निराधार, पोरकी मुले-मुली आणि अडचणीत सापडलेल्या स्त्रिया यांना आधार द्यायचा, संरक्षण द्यायचे, त्यांची काळजी घ्यायची, पोटभर अन्न, अंगभर कपडा अन् घराची ऊब द्यायची, पाठीवरून मायेचा हात फिरवायचा. त्यांना माणूस म्हणून वाढवायचे हे कार्य खचितच अवघड अन् आव्हानात्मक. आधाराश्रम संस्थेने अनंत अडचणींना तोंड देत हे कार्य लीलया पेलले आहे. दातृत्व, पितृत्व, मातृत्व या गुणांचा समुच्चय असणारे आणि धैर्याने प्रेरित झालेले वैद्यराज अण्णाशास्त्री दातार, मुकुंदशास्त्री बापट, इंदुताई खाडिलकर आदींनी ४ एप्रिल १९५४ रोजी अनाथ महिलाश्रमाची स्थापना केली.

बऱ्याच कालावधीपासून आपल्या समवेत राहिलेल्या एखाद्या सवंगडय़ाला कोणी पालक वाढदिवसासारखा (पण दत्तक विधान) सोहळा करून आनंदात कायमचे सोबत घेऊन जातात. दर शनिवारी कोणीतरी काही विशिष्ट सवंगडय़ांना भेटायला येतात. त्यांना उराशी धरून बराच वेळ गप्पा मारतात. मग आपल्याला का कोणी सोबत नेत नाही, आपणांस का कोणी भेटायला येत नाही, अशा प्रश्नांमुळे अवघ्या दोन ते बारा वर्षांची शेकडो चिमुरडी हिरमुसतात. त्यामुळे काही ज्यांना कोणी भेटायला अथवा नेण्यासाठी आले आहे, त्यांच्याजवळ घुटमळतात. काही बालके आपणास कोणी भेटायला येईल, या वेडय़ा आशेने डोळे लावून बसतात. अनाथ बालके आणि निराधार महिला यांच्या कल्याणार्थ ६० वर्षांपासून कार्यरत असणाऱ्या नाशिकच्या आधाराश्रमातील हे वास्तव. आजवर ६५००हून अधिक अनाथ बालके, निराधार मुले-मुली तसेच महिलांच्या संगोपनाचे काम संस्थेने केले आहे. निराधार मुले, महिलांना आश्रय देणे, त्यांच्या अन्न, वस्त्र व निवाऱ्याची सोय करणे तसेच पुनर्वसनाचे प्रयत्न अखंडपणे सुरू आहेत. त्या अंतर्गत ७०० हून अधिक बालकांना संस्थेने दत्तक देऊन देशात व परदेशात त्यांना स्वत:च्या हक्काचे घर मिळवून दिले आहे. परंतु, आजही शेकडो अनाथ बालके आई-बाबांच्या प्रतीक्षेत आहेत.
कार्यविस्तार
सोमवार पेठेतील छोटय़ाशा घरात लावलेल्या आधार आश्रमरूपी रोपटय़ाचे आज गोदाकाठी वटवृक्षात रूपांतर झाले आहे. संस्थेच्या आजवरच्या वाटचालीत अनेक सेवाव्रती कार्यकर्ते लाभले. प्रत्येकाने संस्थेच्या कार्यास वाहून घेतले. नवनवीन उपक्रमांची मुहूर्तमेढ रोवली. त्या सर्व कार्यकर्त्यांच्या अविरत प्रयत्नांचे फलित म्हणजे आजचे संस्थेचे विस्तारित व विलोभनीय स्वरूप होय. आश्रयास आलेल्या दोन बालिकांना घेऊन सुरू झालेला प्रवास सध्या १५० बालकांपर्यंत विस्तारला आहे. कार्यविस्तारामुळे जागा अपुरी पडू लागली. तेव्हा नगरपालिकेने ९९ वर्षांच्या कराराने गोदा काठावर मध्यवस्तीत जागा उपलब्ध करून दिली. या ठिकाणी उभारलेल्या भव्य इमारतीतून सध्या संस्थेचे कार्य सुरू आहे. आश्रमात आश्रयास येणाऱ्या बालकांच्या कथा अंगावर शहारे आणणाऱ्या. नको असलेले मूल, मुलगी आहे म्हणून अथवा जन्मत: व्यंग असणारी बालके कोणी कचराकुंडीत फेकतात. तर, कोणी रेल्वे वा बस स्थानकावर सोडून देतात. पोलिसांमार्फत ही बालके संस्थेपर्यंत पोहोचतात. त्यात नुकत्याच जन्मलेल्या एक दिवसाच्या अर्भकापासून ते दहा ते बारा वर्षांपर्यंतच्या चिमुरडय़ांचाही समावेश असतो. लहान बाळ आश्रमात येईपर्यंत त्याच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. आश्रमात आलेल्या प्रत्येकाची प्रथम आरोग्य तपासणी करून काळजीपूर्वक सांभाळ केला जातो. आर्थिक स्थिती वा अन्य काही कारणास्तव मुलांचा सांभाळ करण्यास असमर्थ ठरलेले आई किंवा वडील त्यांना आश्रमात घेऊन येतात. एका मूकबधिर दाम्पत्याने आपल्या बोलू शकणाऱ्या मुलीचा सांभाळ कसा करणार, या विवंचनेतून तिला या ठिकाणी आणले. सध्या आधाराश्रमात विविध वयोगटातील १५० बालके असून त्यात १४ जन्मत: अपंग बालकांचा समावेश आहे.
केंद्र सरकारची मान्यता
आश्रमात बालक दाखल झाल्यानंतर पालकांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला जातो. मुलांना सोडून दिलेल्या पालकांना कधी कधी उपरती होते आणि ते त्यांचा शोध घेत परत येतात. पण, त्यांचे प्रमाण अतिशय नगण्य. एका विशिष्ट कालावधीत पालक न आल्यास त्यांची जबाबदारी सर्वस्वी आधाराश्रमावर येते. राज्य शासनाने आधाराश्रमास बालगृह म्हणून मान्यता दिली आहे. शून्य ते सहा वयोगटातील मुले-मुली आणि सहा ते बारा वर्षांतील मुलींचा सांभाळ या ठिकाणी केला जातो. केंद्र सरकारने आश्रमाला शिशु संगोपन केंद्र आणि ‘स्पेशल अ‍ॅडॉप्शन एजन्सी’ म्हणून मान्यता दिली आहे. बालकांचे संगोपन व आरोग्यरक्षणासाठी परिचारिका, सेविका, काळजीवाहक व तत्सम कर्मचारी अविरतपणे कार्यरत आहेत. सेवाभावी डॉक्टर बालकांची नियमित तपासणी करतात. अपंग बालकांसाठी फिजिओथेरेपी केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहे. नियमित उपचारांमुळे अपंग बालकांच्या प्रकृतीत व प्रगतीत निश्चितच सुधारणा होते. या व्यतिरिक्त मानसोपचार, समुपदेशन आणि संगीतोपचार केंद्र येथे असून त्याचा बालकांच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम झाला आहे. मुले दत्तक देऊन मुलांना पित्याची छाया, मातेची माया आणि हक्काचे घर मिळवून देणे हे संस्थेचे महत्त्वाचे कार्य. सर्वसाधारणपणे पालकांचा मुलगा दत्तक घेण्याकडे कल असतो. परंतु, संस्थेने अशा पालकांचे प्रबोधन करून मागील काही वर्षांत मुलांपेक्षा मुली जास्त संख्येने दत्तक दिल्या आहेत. जन्मत: अपंग असणाऱ्या बालकांना दत्तक घेण्याची भारतीय पालकांची मानसिकता नसते. यामुळे अलीकडेच संस्थेतील तीन अपंग बालके सेंट्रल अ‍ॅडॉप्शन रिसोर्स अ‍ॅथोरिटीच्या माध्यमातून परदेशातील पालकांच्या कुशीत विसावली आहेत. अद्याप या स्वरूपाची ११ मुले पालकांच्या प्रतीक्षेत आहेत.
 संगोपनाचा श्रीगणेशा
आश्रयार्थ दाखल झालेल्या बालकांच्या शिक्षणाचा श्रीगणेशा आश्रमातील मुकुंद बालमंदिर बालवाडीच्या माध्यमातून होतो. प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या मुलींना मोहिनीदेवी रुंग्टा प्राथमिक विद्या मंदिरात तर माध्यमिक शिक्षणासाठी पुष्पावती रुंग्टा कन्या विद्यालयात शिक्षण दिले जाते. आश्रमकन्यांच्या शिक्षणाप्रमाणेच त्यांच्यातील कलागुणांचाही विकास व्हावा यासाठी सरस्वती संगीत साधना वर्ग चालविण्यात येतो. हस्तकौशल्य, चित्रकला व नृत्य या विषयाचेही प्रशिक्षण दिले जाते.
माहेरच जणू
बालकांप्रमाणे हुंडाग्रस्त, परित्यक्ता, निराधार अशा महिलांना अन्न, वस्त्र, निवारा तसेच व्यवसायोपयोगी शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिली जाते. महाराष्ट्र शासनाने आश्रमास आधारगृह (पूर्वीची माहेर योजना) योजनेसाठी मान्यता दिली आहे. २५ महिलांसाठी ही व्यवस्था आहे. या व्यतिरिक्त बाहेरगावाहून आलेल्या, शहरात नोकरी करणाऱ्या महिलांसाठी आधाराश्रमाने कर्मचारी महिला वसतिगृहाची उभारणी केली आहे. अत्यल्प दरात कर्मचारी महिलांना निवास सुविधा या ठिकाणी उपलब्ध झाली आहे. यात्रा, रेल्वे व बस स्थानक वा अन्यत्र हरवलेल्या व संस्थेत दाखल झालेल्या बालकांच्या पालकांचा शोध घेऊन त्यांना पालकांच्या ताब्यात परत देणे हे काम संस्था करते. कौटुंबिक समस्यांमुळे आश्रमात आलेल्या विवाहितांना धीर देऊन, त्यांच्या कुटुंबीयांचे प्रबोधन करून मनोमीलन घडवून आणणे व त्यांचे सन्मानाने पुनर्वसन करण्याचे कार्य संस्था करत आहे. परदेशी दत्तक गेलेल्या तसेच आश्रमकन्यांचे विवाह झाल्यानंतरही अनेक जणी आश्रमास आवर्जून भेट देतात.
श्वानांच्या कचाटय़ात सापडल्याने हात गमवावा लागलेला पण नंतर पालक लाभलेला मुलगा आज एका बँकेत व्यवस्थापक पदाची धुरा सांभाळत आहे. १० महिन्यांची असताना स्वीडनमध्ये दत्तक गेलेली बालिका ३४ वर्षांची झाल्यावर सहकुटुंब आश्रमात आली. सर्वाची आस्थेने विचारपूस करून तिने आर्थिक मदत केली. याच पद्धतीने १२ वर्षांची असताना परदेशी दत्तक गेलेली अन्य एक मुलगी अनेक वर्षांनंतर आपल्या मुलीसमवेत भेटीला आली. जिथे आपले बालपण गेले, ते ठिकाण पाहून तिच्या डोळ्यांत पाणी तरळले. आधाराश्रम आणि निराधार बालके यांचे दृढ नाते दर्शविणारी अशी कित्येक उदाहरणे आहेत.

आगामी काळात वृद्धाश्रम सुरू करण्याचा संस्थेचा संकल्प आहे. त्यासाठी जागा मिळविण्याचे प्रयत्न सुरू असून त्यासाठी आर्थिक मदतीची गरज आहे. विद्यार्थिंनींच्या शिक्षण खर्चापासून ते एकवेळचे जेवण, नाश्ता यासाठीही मदतीची गरज आहे. या व्यतिरिक्त एका मुलीचा विवाह खर्च, गृहोपयोगी वस्तू, भांडी, फर्निचर, कपडे, खेळणी, इमारत देखभाल निधी, औषधोपचार आदींसाठी देणगीच्या रूपात मदत करता येईल.

आधाराश्रमाच्या मानवतावादी कार्याची शासन तसेच विविध संस्थांनी दखल घेतली असून संस्थेस अनेक पुरस्कार प्रदान केले आहेत. त्यात महाराष्ट्र शासनाचा दलितमित्र पुरस्कार, साने गुरुजी कथामालेतर्फे श्यामची आई पुरस्कार, शिवपार्वती प्रतिष्ठानचा आदर्श संस्था पुरस्कार, इचलकरंजीच्या फाय फाऊंडेशनचा पुरस्कार आदींचा समावेश आहे.

केंद्र सरकारच्या अ‍ॅडॉप्शन रिसोर्स अ‍ॅथोरिटीच्या दत्तकाबाबत मार्गदर्शक तत्त्वे निश्चित करणाऱ्या समितीत देशातील ४०० संस्थांमधून आधाराश्रमाची प्रथमच निवड करण्यात आली. ६० वर्षांत अनेक मैलाचे दगड गाठणाऱ्या आधाराश्रमाची धुरा सध्या डॉ. श्रीकांत पूर्णपात्रे, डॉ. सुनेत्रा सरोदे, प्रा. निशा पाटील आणि प्रा. प्रभाकर केळकर हे पदाधिकारी सांभाळत आहेत.

संस्थेपर्यंत कसे जाल?
अशोकस्तंभ परिसरातील घारपुरे घाट येथे आधाराश्रम आहे. रेल्वेने येणाऱ्यांना नाशिकरोड येथे उतरल्यानंतर पंचवटी कारंजाची बस पकडून अशोकस्तंभ थांब्यावर उतरता येईल. येथून आधाराश्रमात पायी जाता येते. सीबीएसपासून संस्था दहा मिनिटांच्या अंतरावर आहे.

धनादेश या नावाने काढावेत
आधाराश्रम, नाशिक
( कलम ८० जी अन्वये देणग्यांना प्राप्तिकर सवलत)

नाशिकला येणाऱ्या पाहुण्यांना मी नेहमी सांगतो. तुम्ही देऊळ पाहा किंवा पाहू नका. पण गोदावरीच्या तीरानजीक असलेला आधाराश्रम पाहिल्याशिवाय राहू नका. या शहराला नव्हे तर, महाराष्ट्राला अभिमान वाटावा असे कार्य या संस्थेत सुरू आहे.
वि. वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज)

धनादेश येथे पाठवा..
एक हजार किंवा त्याहून अधिक रुपयांची देणगी देणाऱ्यांची नावे ‘लोकसत्ता’त प्रसिद्ध केली जातील.

मुंबई कार्यालय
लोकसत्ता, संपादकीय विभाग, एक्स्प्रेस टॉवर्स, पहिला मजला, नरिमन पॉइंट, मुंबई – ४०००२१,  ०२२-६७४४०२१४

महापे कार्यालय   
संपादकीय विभाग, प्लॉट क्र. ईएल १३८, टीटीसी इंड. एरिया, एमआयडीसी, महापे, नवी मुंबई – ४००७१०.  ०२२-२७६३९९००

ठाणे कार्यालय     
संपादकीय विभाग, कुसुमांजली बिल्डिंग, दुसरा मजला, गोखले रोड, नौपाडा, ठाणे.  ०२२-२५३९९६०७

पुणे कार्यालय       
संपादकीय विभाग, एक्स्प्रेस हाऊस, प्लॉट नं. १२०५/२/६, शिरोळे रस्ता, पुणे – ४११००४.  ०२०-६७२४१०००

नाशिक कार्यालय        
संपादकीय विभाग, स्टेडियम कॉम्प्लेक्स नं. ६, पहिला मजला, महात्मा गांधी मार्ग, नाशिक – ४२२००१.  ०२५३-२३१०४४४

नागपूर कार्यालय        
संपादकीय विभाग, प्लॉट नं. १९, ग्रेट नागरोड, उंटखाना, नागपूर – ४४०००९,
०७१२-२७०६९२३

औरंगाबाद कार्यालय        
संपादकीय विभाग, मालपाणी, ओबेरॉय टॉवर्स, जालना रोड, शासकीय दूध डेअरीसमोर, औरंगाबाद. ०२४०-२३४६३०३

नगर कार्यालय        
संपादकीय विभाग, आशीष, सथ्थ्या कॉलनी, स्टेशन रोड, अहमदनगर. ०२४१-२४५१५४४/२४५१९०७

दिल्ली कार्यालय        
संपादकीय विभाग, एक्स्प्रेस बिल्डिंग, ९/१०, बहादूरशाह जफर मार्ग, नवी दिल्ली-११०००२. ०११-२३७०२१००