रिमझिम पावसाची सर अंगावर झेलत विविध गणेश मंडळांचे देखावे पाहताना गणेशभक्तांनी रविवारच्या सुटीचा आनंद लुटला. सोमवारपासून नियमित वेळापत्रक सुरू होत असल्यामुळे गणपतीची सजावट पाहण्यासाठी यंदाच्या उत्सवामध्ये गर्दीचा उच्चांक गाठला गेला.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला श्रीफळाचे तोरण अर्पण करण्यासाठी रविवारी पहाटेपासूनच भाविकांची रीघ लागली होती. ही रांग वळून लाल महालपर्यंत पोहोचली होती. दिवसभराच्या विश्रांतीनंतर कुटुंबीयांसमवेत गणेशभक्त घराबाहेर पडले आणि तिन्हीसांजेपासूनच रस्ते गर्दीने फुलून गेले. विविध मंडळांनी गणेश याग आयोजित केला होता. उत्सवातील सर्वाधिक गर्दी होणार हे ध्यानात घेऊन कार्यकर्त्यांनीही रात्र जागवून काढली. सर्वोच्च न्यायालयाच्या र्निबधांतून रात्री बारापर्यंत ध्वनिक्षेपक सुरू ठेवण्यासाठी सवलत मिळाल्यामुळे आज मध्यरात्रीपर्यंत देखावे पाहण्यासाठी गर्दी झाली होती. आभाळ भरून आलेले असताना सायंकाळी बरसलेली रिमझिम सर अंगावर झेलत अनेकांनी गणेश मंडळांचे देखावे पाहण्याचा आनंद द्विगुणित केला. रविवारच्या सुटीचे औचित्य साधून गणेशोत्सव मंडळाचे देखावे पाहण्यासाठी अनेक घरांमध्ये सायंकाळी स्वयंपाकाला सुटी देण्यात आली होती. रात्री बारानंतर ध्वनिक्षेपक बंद झाल्यावरही देखावे पाहण्यामध्ये गुंग झालेल्या गणेशभक्तांचा उत्साह तसूभरही कमी झाला नव्हता.