गणेशोत्सवात ठायीठायी दिसणारे कलेचे रंग खरोखरच थक्क करणारे असतात. उत्सव समृद्ध करणारे हे कलाकार आपल्याला कधी दिसत नाहीत; पण त्यांची कला मात्र आपल्याला उत्सवात खिळवून ठेवते. सार्वजनिक गणेशोत्सवात प्रतिष्ठित केल्या जाणाऱ्या गणरायाच्या मूर्तीला देवत्व प्राप्त झाल्याचं एक आगळं उदाहरण म्हणजे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची मूर्ती. दगडूशेठ गणपती हे लाखो भाविकांचं श्रद्धास्थान आहे. कोणत्याही दिशेनं पाहिलं, तरी मूर्ती आपल्याकडेच पाहत आहे अशी अनुभूती दगडूशेठचं दर्शन घेताना भक्तांना येते. उत्सवाच्या दहा दिवसांत लाखो भाविक ज्या मूर्तीचं दर्शन नितांत श्रद्धेनं घेतात, त्या मूर्तीचं रंगकाम करण्याचं भाग्य श्रीधर ऊर्फ अण्णा मुखेडकर या कलाकाराला गेली पंचेचाळीस वर्ष मिळत आहे. या मूर्तीबरोबरच पुण्यातील सुमारे दीड-दोनशे मोठय़ा मंडळांच्या मूर्तीही दरवर्षी अण्णांकडेच रंगकामासाठी असतात.
दगडूशेठच्या मूर्तीची विलोभनीयता, चेहऱ्यावरील प्रसन्न भाव आणि विलक्षण बोलके डोळे दरवर्षी कलेतून साकारायला कसबी कलाकारच हवा. ही मूर्ती वर्षांतून दोन वेळा रंगवली जाते. गणेश चतुर्थी आणि गणेश जयंती अशा दोन प्रसंगी अण्णांकडे मूर्ती रंगवण्याचं काम असतं. अण्णांचं हे काम उत्सवाच्या आधी तीन आठवडे सुरू होतं आणि उत्सव सुरू होण्याच्या आधी तीन दिवस काम पूर्ण झालेलं असतं. मूर्ती रंगवण्याची अण्णांची पद्धत वर्षांनुवर्ष ठरलेली आहे.
रंगकाम सुरू करण्यापूर्वी मूर्ती खूप घासून घ्यावी लागते. त्यामुळे मूळचा रंग आणि इतर रंग निघून येतात. हे घासकाम अतिशय काळजीपूर्व करावं लागतं. मूळ मूर्तीला किंचितही धक्का लागता कामा नये आणि रंगही निघाला पाहिजे, ही काळजी या कामात घ्यावी लागते. मग सुरू होतं रंगकाम. सुरुवातीला हलक्या हातानं रंगाचे पाच पातळ थर मूर्तीला दिले जातात. प्रत्येक थर योग्यप्रकारे वाळावा लागतो. थर वाळले, की मूर्तीला लोण्यासारखा गुळगुळीतपणा येतो. नंतर सुरू होतं चोळकाम. संजीऱ्याची पावडर वापरून मऊ वस्त्रानं मनासारखी चकाकी येईपर्यंत अण्णा हे काम करतात आणि नंतर प्रत्यक्ष रंग देण्याचं काम सुरू होतं. पितांबर, शेला, पाट, मुकूट.. एकेक करत सारी कला एकवटून अण्णांचं हे काम सुरू असतं. त्या वेळची त्यांची तल्लीनताही पाहण्यासारखी असते. हे रंगकाम झालं, की सर्वात अवघड काम सुरू होतं. ते असतं सोंडेवरच्या नक्षीचं आणि डोळ्यांच्या आखणीचं किंवा लिखाईचं. या कामासाठी अण्णांची पुण्यात ख्याती आहे.
अण्णांचं वय आता ऐंशी आहे; पण काम सुरू झालं की त्यांना वयाचा विसर पडतो. अण्णा म्हणतात, या मूर्तीचं काम करायला मिळणं हे माझं भाग्य आहे असं मी समजतो. उत्सव सुरू झाल्यानंतर मंडपात जाऊन मी देखील गणरायापुढे नतमस्तक होतो आणि प्रार्थना करतो, की दरवर्षी असं काम माझ्या हातून घडण्याची ताकद मला सतत मिळत राहू दे.