गणेशोत्सवाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या लोकसत्ता गणेश उत्सव मूर्ती स्पर्धेला यंदाही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून भरघोस प्रतिसाद मिळाला. ही स्पर्धा कुलाबा ते अंधेरी, जोगेश्वरी ते दहिसर, छत्रपती शिवाजी टर्मिनस ते मुलुंड, ठाणे शहर, डोंबिवली-कल्याण आणि नवी मुंबई अशा सहा विभागांमध्ये घेण्यात आली.  स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा मंगळवार ९ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजता प्रभादेवी येथील रवींद्र नाटय़ मंदिर येथे होणार आहे. स्पर्धेतील विभागवार, वेगवेगळ्या गटातील अन्य पारितोषिके आणि ‘मुंबईचा राजा’साठीची नामांकने जाहीर करण्यात आली असून रवींद्र नाटय़ मंदिरात होणाऱ्या कार्यक्रमात स्पर्धेचा अंतिम निकाल जाहीर केला जाणार आहे.
स्पर्धेचे मुख्य प्रायोजक वीणा वल्र्ड तर सहप्रायोजक भारतीय आयुर्विमा महामंडळ असून ‘लिव्होसिन’, ‘रेड एफएम’ यांचेही प्रायोजकत्व स्पर्धेसाठी लाभले. ‘डीएनएस बॅंक’ ही स्पर्धेची बॅंकिंग पार्टनर आहे. स्पर्धेत मंडळे सहभागी झाली होती. यंदाच्या स्पर्धेचे वैशिष्टय़ म्हणजे मुंबई शहर आणि उपनगरातील तसेच ठाणे शहर, डोंबिवली-कल्याण आणि नवी मुंबई परिसरातील नामांकित मंडळांसह अन्य छोटी मंडळेही सहभागी झाली होती. गणेशमूर्ती, सजावट आणि सजावीचा विषय, ज्या विषयावर सजावट/देखावा साद केला गेला त्याची संहिता आदींबाबत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून विषयातील वैविध्य पाहायला मिळाले. भव्य आणि नेत्रदीपक देखावे, सजावटीबरोबरच छोटय़ा मंडळांनी मर्यादित जागेत केलेली सजावट लक्षवेधक होती. समाजातील ज्वलंत विषय, समस्या, राजकारणापासून ते सामाजिक जाणीव अधोरेखित करणारे वैविध्यपूर्ण विषयांवरील देखावे स्पर्धेत दिसून आले.
‘जीवनगाणी’ निर्मिती ‘स्वरआरती’ हा सांस्कृतिक कार्यक्रम यावेळी सादर होणार असून कार्यक्रमात अनेक मान्यवर कलाकार सहभागी होणार आहेत. कार्यक्रमाच्या विनामूल्य प्रवेशिका रवींद्र नाटय़ मंदिर येथे उपलब्ध आहेत. ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्वावर त्या प्रेक्षकांसाठी उपलब्ध असतील.