची प्रेरणा ठरली. मीनाताई आता ७४ वर्षांच्या आहेत. संस्थेच्या कामात त्या शब्दश: एकरूप झाल्याचे पाहायला मिळते. सुरुवातीला विरोध करणाऱ्या समाजाची चांगली साथ त्यांना मिळत आहे. संस्थेच्या या कार्यावर अनेक मानाच्या पुरस्कारांची आणि सन्मानांची मोहोरही उमटली आहे. संस्थेच्या कामामध्ये मीनाताईंच्या मागे रामचंद्र इनामदार खंबीरपणे उभे आहेत.
तरटे कॉलनीतील सुमारे १२ हजार चौरस फुटांच्या भूखंडावर संस्थेने इमारत उभी न करता शाळेचे वर्ग, उद्योग केंद्र, संस्थेचे कार्यालय यासाठी वैशिष्टय़पूर्ण बांधकाम केले आहे. इथे म्हटले तर सर्व वर्ग आणि कार्यालयाचा कारभार स्वतंत्र आहे आणि म्हटले तर एकसधही आहे. संस्थेच्या कार्यालयाचेच रूपांतर समारंभांच्या व्यासपीठासाठी केले जाते.
समोरच्याच मैदानात भोंडला, दहीहंडी, कवायती, खेळ आणि विविध प्रकारच्या क्रीडा स्पर्धाही होतात. पाटीपूजनाला सगळे वर्ग तोरण-रांगोळ्यांनी सजवले जातात. शाळेचे बँडपथकही आहे. थोडक्यात म्हणजे जीवनज्योत मंडळ आणि मंडळाची शाळा व उद्योगकेंद्र तसेच कोथरूडचे वसतिगृह हेच तेथील मुलांचे भावविश्व बनते. व्याख्याने, जादूचे प्रयोग आदी कार्यक्रमही येथे होतात.
“निराशा, माघार हा माझा स्वभावच नाही. काम पारदर्शी असल्यामुळे मला चांगले सहकारी, चांगले कार्यकर्ते मिळत गेले. चांगल्या गोष्टी हातून घडत गेल्या आणि त्याचे खूप समाधानही आहे.”
– मीनाताई इनामदार, अध्यक्ष, जीवनज्योत मंडळ

संस्थेपर्यंत कसे जाल?
संस्थेत कर्वे रस्त्यावरून किंवा प्रभात रस्त्यावरून जाता येते. प्रभात रस्त्याने गेल्यास कमला नेहरू उद्यानाकडून येणाऱ्या चौकातून केतकर पथाने कर्वे रस्त्याकडे जायला लागायचे. त्याच्या पुढच्या गल्लीच्या तोंडाशीच जीवनज्योत मंडळाचा फलक दिसतो.
धनादेश या नावाने काढावेत
जीवनज्योत मंडळ
( कलम ८० जी अन्वये देणग्यांना प्राप्तिकर सवलत)

Loksatta anvyarth Naxalites killed in Kanker district of Chhattisgad
अन्वयार्थ: आता दीर्घकालीन उपायच गरजेचा..
GST Uniform taxation of goods and services
‘जीएसटी’च्या ध्येयपूर्तीसाठी…
Golden Jubilee of Mumbai grahak Panchayat fighting for consumer rights
ग्राहकांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या जागल्याचा सुवर्णमहोत्सव…
Loksatta anvyarth Institute like IIT Mumbai has very less campus placement figures for recruitment
अन्वयार्थ: ‘आयआयटी’चे रोजगारवास्तव