संगीताचं वय तेव्हा तीस-बत्तीस इतकचं असेल. कलेच्या प्रांतात मोठा लौकिक असलेले त्यांचे वडील शंकरराव ऊर्फ नाना पालकर यांचं वय झालं होतं. दर गणेशोत्सवात अखिल मंडई मंडळाची श्री शारदा-गजाननाची मूर्ती रंगवण्याचे काम नाना चाळीसएक वर्ष करत होते. नानांना दोन्ही मुलीच. वय झाल्यामुळे त्यांना काम शक्य होत नव्हतं आणि दोन्ही मुलींमुळे हे काम आता आपल्या घराण्यात पुढे कोण करणार अशी चिंता त्यांना पडली होती. नानांना दिलासा द्यायला संगीता पुढे आली आणि तिने त्यांना शब्द दिला, तुम्ही काळजी करू नका.. हे काम मी करीन.. आणि संगीता वेदपाठक शारदा-गजाननाच्या मूर्तीचं अप्रतिम रंगकाम गेली चौदा वर्ष करत आहेत.
मूर्तिकाम, रंगकाम यात सर्वत्र पुरुष कलाकारांची मक्तेदारी असली, तरी संगीताने मात्र मंडई मंडळाचे काम प्रतिवर्षी उत्कृष्ट रीत्या करत त्यांच्या हाती असलेल्या कलेची मोहोर उत्सवावर उमटवली आहे. नाना पालकर जेव्हा हे काम करायला मंडईत जायचे, तेव्हा हुजूरपागेत शिकणारी छोटी संगीताही त्यांच्याबरोबर असायची. तिचा हात कलेचा होता आणि चित्रकलेचीही आवड होती. वडिलांचं काम जवळून पाहायला मिळत होतं. त्यामुळे रंगकामाचे धडे तिला लहानपणापासूनच मिळाले. याच जोरावर चौदा वर्षांपूर्वी संगीता वेदपाठक यांनी मंडई मंडळाचं काम स्वतंत्रपणे स्वत:कडे घेतलं आणि पहिल्याच वर्षी त्यांच्या कामाचं खूप कौतुकही झालं.
ही मूर्ती खूप वेगळी आणि वैशिष्टय़पूर्ण आहे. गजाननाचे पाय शारदा चेपत आहे आणि दोघांमध्ये काही संवाद सुरू आहे, असं मूर्तीचं रूप आहे. मूर्ती उत्सवासाठी दरवर्षी रंगवली जाते. हे काम तीन आठवडे चालतं. संगीता वेदपाठक त्यासाठी रोज संध्याकाळचे तीन-चार तास देतात. मूर्ती रंगकामातील शेडिंग ही सर्वात महत्त्वाची गोष्ट. ते चांगलं जमलं की मूर्ती खुलते आणि मूर्तीच्या चेहऱ्यावरील प्रसन्न भाव भाविकाला सुखावतात. या मूर्तीच्या डोळ्यांमधील जिवंतपणा टिपण्यासाठी वेदपाठक यांचं सारं कसब पणाला लागतं. शारदा पाय चेपत असताना स्मितहास्यही करत आहे, तिचा चेहरा गोंडस आहे, हे सारे भाव गालावर दिसले पाहिजेत, ते ब्रशमधून उतरले पाहिजेत, गजाननाच्या सोंडेवरचं नक्षीकाम देखील सुंदर झालं पाहिजे, चेहऱ्यावरील पावित्र्य जाणवलं पाहिजे, असे अनेक बारकावे त्यांना रंगकामातून उतरवावे लागतात.
काम पूर्ण झाल्यावर काय वाटतं याचा अनुभव त्या सांगत होत्या. त्या म्हणतात, की माझं काम पाहून जुनी मंडळी माझ्या वडिलांच्या आठवणी मला सांगतात. माझ्या कामाचंही आवर्जून कौतुक करतात. त्या वेळी वडिलांना दिलेला शब्द खरा केल्याचं समाधान मला मिळतं. श्री गणेश चतुर्थीला शारदा-गजाननाची प्राणप्रतिष्ठा झाली, की हजारो भाविक मूर्तीचं दर्शन घेताना त्यांच्या चेहऱ्यावर जे भाव उमटतात, तीच माझ्या कामाची पावती असते.