पावसाने घेतलेली विश्रांती आणि रविवारच्या सुट्टीआधीचा दिवस असा दुहेरी लाभ घेत सहकुटुंब घराबाहेर पडलेल्या नागरिकांच्या गर्दीने शनिवारची रात्र जागवून काढली. गणेश मंडळांचे देखावे पाहताना रात्र सरली आणि पाय थकले असले तरी उत्साह कायम होता. यंदाच्या उत्सवाने शनिवारी सर्वोच्च गर्दीचा अनुभव घेतला.
गणेश चतुर्थीपासून दररोज हजेरी लावणाऱ्या पावसाने शनिवारी विश्रांती घेतली. सोमवारी (८ सप्टेंबर) अनंत चतुर्दशी असल्याने मंडळांचे देखावे रविवारी सायंकाळपासूनच उतरविण्यास सुरुवात होण्याची शक्यता ध्यानात घेऊन गणेशभक्तांनी शनिवारची रात्र जागविली. त्याचप्रमाणे रविवारी सायंकाळी विविध मंडळांमध्ये सत्यनारायणाची महापूजा होत असल्याने कार्यकर्ते त्यामध्येच व्यग्र असतात. त्यामुळे शनिवारी तिन्हीसांजेपासूनच शहराच्या मध्यभागातील रस्ते नागरिकांच्या गर्दीने फुलू लागले. रात्री आठनंतर वाहनचालकांना माणसांच्या गर्दीतून वाट काढणे मुश्कील झाले होते. रस्त्याच्या कडेला दुकाने थाटलेल्या छोटय़ा व्यापाऱ्यांनी एकाच दिवसांत उत्सवातील व्यवसायाची कसर भरून काढली. दररोज येणाऱ्या पावसापासून बचाव करण्यासाठी नागरिक जय्यत तयारीनिशी बाहेर पडले.
ध्वनिक्षेपक मध्यरात्रीपर्यंत सुरू ठेवण्याची सवलत मिळाल्यामुळे ऐतिहासिक, पौराणिक आणि वैज्ञानिक देखावे पाहण्यासाठी रात्री बारापर्यंतचा वेळ राखून ठेवण्यात आला होता. तर, मानाच्या पाच गणपतींसह श्रीमंत दगडूशेठ हलवाई, अखिल मंडई मंडळ आणि श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट या गणपतींचे दर्शन घेण्यासाठी मध्यरात्रीनंतर गर्दी झाली होती. संगीताच्या तालावर नर्तन करणारी नातूबाग मित्र मंडळाची विद्युत रोषणाई, विज्ञानाची जिज्ञासा निर्माण करणारे अखिल शनिवार पेठ मेहुणपुरा मंडळ आणि नातूवाडा मित्र मंडळाचे देखावे, फिरत्या रंगमंचाचा वापर करून साकारलेली पूर्वीची आणि सध्याची गणेश विजर्सन मिरवणूक हा हत्ती गणपती मंडळाचा देखावा पाहण्यासाठी गर्दी लोटली होती. थकलेली पावले हॉटेलच्या दिशेने गेली आणि सायंकाळच्या स्वयंपाकापासून रजा घेतल्यामुळे कुटुंबीयांनी विविध खाद्यपदार्थाचा आस्वाद घेतला. ताजेतवाने झाल्यावर पुन्हा एकदा अधिकाधिक देखावे पाहण्याचा आनंद लुटण्यात आला. रविवारची सुट्टी असल्याने दिवसभर विश्रांती घेता येईल या उद्देशातून अनेकांनी भल्या पहाटेच घरी परतणे पसंत केले.