भाग्य
आपण सिनेमात, नाटकात मजेशीर गोष्टी घडलेल्या पाहतो आणि म्हणतो की, छे असं कुठं घडतं का? उगीच आपलं काही तरी दाखवतात झालं. पण काहींच्या आयुष्यात असं घडतं की त्यांचं आयुष्यच बदलून जातं. ७० वर्षांपूर्वी सदू आपलं कोकणातलं गाव, आई-वडील, भावंडांना सोडून मुंबईत आला होता. त्याला कारण भयंकर गरिबी. वडील लोकांची शेती करत. आई शेतावर मजुरीला जात असे. मजुरी फारच कमी मिळत असे. तेवढी मजुरी इतक्या माणसांना दोन वेळच्या अन्नाला पुरी पडत नसे. एक वेळ भाताची पेज व एक वेळ भात, पातळ आमटी, मग कपडय़ाला पैसे कुठून आणणार? फाटके कपडे घालून सदू शाळेत जाऊ लागला.
पण शाळा शिकून सदूला काय नोकरी मिळणार त्यापेक्षा आतापासून हाताखाली जमीन कशी कसायची हे शिकवावं. लोकांच्या गाई-म्हशी कशा चरवायला न्यायच्या हे शिकला तर तेवढाच संसाराला हातभार लागेल. एक वेळ तरी पोटभर खायला मिळेल आणि वडिलांनी सदूची शाळा सोडवली. तो दिवसभर वडिलांच्या हाताखाली जमिनीवर राबायचा. मोटेचे पाणी काढायचा. हे सगळं बघून सदूच्या आईला वाटलं की, एवढय़ा लहानपणापासून त्याला कामाला लावण्यापेक्षा त्याला मुंबईला पाठवलं तर? तिथे सर्वाना काम मिळतं आणि पगार पण कोकणातल्यापेक्षा दुप्पट मिळतो. तसं तिचा लांबचा भाऊ मुंबईत राहत होता आणि घरी पैसे पाठवायचा.
तिने नवऱ्याला सांगितलं की सदूला आपण मुंबईला पाठवू. थोडे दिवस माझ्या भावाकडे राहील मग कुठं तरी खोली घेऊन राहील. तसं सदूला मुंबईला पाठवलं व भावाला निरोप दिला की सदूला कुठे तरी कामाला लाव. दूरच्या मामाचं गाडय़ा दुरुस्त करायचं गॅरेज होतं. त्यानं सदूला आपल्या हाताखाली घेतलं. एका वर्षांत सदू गाडय़ा धुऊन रिपेअर करू लागला. तिथेच गॅरेजमध्ये तो राहायचा. जेवणखाणं, कपडे सगळं मामाच करायचा. वर १० रुपये मनिऑर्डरने बहिणीकडे पाठवू लागला. बघता बघता दोन-तीन वर्षे गेली आणि एके दिवशी एक युरोपिअन बाई आपली शेव्हरलेट गाडी घेऊन आल्या. सदू लगेच पुढे होऊन गाडीत काय खोट आली ते पाहू लागला. मामाने त्या बाईंना सांगितले की, हा माझा भाचा तुमची गाडी दुरुस्त करून ठेवेल.
२-४ दिवसांनी सदूने गाडी स्वच्छ धुऊन दुरुस्त करून तयार ठेवली होती.
त्यांना सदूचं काम आवडलं. त्यांनी मामाला विचारलं की हा मुलगा माझ्याकडे काम करील का? माझी बेकरी आहे त्याला मी सर्व शिकवून तयार करेन. आम्ही दोघेच असतो- तरी घरातलं पण थोडं काम शिकवीन. तुझा भाचा म्हणतोस तर हा प्रामाणिक असणार, मामाने विचार केला की, या बाईंमुळे सदूचं भलंच होईल. गॅरेजमध्ये मी त्याला किती पगार देणार?
सदू बाईंच्या बेकरीत कामाला लागला. घरी पण चहा बनवणं, कपडे इस्त्री करणं, बेडशीट बदलणं हे मन लावून करू लागला. ब्रेड, बिस्किटे, केक करू लागला. राहायला घरातलीच खोली दिली, चांगले कपडे दिले. वर २५ रुपये मनिऑर्डरने आईला पाठवू लागला. सर्व व्यवस्थित चाललं होतं. पण अचानक बाईंच्या नवऱ्याला हार्टअ‍ॅटॅक येऊन तो परलोकवासी झाला. त्यातच ४७ साली देशाला स्वातंत्र्य मिळालं. बाईंनी ठरवलं की आता एकटीच राहण्यापेक्षा इंग्लंडला परत जावं. त्यांनी आपल्या वकिलाला बोलावले, सर्व कामगारांना हजर राहण्यास सांगितले. वकिलाला कागदपत्र तयार करण्यास सांगून असं जाहीर केलं, सदूने प्रामाणिकपणाने, प्रेमाने घर व बेकरी सांभाळली म्हणून मी तीन मजली दगडी घर व बेकरी सदू दाजी ताम्हणकरला बक्षीसपत्राद्वारे देत आहे आणि त्या इंग्लंडला परत गेल्या.
सदाशिवने आई-वडील, भावंडांना बोलावून घेतलं. त्याचं हे वैभव बघून त्यांना फार आनंद झाला. सदूचं भाग्य असं उजळलं.
बेकरी उत्तम चालली आहे. आता त्याची मुलं व नातवंडं सांभाळतात. सदाशिव त्याची पत्नी पार्वती आता सुखात आहेत. प्रामाणिकपणाचं फळ इतकं चांगलं मिळेल हे सदाशिवला पण वाटलं नव्हतं.

सुमा
माणसाचं आयुष्य कुठे सुरू होईल आणि कुठे संपेल हे काही सांगता येत नाही. कुठल्या वळणावर कोण भेटेल आणि आयुष्य बदलेल हे अतक्र्य, अनाकलनीय असतं. जे हवं ते मिळतंच असं नाही. कधीकधी न मागताही ओंजळ भरून वाहू लागते.
सुमाचे आई-वडील ७० वर्षांपूर्वी कोकणातल्या एका खेडेगावातून बेळगावला आले. गाव मोठे असल्यामुळे रोजगार नक्कीच मिळेल असं त्यांना वाटलं. घर शोधत असताना कुणी तरी एक चाळ दाखवली. एक खोलीचं घर घेऊन ते राहू लागले. सुमाचे वडील गवत कापण्यापासून नारळ, फणस, आंबे उतरवून देत असत. मिळेल ती कामं करत चार पैसे मिळवत असत. त्यातूनच त्यांचा असा रुटूखुटू संसार चालला होता. चार-पाच मुलं झाली आणि एके दिवशी तापाचं निमित्त होऊन सुमाचे वडील वारले. मुलं अजून तशी नोकरी करण्यासारखी नव्हती. सुमा मराठी पहिलीत होती. पण आता सर्व भार आईवर पडला. आईनं विचार केला, काही तरी करून संसार तरी चालवायला हवाच. मुलं उपाशी कशी राहतील? आईने मन घट्ट केलं पाच-सहा ठिकाणची धुणीभांडी धरली. घरचं पण व्हायला हवं, स्वयंपाक लवकर उठून करून ठेवून ती कामाला जाऊ लागली. साहजिकच थोरलीची म्हणजे सुमाची शाळा सोडवून तिला हाताखाली मदतीला घेऊन कामावर जाऊ लागली. २-४ वर्षांत सुमा धुणीभांडी व्यवस्थित करू लागली.
सुमा जशी मोठी होऊ लागली तसं आईला वाटू लागलं की तिला उत्तम स्वयंपाक पण करता यायला पाहिजे. कारण आणखीन २-३ वर्षांत तिचं लग्नपण करायला हवं आणि मग हळूहळू करत आईनं सुमाला स्वयंपाक शिकवला. सुमा उत्तम स्वयंपाकपण करू लागली. भांडी धुणी करून थोडेसे पैसे सुमाच्या लग्नासाठी काढून ठेवले आणि रत्नागिरीचे एक स्थळ आलं. मुलगा लोकांची आंबराई सांभाळत होता. आई-वडील आणि हा मुलगा एक काळ्या खापऱ्याच्या घरात राहत होते. तीही मंडळी गरीबच होती. सुमाचं लग्न झालं. इथं पण सुमाला धुणीभांडी सुटलं नाही. चार माणसांचं पोट भरायला हवं ना?
जिथं ती कामाला जायची तिथं ती त्यांना स्वयंपाकात मदत करायची. उत्तम स्वयंपाक करते म्हणून ती ओळखली जाऊ लागली. एका गृहिणीने सुमाला धुणीभांडी न करता स्वयंपाक कर. तुझ्या पुरणपोळ्या, उकडीचे मोदक लोकांना नक्की आवडतील. तसं रत्नागिरी मोठं गाव होतं. नोकरीसाठी बरेच जण बाहेरून येत असत. त्यांना सुमा उत्तम स्वयंपाक करते हे कळलं होतं. आता सुमा पहाटे उठून ७-८ लोकांचा स्वयंपाक करून डबे भरून देत असे. तिचा नवरा ते नेऊन द्यायचा. सणावारी लोकांच्या घरी जाऊन पुरणपोळ्या, मोदक करून द्यायची. संसार छान चालला होता आणि एके दिवशी एक डॉक्टरबाई सुमाकडे आल्या अणि तिला म्हणाल्या की, माझ्या बरोबर लंडनला येशील का? मी तुला महिन्याला दहा हजार देईन. फक्त माझी ७ वर्षांची मुलगी सांभाळायची आणि आम्हा तिघांचा स्वयंपाक करायचा. सुमाच्या सासूने तिला सांगितले की तू त्यांच्या बरोबर जा. मी घर सांभाळेन. या पैशामुळे मोठय़ा मुलीचे लग्न थाटात करता येईल.
सुमा ध्यानीमनी नसताना डॉ. बाईंबरोबर लंडनला गेली. बघता बघत वर्ष कसं गेलं हे कळलं पण नाही. परत यायच्या वेळी डॉ. बाईंनी तिला सर्व लंडन फिरवून दाखवलं.
परत आल्याबरोबर सुमानी आपलं घर व्यवस्थित करवून घेतलं आणि मुलीचं लग्न पण थाटात केलं.
त्या डॉ. बाईंनी लंडनची नोकरी सोडून अमेरिकेत नोकरी धरली. परत सुमाला त्यांनी विचारलं. माझ्या बरोबर चल. मी या खेपी तुला वीस हजार देत जाईन. सुमा आता अमेरिकेला गेली. गरीब माणसाला देशातच कुठं तरी जायचं म्हटलं तर दहादा विचार करावा लागतो. तिथं एक वर्ष राहून परत येताना बरीच स्थळं पाहून विशेषत: नायगारा पाहताना, आजपर्यंत जे कष्ट घेतले, त्याचं सार्थक वाटलं.
परत आल्यावर तिनं डबे भरून द्यायला लागली आहे. दुसऱ्या मुलीला उत्तम शिक्षण दिलं आहे. ती नोकरी करू लागली. नवऱ्याला सेकंड हँड स्कू टर घेऊन दिली आहे. प्रसंगी आई, बहिणीला पैशाची मदत करूलागली आहे. अमेरिकेतून येताना बऱ्याच चांगल्या वस्तू आणल्या, घर सजवलं. प्रामाणिकपणाने केलेल्या कष्टाचे चीज झाले असे तिला वाटते. यापेक्षा आणखी काय हवं? परदेश प्रवास, लहान वयात बरंचसं मिळालं. सुमा म्हणते की, परमेश्वराचे किती आभार मानावेत तेवढे थोडेच आहेत.

यशोदा
आपल्या आयुष्यात अचानक काही विपरीत घडेल हे कुठं माहीत असतं? तसं जर कळलं तर किती तरी धोके टाळता येतील. पण परमेश्वराच्या मनात काय आहे हे कुणालाच कळत नाही. म्हणून तर कुणाच्या वाटय़ाला असीम सुख तर एखाद्याच्या वाटय़ाला भयंकर दु:ख येतं. मी सहज माझ्या मैत्रिणीला भेटायला गेले होते. दारात गाडी उभी होती. म्हणजे तिच्याकडे कुणी तरी बडा पाहुणा आला असणार, माझा तर्क खरा ठरला. एक बाई आणि माझी मैत्रीण बोलत बसल्या होत्या. सावळा रंग, प्रकृतीने मजबूत, कानात मोत्याच्या कुडय़ा, गळ्यात लक्ष्मीहार, मोठं मंगळसूत्र, हातात बांगडय़ा, पाटल्या, जरीच्या काठाची साडी, माझ्या मैत्रिणीनं माझी ओळख करून दिली. ही यशोदा माझी बालमैत्रीण, हिचे पती उद्योगपती आहेत. एक मुलगा, मुलगी आहे. नातवंडं आहेत.
थोडय़ा वेळानं यशोदा, परत येईन गं म्हणत गाडीतून गेली. मीही तिला विसरून गेले. मी भाजी घेत होते, त्या वेळी माझी मैत्रीण भेटली. तिने मला विचारलं तुला माहीत नसेल पण ती यशोदा माझी मैत्रीण, गेली हे ऐकून मी अवाक् झाले. कारण तिनं माझ्या मैत्रिणीनं सांगितलं की ती विहिरीत पडून गेली. हे कसं शक्य आहे?
यशोदाच्या माहेरच्या जवळच्या नातेवाईकांकडे मुंज होती. यशोदेला आग्रहाचे आमंत्रण होते. मुंज सकाळी लवकर होती म्हणून आदल्या दिवशी संध्याकाळी तिथे वस्ती करून दुसरे दिवशी मुंज झाली की जेवण करून लगेच परत यायचे ठरले होते. मुंजीचे ठिकाण शहरापासून दूर वीस मैल होते. मारुतीचे जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध होते. देवळाचा आवार मोठा होता. पण वीज आणि नळ नव्हते. मिनी बस करून मंडळी निघाली पण वाटेत बस बंद पडली. दुरुस्त होऊन पोहोचायला रात्र झाली होती. स्वयंपाकीने पुढे जाऊन स्वयंपाक करून तयार ठेवला होता. बरोबर पेट्रोमॅक्स व दोन कंदील होते. पाने वाढून ते लोक वाट पाहत होते. मंडळी बसमधून उतरून भराभर पानावर येऊन बसली. न्हाणी म्हणून थोडासा आडोसा होता. ५-६ दगड मांडले होते. हातपाय धुऊन देवाला नमस्कार करून यशोदा पानावर बसणार होती. अंधार होता, यशोदा न्हाणीत गेली आणि तिचा पाय निसरला ती तडक विहिरीत पडली. विहिरीला गडगडा नव्हता. बिनकाठाची विहीर होती. भीतीने त्याचक्षणी तिचे हृदय बंद पडले. वाट पाहून यशोदा का येत नाही म्हणून कंदील घेऊन न्हाणीकडे लोक आले. पण ती तिथे नव्हती. जोरात हाका मारल्या पण उत्तर नाही म्हणून तिचा शोध सुरू झाला. बॅटरी टाकून विहिरीत पाहिले तिथे तिचा देह तरंगत होता.
बस घेऊन, तिच्या नवऱ्याला ही बातमी सांगितली. पोलिसांना कळवले. ते पण आले. पंचनामा झाला. यशोदेचा अपघात झाला हे ठरले.
तिचा नवरा सैरभैर झाला. मुलगी लग्न होऊन सासरी गेली होती. मुलगा, सून, नातवंडे होती पण ती मंडळी आपल्यातच गुंग होती. सुनेच्या मैत्रिणी, पाटर्य़ा, भिशी यातच तिचा वेळ जायचा. मुळात ती भांडखोर होती. सासूशी तिने कधीच पटवून घेतले नव्हते. सासू-सासरे आपले कुणी नाहीतच अशी वागायची. नवरा पण तिला काही बोलायचा नाही.
मुलगी भेटायला आली, वडील एकाकी पडले आहेत हे तिच्या लक्षात आले. ती वडिलांच्या पाठीच लागली की त्यांनी आता आईची आठवण काढत कुढत बसण्यापेक्षा एखाद्या वयस्कर स्त्रीशी लग्न करून स्वतंत्र राहावं.
आणि तिच्या खटपटीला यश आलं. वडिलांनाही पटलं, एका गरीब विधवा स्त्रीशी रजिस्टर लग्न केलं.
मुलाला वेगळं घर बांधून दिलं. आपण दोघे त्या जुन्या घरात राहतात. अर्थात घर बऱ्याच दिवसांपूर्वी बांधलं होतं. पण आतून हव्या तशा सुधारणा करून घेतल्या होत्या. हॉलमध्ये यशोदेचा मोठा फोटो चंदनाच्या हाराने उठून दिसत होता. दुसरी पत्नी त्यांची काळजी घेत होती. मुलगी निर्धास्तपणे आपल्या घरी गेली.
इंदिरा वाळवेकर – response.lokprabha@expressindia.com