सूर्य बुडाल्याबरोबर मधुकरला वेळेचे भान आले. लगेच गुहेमध्ये जाऊन तो पाहून आला. त्याला गुहेच्या एका कोपऱ्यात तीन दगडांची चूल आणि थोडी जळणाची लाकडे पडलेली दिसली. गुहा जेमतेम दहा बाय दहा आकाराची होती. गडावरच्या थंड हवेमुळे पोटात भुकेची जाणीव होऊ  लागल्याबरोबर एकेकाने सॅकची चाचपणी सुरू केली. प्रत्येकाने घरून काही ना काही आणायचे असे ठरवलेले असल्यामुळे दोघा-तिघांनी तांदूळ, कुणी कांदे, मीठ, मसाले, डाळ, हळद, तेल असे जिन्नस बाहेर काढले..

ते मंतरलेले दिवस होते. माझ्यासह मधुकर काळे, हेमंत पितळे, विजय अरकडी, सुनील गांवकर, अरुण कोरगावकर, गणेश फाळे आणि शेखर पडवळ असे सर्व गिरीवेडे ‘एक रात्र गडावर राहायचं’ असे ठरवून निघालेलो. माळशेज घाट-माथ्यापर्यंत शासकीय बस सेवेने जाऊन खिरेश्वरला चालत निघालो. तिथल्या आश्रमशाळेतच ग्रुपमधील प्रत्येकाने सोबत आणलेल्या न्याहारीचा व इतर सर्व खाद्यपदार्थाचा फडशा पाडला. पाणी पिऊन पुढे टोलार खिंडीत पोहोचेपर्यंत दुपारचे दोन वाजलेले. खिंडीतून घोंघावणारा वारा पिऊन ताजेतवाने वाटले. तिथून उभा कातळ चढायचा होता.

घामाघूम होऊन हरिश्चंद्रगडाच्या पठारावर पोहोचलो तेव्हा चार वाजलेले. अजून हरिश्चंद्राचे मंदिर आणि गुहा भरपूर दूर होत्या. दोन-अडीच तास तरी नक्कीच लागणार होते. तारामती तिथून आणखी वर. उंची ४७१३ फूट, एवढय़ा उंचावरून चौफेर दिसणारी धरती.. अहाहा.. केवळ स्मृतिपटलावर कोरून ठेवावी अशी. तिथून पुढे एका गिरीविहार संस्थेने काळ्या कातळावर चुन्याने केलेल्या बाणांच्या खुणांबरहुकूम पाय उचलला. किती वेळ चाललो, पण वाट संपता-संपेना. गप्पा मारत चालताना बराच वेळ गेला. सूर्य मावळतीला चाललेला आणि एकदाचे हरिश्चंद्राचे घळीमधले पुरातन मंदिर दृष्टीस पडले आणि सर्वाना हायसे वाटले. मंदिरापासून थोडे पुढे गेल्यावर कातळामधील गुहा दिसली. लगेच सगळे आपापल्या सॅकला टेकून आडवे झालो.

मंद वाऱ्यामुळे मस्त श्रमपरिहार झाला. सूर्य बुडाल्याबरोबर मधुकरला वेळेचे भान आले. लगेच गुहेमध्ये जाऊन तो पाहून आला. त्याला गुहेच्या एका कोपऱ्यात तीन दगडांची चूल आणि थोडी जळणाची लाकडे पडलेली दिसली. म्हणजे रात्रीच्या जेवणाची काहीतरी सोय करता येईल याची त्याने खात्री करून घेतली. गुहा जेमतेम दहा बाय दहा आकाराची होती. गडावरच्या थंड हवेमुळे पोटात भुकेची जाणीव होऊ  लागल्याबरोबर एकेकाने सॅकची चाचपणी सुरू केली. प्रत्येकाने घरून काही ना काही आणायचे असे ठरवलेले असल्यामुळे दोघा-तिघांनी तांदूळ, कुणी कांदे, मीठ, मसाले, डाळ, हळद, तेल असे जिन्नस बाहेर काढले. हेमंतच्या आईने त्याला सोडे दिले होते. घरी वेळप्रसंगी साधा भात, मुगाची खिचडी असे पदार्थ करण्याची सवय मला होती. माझ्या लहानपणी वडील व त्यांचे मित्र एखाद्या छानशा पिकनिक स्पॉटवर जाऊन स्वत:च जेवण बनवून एन्जॉय करीत. बरेचदा मलाही ते बरोबर नेत. त्यामुळे एखादा पदार्थ बनवण्याचे धाडस माझ्यात आले असावे.

दिवसभराच्या चालण्यामुळे थकवा आलेला असल्यामुळे काहीजणांना जेवणाचासुद्धा कंटाळा आलेला, त्यामुळे काही जण चक्क झोपून गेले. बाकीचे मित्र इतर सर्व मदत करायला तयार होते, त्यामुळे जेवणाची जबाबदारी मी घेतली. समोरचे जिन्नस पाहून माझ्या डोक्यात कल्पना आली. त्या काळात ठाण्याच्या रंगायतनच्या उपाहारगृहामधे सोडे-भात हा प्रसिद्ध पदार्थ मिळतो असे ऐकून होतो. इथे मला आयतीच संधी चालून आलेली, म्हटले नवीन प्रयोग करून पाहायला काय हरकत आहे? मग मी घोषणाच करून टाकली. ‘मी सोडय़ांची खिचडी बनवतोय!’ ते ऐकून काळे व हेमंत दोघेही चूल पेटवण्याच्या तयारीला लागले. विजयला ती कल्पना खूपच आवडली असावी, तो गाणे गुणगुणायला लागला. गणेशला म्हटले ‘सर्व तांदूळ जमा करून चार-पाच वेळा चांगला धुऊन आण.’ त्याने मोठा टोप आणला होता, त्यात सर्व तांदूळ, जवळपास एक-सव्वा किलो झाला असावा. (पण तो कोलम होता, बासमती नव्हता. म्हटले काही हरकत नाही, प्रयोगच आहे.) तो तांदूळ घेऊन व बाहेर काळोख असल्यामुळे बॅटरी घेऊन गुहेजवळच असलेल्या पाण्याच्या टाकीवर गेला. शेखर पडवळ पण बॅटरी धरायला त्याच्याबरोबर गेले. हेमंतच्या आईने सोडे पण भरपूर दिले होते, जवळपास एक मोठे वाडगे भरून होते. ते पाण्यात धुऊन भिजत घातले. कोरगांवकरानी गप्पा मारत-मारत छानपैकी कांदे कापून दिले. विजयने लसूण सोलून तिथल्याच एका दगडावर आल्या-मिरचीबरोबर ठेचून दिले. चुलीतली लाकडे बऱ्यापैकी पेटू लागली होती, त्यामुळे अंधारी गुहा उजळून निघाली. सगळ्यांची लगबग सुरू होती. दुसरा मोठा टोप होता तो चुलीवर ठेवून त्यात तेल घातले. ते चांगले तापल्यावर त्यात कांदा घालून छान परतला. मग त्यात ठेचलेले आले मिरची लसूण घातले. फोडणीचा वास गुहेत पसरला. गंमत म्हणजे गुहा जेमतेम उभे राहाता येईल एवढीच उंच होती, चूल पेटवताना झालेला सगळा धूर गुहेत वर जमा झाला होता, त्यामुळे उभे राहिल्यावर श्वास घेणे अवघड जात होते. म्हणून मग सर्व जण खाली बसूनच गप्पा मारू लागलो. फोडणीमध्ये भिजून नरम झालेले सोडे घालून परतले. मग त्यात दोन चमचे हळद आणि सहा चमचे तिखट घालून चांगले परतले. परत एकदा संपूर्ण गुहा झणझणीत वासाने भरून गेली. गणेशने धुऊन आणलेला तांदूळ त्यात घालून थोडा वेळ सर्व परतले. मग बरोबर आणलेल्या बाटल्यांमधले भरपूर पाणी अंदाजे घालून छान उकळी येऊ  दिली. चूल धडाक्यात पेटलेली होती. त्यामुळे उकळी पटकन आली व पाणीही लगेच आटले. त्यात अंदाजे मीठ घालून विस्तव एकदम कमी करून टोपावर मोठे झाकण ठेवून खिचडी वाफेवर शिजत ठेवली.

थोडय़ा वेळाने, गुहेत पसरलेल्या खिचडीच्या वासाने सुनीलची झोप चाळवली गेली व तो ताड्कन उठून बसला. सगळ्यांनी आपापली ताटे व चमचे बाहेर काढले आणि चुली भोवतीच कोंडाळे करून पंगत बसली. सगळ्यांनाच मोठी उत्सुकता लागून राहिलेली. वासामुळे सगळ्यांच्याच पोटात भुकेचा डोंब उसळला होता. ‘काहीच खायला नको’ म्हणणारे पण ताजेतवाने होऊन ताट सरसावून बसले. आता खिचडी मस्त तयार झालेली होती. सगळ्यांनी भरपूर वाढून घेतली. चुलीवरची एकदम गरमागरम असल्यामुळे कोणीही पटपट खाऊ  शकत नव्हते. पण जसजशी खिचडी निवू लागली तसतसे एकेकाच्या तोंडातून वाहवा येऊ  लागले. माझा प्रयोग यशस्वी झाला. वास्तविक खिचडीच्या चवीमागे हरिश्चंद्रगडावरील त्या गुहेतील वातावरण, लाकडाच्या विस्तवाची चूल व प्रत्येकाच्या पोटात उसळ्लेला भुकेचा डोंब हीच खरी कारणे होती असे मला वाटते. आज इतक्या वर्षांनीसुद्धा सगळे त्या हरिश्चंद्रगडावरील खिचडीची आठवण काढतात.

किशोर साळवी

salvi.kishor@gmail.com