अंदाजे मीठ, तेल घालून कणीक भिजवली. जरा घट्टच झाली म्हणून थोडे पाणी घातले तर जरा सैलच झाली. सैल झालेल्या कणकेचाच वापर करायचा ठरवला. गॅसवर फ्रायपॅन ठेवून पराठे लाटायला घेतले. पहिला मोडलाच. बाजूला ठेवला. दुसरा बऱ्यापैकी झाला, पण तव्यावर जाण्याआधीच त्याने अंग टाकले. मी माझे सगळे कौशल्य पणाला लावले, पण जमेचना. मग मात्र प्रचंड घाबरलो. आता एवढय़ा सगळ्याचे काय करायचे?

लग्नाला दोनच वर्षे झाली होती. माझी बायको, अश्विनी सुगरण, अगदी अन्नपूर्णा होती. छान छान स्वयंपाक करायची. त्यामुळे मला एखादा पदार्थ करण्याची संधी कधी तरीच मिळायची; पण मिळाली की, मी त्याचं सोनं करायचो. एकदा ती आठ दिवस पुण्याला, माहेरी गेली होती. परतीच्या दिवशी दुपारचं जेवण करूनच येणार होती. सोबत आई-बाबाही येणार होते. सातारला ते ४-५ वाजेपर्यंत पोहोचणं अपेक्षित होते. मला एक कल्पना सुचली.

आज एखादा खमंग गरमागरम पदार्थ करून तिच्या आई-बाबांना सरप्राइज द्यायचं. मग ठरलं, आलू पराठे करायचे. बायकोला करताना बऱ्याच वेळा पाहिलं होतं. मलापण येईलच की! हा (फुका) विश्वास होताच. आल्या आल्या चहा आणि ही डिश देऊ नाही तर रात्री जेवणातही होतील, असा विचार केला. चांगले १० बटाटे कुकरला लावले. ते उकडेपर्यंत मग आलं, लसूण, मिरची-कोथिंबीरची पेस्ट केली. उकडलेले बटाटे थंड झाल्यावर बारीक कुस्करून घेतले. त्यात साखर, मीठ, पेस्ट घालून मिश्रण तयार केले. थोडेसे खाऊन बघितले, मस्त लागले. मग अंदाजे मीठ, तेल घालून कणीक भिजवली. जरा घट्टच झाली म्हणून थोडे पाणी घातले तर जरा सैलच झाली. सैल झालेल्या कणकेचाच वापर करायचा ठरवला. गॅसवर फ्रायपॅन ठेवून पराठे लाटायला घेतले. पहिला मोडलाच. बाजूला ठेवला. दुसरा बऱ्यापैकी झाला, पण तव्यावर जाण्याआधीच त्याने अंग टाकले. मी माझे सगळे कौशल्य पणाला लावले, पण जमेचना. मग मात्र प्रचंड घाबरलो. आता एवढय़ा सगळ्याचे काय करायचे? विचार आणि श्रम यांनी घामाघूम व्हायला झाले. इतके करेपर्यंत कचरा, भांडी आणि पराठय़ांच्या अवशेषांनी टेबल, कट्टा भरून गेले होते. कपडय़ावर, चेहऱ्यावरपण त्याच्या खुणा पसरल्या. ते आवरता येतील नंतर, पण आता पराठे कसे करणार? जरा विचार केला, ‘बटाटेवडे’ केले तर? बस् ठरलं तर मग!

लगेच कणीक झाकून बाजूला सरकवली आणि २-४ कांदे चिरायला घेतले. चिरताना डोळ्यांची आग आग व्हायला लागली, पाणी व्हायला लागले. त्याच हाताने पुसत होतो. काही वेळ समोरचं दिसणंच बंद झालं. मध्येच सुरीने बोट कापलं गेलं. रक्त वाहायला लागलं. तसाच हात धुऊन पट्टी लावली. कांदा परत चिरून त्या मिश्रणात घातला. मिश्रणाचे लिंबाएवढे गोळे करून ताट भरलं. मग दोन वाटय़ा डाळीचं पीठ घेऊन त्यात अंदाजे तिखट, मीठ, ओवा, तेल घालून भिजवले. तोपर्यंत उत्साह पार गेला होता. भूक लागली होती. मग अश्विनीनेच केलेले डब्यातले २ लाडू खाल्ले नि बाहेर येऊन फॅन लावून सोफ्यावर बसलो. पाणी प्यालो. जरा तरतरी आली. दुपारचे साडेतीन वाजले होते. परत स्वयंपाकघरात गेलो. चिक्कार पसारा झाला होता, पण म्हटलं आवरू नंतर.

गॅसवर कढई ठेवून वडे तळायला घेतले. म्हणजे पाहुणे मंडळी आल्यावर लगेच त्यांना गरम गरम खायला मिळतील. तेल अंदाजे घातले होतेच. तसा अंदाज होताच ना! तळताना हातावर तेल उडत होते, भाजत होते, पण हार मानली नाही. १५-२० वडे झाले असतील तोच दारावरची बेल वाजली. मंडळी आली होती, ‘‘अय्या! कित्ती छान, खमंग वास येतोय,’’ असे म्हणत अश्विनी स्वयंपाकघरात आली. आई-बाबा बाहेर सोफ्यावर बसले. ताटातले वडे पाहून ती जाम खूश झाली. ‘‘मला भूक लागलीच होती,’’ असं म्हणत तिनं डिश भरून बाहेर नेल्या. तोपर्यंत आणखी ७-८ वडे झाले. ‘‘तुम्हीपण चला’’ म्हणायला आत आली आणि झाकलेली कणीक पाहिली. ‘‘अहो, हे काय? कणीक कशाला लागते बटाटेवडय़ाला?’’

‘‘अगं! हळू बोल. पराठे करणार होतो, पण त्याचा ‘फियास्को’ झाला. मग बटाटेवडे केले’’ म्हणतच बाहेर आलो. सगळ्यांनी गप्पा मारत बटाटेवडे फस्त केले. सासू-सासरेपण खूश झाले. सासरे म्हणाले, ‘‘जावईबापू! आश्चर्यचकित केले हो! मस्त, छान झाले आहेत. तुम्ही अगदी बेस्टच कुक आहात!’’

इतक्यात अश्विनी म्हणाली, ‘‘अहो बाबा, हे आलू पराठे करणार होते. त्यात बिघाड झाला (आता हे सांगायची काय गरज होती का?) आणि मग त्याचे बटाटेवडे झाले. आई! काही पदार्थ बिघडला कधी, तर त्यातून मार्ग काढून ‘हे’ त्याची चांगली रेसिपी करतात. मागच्या रविवारी ‘भात-पिठले आज मी करतो’ म्हणाले. पिठल्याचं प्रमाण चुकलं, जास्तच झालं. बरंच उरलं. संध्याकाळी माझ्या दोन मैत्रिणी येणार होत्या. यांनी त्या पिठल्यात आणखी पीठ, तिखट, मीठ, मिरची-लसूण, कोथिंबीर घालून तेलाची फोडणी करून वाफ आणली चांगली आणि ताटाला तेल लावून वडय़ा थापल्या आणि ‘पाटवडय़ा’ केल्या. वर खोबरे, कोथिंबीर घातली. (नाही तरी इतक्या पिठल्याचे काय करणार होतो?) इतक्या सुंदर झाल्या होत्या ना? मैत्रिणींनी यांचं तोंडभर कौतुक करत सगळ्याचा फडशा पाडला. जरा राग आणि हेवा वाटला, पण ते कौतुकास पात्र होतेच. आजही त्या मैत्रिणी यांचं कौतुक करतात आणि ‘जिजाजी’ पाटवडय़ा खायला केव्हा येऊ परत? असं विचारतात.’’ अश्विनीनं माझं कौतुक केल्यानं मी चांगलाच सुखावलो.

अश्विनीने चहा केला अािण आम्ही आनंदाने सगळे वडे फस्त केले. माझा तर बराच अवतार झाला होता, थकवापण आला होता; पण सर्वाच्या चेहऱ्यावरचं समाधान, तृप्ती पाहून भरून पावलो आणि सर्व कष्ट विसरलो. तिचे आई-बाबा तर माझे कौतुक करताना थकत नव्हते. मी बायकोला म्हणालो, ‘‘अश्विनी! अगं, ती कणीक?’’

‘‘असू दे हो! उद्या त्यातच कणीक घालून पोळ्या करीन. तुमची बायको आहे म्हटलं. आता काही काळजी करू नका. किचनमधला पसाराही मी आवरते. तुम्ही फार दमला असाल ना! जा आवरा आणि विश्रांती घ्या.’’ इति अश्विनी. तिचं बोलणं ऐकून कृतकृत्य वाटलं. नवीन वर्षांचं मस्तच ‘सर्टिफिकेट’ मिळालं आणि तेही बायकोकडून. तेच मिळणं फार अवघड असतं हो!

मुकेश देशपांडे deshpande.mukesh@gmail.com