मोठा भाऊ भात, कालवण बनवायचा ते आम्ही नुसतं पाहिलेलं. त्या पूर्वज्ञानावर आम्ही धाडस करायचं ठरवलं. स्टोव्ह कसा पेटवतात हे आम्हाला माहीत होतं. आम्हाला दोघांना खूप भूक लागली होती म्हणून जरा जास्तच म्हणजे पातेलं भरून तांदूळ घेतले. धुतले नि पाणी घालून स्टोव्हवर पातेलं ठेवलं. दहा-एक मिनिटांनंतर तांदूळ शिजल्यामुळे पातेल्याच्या वर येऊ लागले. थोडय़ा वेळाने तर शिजलेल्या भाताचा डोंगरच पातेल्यात उभा राहतोय की काय अशी अवस्था निर्माण झाली.

शालेय शिक्षणासाठी गावापासून दूर राहिले तर मुलांचे शिक्षण चांगले होईल. या हेतूने वडिलांनी परिस्थिती नसतानाही मोठा भाऊ व मला ओतुर, तालुका जुन्नर येथे पाठवले. तेव्हा माझं वय जेमतेम बारा-तेरा वर्षांचं! मोठा भाऊ ११ वी विज्ञान या वर्गात शिक्षण घेत होता, तर मी ७ वीच्या वर्गात. मार्च-एप्रिलचे दिवस असावेत. गावाकडच्या माणसांना आमच्याबद्दल प्रचंड सहानुभूती वाटायची. पोरं काय करत असतील, काय खात असतील, असं म्हणायची. या त्यांच्या सहानुभूतीवरच आम्ही दिवस ढकलत होतो.

Concession for students to attend school due to highest temperature in state
विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहण्याबाबत सवलत… काय आहे शालेय शिक्षण विभागाचा निर्णय?
design courses at iit bombay
डिझाईन रंग- अंतरंग : डिझाईन शिक्षण: विद्यार्थी, पालकांमधील सर्जनशीलता वाढवणारा दुवा
Centers for training of medical teachers are insufficient in the state
राज्यात वैद्यकीय शिक्षकांच्या प्रशिक्षणासाठी केंद्र अपुरे; वैद्यकीय शिक्षक संघटना म्हणते…
ravindra shisve
माझी स्पर्धा परीक्षा: अपयश म्हणजे अंत नाही

एकदा गावाकडून येताना सोबत माझा चुलत भाऊ माझ्यासोबत आला. तो जेमतेम सात-आठ वर्षांचा! पण आम्ही सोबतीने वाढलेलो. एकमेकांबद्दल प्रचंड ओढा. तो हट्टाने माझ्यासोबत ओतुरला आला. पहिले दोन दिवस मोठय़ा भावाने आम्हाला व्यवस्थित जेवू- खाऊ- पिऊ घातले; परंतु तिसऱ्या दिवशी त्याची परीक्षा व वर्ग असल्याने तो सकाळी जाऊन दुपारी चार वाजताच परत येणार होता. मी व माझा छोटा भाऊ दिनू आम्ही दोघेच घरी राहिलो. मोठा भाऊ कॉलेजला निघून गेला. तेव्हा दिनू झोपलेलाच होता. तो उठल्यावर आम्ही आधीच बनवलेला चहा घेतला; पण जसा-जसा वेळ जाऊ लागला, तसतशी भूक वाढत गेली. आम्ही दोघे खोलीतून बाहेर- बाहेरून खोलीत उठत-बसत-गप्पा मारून वेळ घालवत होतो. मलाच इतकी भूक लागली होती, तर दिनूचे काय झाले असेल असा क्षणभर विचार आला. मी त्याला जवळ घेतलं नि म्हणालो, ‘‘चल, आपण भात करू.. भाऊ करतो तसा..’’

मोठा भाऊ भात, कालवण बनवायचा ते आम्ही नुसतं पाहिलेलं. त्या पूर्वज्ञानावर आम्ही धाडस करायचं ठरवलं. स्टोव्ह कसा पेटवतात हे आम्हाला माहीत होतं. आम्हाला दोघांना खूप भूक लागली होती म्हणून जरा जास्तच म्हणजे पातेलं भरून तांदूळ घेतले. धुतले नि पाणी घालून स्टोव्हवर पातेलं ठेवले. थोडय़ा वेळात जेवायला मिळेल यातच सारा आनंद मावला होता. आम्ही स्टोव्हभोवतीच बसलो होतो. दहा-एक मिनिटांनंतर तांदूळ शिजल्यामुळे पातेल्याच्या वर येऊ लागले. थोडय़ा वेळाने तर शिजलेल्या भाताचा डोंगरच पातेल्यात उभा राहतोय की काय अशी अवस्था निर्माण झाली. आम्ही एक आयडिया केली. भाऊ ला समजू नये म्हणून एका प्लास्टिकच्या पिशवीत वर आलेला भात भरला. स्टोव्ह थोडा कमी केला. भात शिजावा म्हणून थोडे पाणी टाकले. भाऊ रागावू नये म्हणून दिनूला अर्धा-कच्चा शिजलेला भात फेकून द्यायला सांगितले; पण तो बाहेर एकटा जायला घाबरू लागला. आम्ही दोघे ती पिशवी लपवत-लपवत  गेलो व पिशवी लांब भिरकावून आलो. खोलीचा दरवाजा ढकलून आत येऊन आत पाहतो तर पातेल्यात भाताचा पुन्हा एक नवा डोंगर उभा राहिलेला. आम्ही दोघांनी एकमेकांकडे पाहिले. आता आमच्या भुकेपेक्षा आम्हाला मोठय़ा भावाची भीतीच अधिक वाटू लागली होती. दिनूने परत एक प्लॅस्टिकची पिशवी शोधली. वर आलेला भात आम्ही चमच्याने पुन्हा पिशवीत भरला. उरलेला भात शिजावा म्हणून थोडं पाणी घातलं, कारण असं नंतर पाणी टाकताना आईला, भाऊला पाहिलं होतं.

खोलीचे दार ओढून पुन्हा आम्ही दोघे जण रस्त्याकडे निघालो. भाऊ येत नसल्याचे पाहून पिशवी लांब भिरकावून दिली. घाईघाईने खोलीत आलो, तर पुन्हा तेच दृश्य! आम्ही दोघे क्षणभर हसलो! क्षणभरच! कारण आमचा बेत फसला आहे याची खात्रीच झाली. भाऊ रागावण्याची भीती नि हा भाताचा डोंगर होण्याची प्रक्रिया थांबणार कधी, असा प्रश्न मनात करू लागला; पण त्या वयातही दिनू मला फार ‘परिपक्व’ वाटला. त्याने पुन्हा पिशवी शोधायला सुरुवात केली. खोलीत दुसरी पिशवीच नव्हती. माझ्या दप्तराची पिशवी तेवढी दिसत होती; पण मला ती दप्तरासाठी हवी होती. दिनू म्हणाला, ‘‘आपण कागदात भात भरू. मग पिशवीत ठेवू. भात फेकू नि पिशवी परत आणू.’’ मला सल्ला आवडला. आता आम्ही ठरवलं की, खोलीच्या दाराला आतून कडी लावायची. पातेल्यातील भात जोपर्यंत वर येत राहील, तोपर्यंत तो काढत राहायचा. सगळ्यात शेवटी तो फेकायला जायचे. तासभराने अर्धी पिशवी भरून भात आम्ही फेकून आलो. खोलीचे दार सताड उघडले. स्टोव्ह बंद केल्यामुळे शांतता होती. भाऊ अजून आला नव्हता. दुपारचा एक वाजला होता. भाताबरोबर कालवण करण्याचा विचारसुद्धा आमच्या मनात आला नव्हता. प्रचंड भूक लागली होती. मी दिनूला म्हटलं, ‘‘जेवायचं आपण नुसता भात?’’ तो खुशीतच ‘हो’ म्हणाला. एका मोठय़ा पसरट ताटात भात थंड केला नि एकमेकांकडे पाहत खाऊ लागलो. भाऊ येण्याची भीती नि प्रचंड भूक यामुळे सात-आठ मिनिटांतच आम्ही भात संपवूनही टाकला. भातात मीठ नव्हतं याची जाणीवही आम्हाला झाली नाही. मग वेळ न दवडता आम्ही पातेले, ताट, चमचा साफ करून स्वच्छ केले. ‘जैसे थे’ मांडून ठेवले. मग खोलीच्या उंबऱ्यावर बसून भाऊची वाट पाहत बसलो.

या भूतकाळातून शिकत-शिकत एका टप्प्यावर येऊन पोहोचलो. आयुष्याच्या एका वळणावर हॉटेलात काम केले. कुकच्या हाताखाली असताना अनेक पदार्थाच्या रेसिपी न्याहाळल्या. ‘कॅटर्स’च्या व्यवसायातून नवे प्रयोगही केले. प्रत्येक शहराची ओळख असलेल्या खाऊगल्लीत ‘चवदार’ पदार्थ चाखून पाहण्याची आवड जोपासली. एकटेपणाच्या काळात अन्नाची किंमत जाणली. आज अनेक पदार्थ छान, चवदार, नव्या पद्धतीने बनवता येतात. अनेक चवींनी जीभ समृद्ध झाली आहे. घरात बनवलेल्या प्रत्येक पदार्थाची तुलना, सरसता पूर्वानुभवाशी ताडून पाहतो. तरी भुकेचा डोह शमवणारा तो ‘पहिला भात’ मनातून जात नाही.

भूक मग ती कोणतीही असू द्या, मन व्याकूळ करते, मन हाव करू लागते. खूप भूक लागली म्हणून पातेले भरून तांदूळ घेतले. तांदूळ शिजवून फुगतात हे वास्तव विसरलो नि अन्नाची नासाडी झाली. हा नवा धडा आयुष्यात मिळाला. इतक्या वर्षांनंतरही दिनू नि मी एकत्र येतो; त्या ‘भाताची’ आठवण काढतो. शितासारखी मने एकरूप होऊन जातात आमची! फसलेल्या भाताने आम्हा दोघा भावंडांना घडवलं हेच खरं!

यशवंत सुरोशे  chaturang@expressindia.com