गोवा विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि भाजपमध्ये चुरशीची लढत झाली. यामध्ये काँग्रेस गोव्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. सत्ताधारी भाजपला मतदारांच्या नाराजीचा सामना करावा लागला आहे. भाजप आणि काँग्रेसने एकमेकांना जोरदार टक्कर दिली असली, तरी मतदारांनी कोणत्याही पक्षाला स्पष्ट कौल दिलेला नाही. त्यामुळे या पक्षांना सत्तास्थापनेसाठी छोट्या पक्षांची मदत घ्यावी लागणार आहे. काँग्रेस गोव्यातील सर्वात मोठा पक्ष ठरल्यामुळे काँग्रेसला सरकार स्थापन करण्याची सर्वाधिक संधी असेल.

काँग्रेसने १७ जागांवर विजय मिळवला आहे, तर भाजपच्या जागा २१ वरुन १३ वर आल्या आहेत. महाराष्ट्र गोमांतक आणि गोवा फॉरवर्ड पक्षाला प्रत्येकी ३ जागांवर विजय मिळवता आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एकमेव उमेदवार या निवडणुकीत विजयी झाला आहे. तर तीन अपक्षांनी विधानसभेत प्रवेश केला आहे.

गोव्यात २०१२ मध्ये भाजपने बहुमतासह सरकार स्थापन केले होते. मतदारांना भरमसाठ आश्वासने देत भाजप सत्तेवर विराजमान झाला होता. मात्र यामधील अनेक आश्वासने भाजपला पूर्णत्वास नेता आली नाहीत. खाण घोटाळ्यासंदर्भात विरोधात असताना भाजपने तत्कालीन काँग्रेसवर अनेक आरोप केले होते. २०१२च्या निवडणुकीत प्रचारादरम्यान खाण घोटाळ्यातील आरोपींना तुरुंगात डांबण्याचे आश्वासन भाजपने दिले होते. मात्र भाजपला या आश्वासनाची पूर्तता करता आली नाही. यासोबत भाजपला अनेक आश्वासनांचा विसर पडला. त्यामुळे भाजपच्या जागांमध्ये मोठी घट झाली आहे.

गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी समर्थपणे सांभाळलेले मनोहर पर्रिकर केंद्रात गेल्यावर लक्ष्मीकांत पार्सेकर यांना राज्याचे नेतृत्त्व सक्षमपणे करता आले नाही. पर्रिकर भाजपचा जनमानसातील सर्वमान्य चेहरा होते. मात्र पार्सेकरांना पर्रिकरांसारखी किमया साधता आली नाही. स्वत: पार्सेकरांनादेखील आमदारकी राखता आली नाही. पार्सेकरांची जादू चालणार नाही, याचा अंदाज आल्याने भाजपने पर्रिकरांना दिल्लीतून गोव्यात पाठवण्याचे संकेत दिले होते. मात्र याबद्दल भाजपकडून कोणतीही ठोस भूमिका घेण्यात आली नव्हती. याचा फटकादेखील भाजपला बसला.

गटबाजीने त्रस्त झालेल्या काँग्रेसने गोव्यात पहिले स्थान पटकावले. भाजपविरोधातील नाराजीचा थेट फायदा काँग्रेसला झाला. बहुतांश एक्झिट पोलमधून भाजपच गोव्यातील सर्वात मोठा पक्ष असेल, असा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र मतदारांनी हा अंदाज चुकीचा ठरवला. भाजप आणि काँग्रेस बहुमतापासून दूर असल्याने आता महाराष्ट्रवादी गोमांतक आणि गोवा फॉरवर्ड या छोट्या पक्षांना मोठे महत्त्व प्राप्त होणार आहे. या परिस्थितीत भाजपला सरकार स्थापन करायचे असल्यास मनोहर पर्रिकरांना दिल्लीतून गोव्यात पाठवले जाण्याची शक्यता आहे.

आम आदमी पक्षाला गोवा विधानसभा निवडणुकीत मोठ्या यशाची अपेक्षा होती. मात्र दिल्लीसारखा चमत्कार आम आदमी पक्षाला गोव्यात करता आला नाही. संघटन कौशल्याचा अभाव आम आदमी पक्षाला महागात पडला. आम आदमी पक्षाचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार इलव्हिस गोम्स यांचा दारुण पराभव झाला. आम आदमी पक्षाला गोव्याच्या मतदारांनी ‘झाडून’ साफ केले.

Live Updates:

५.१७: काँग्रेस सर्वात मोठा पक्ष; मात्र बहुमतापासून दूर

५.०९: तीन अपक्ष उमेदवार विजयी

४.५७: काँग्रेस १४ जागांवर विजयी; ३ जागांवर आघाडीवर

४.३६: काँग्रेस १४ जागांवर विजयी; एका जागेवर आघाडीवर

४.२७: भाजप १२ जागांवर विजयी; दोन जागांवर आघाडीवर

४.१९: काँग्रेस गोव्यातील सर्वात मोठा पक्ष; मात्र बहुमतापासून दूरच

४.१२: अपक्ष उमेदवार दोन जागांवर विजयी; एका जागेवर आघाडीवर

४.०७: काँग्रेस १४ जागांवर विजयी; दोन जागांवर आघाडीवर

४.०१: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला एक जागा

३.५६: काँग्रेसचा १४ जागांवर विजय; एका जागेवर आघाडी

३.५२: भाजप १२ जागांवर विजयी; एका जागेवर आघाडी

३.४६: काँग्रेसचा १३ जागांवर विजय; एका जागेवर आघाडी

३.४०: महाराष्ट्र गोमांतकवादी पक्ष आणि गोवा फॉरवर्ड पक्षाला प्रत्येकी ३ जागांवर यश

३.३८: आम्ही गोव्यात सरकार स्थापन करु- भाजप अध्यक्ष अमित शहा

३.३६: भाजप आणि काँग्रेसचे प्रत्येकी २ उमेदवार आघाडीवर

३.३१: भाजप आणि काँग्रेसला प्रत्येकी १२ जागांवर विजय

३.२३: भाजप आणि काँग्रेसमध्ये जोरदार चुरस

३.१६: पाच माजी मुख्यमंत्री विजयी; चर्चिल अलेमाओ, रवी नाईक, दिगंबर कामत, लुईझिन्हो फलेइरो आणि प्रतापसिंग राणे विजयी

३.१३: भाजपला ११ जागांवर यश; ३ जागांवर आघाडी

३.११: अपक्ष उमेदवार २ जागांवर विजयी; एका जागेवर आघाडीवर

३.०५: महाराष्ट्रवादी गोमांतक पक्ष ३ जागांवर विजयी

३.००: महाराष्ट्रवादी गोमांतक पक्ष २ जागांवर विजयी; एका जागेवर आघाडी

२.५८: गोवा फॉरवर्ड पक्ष ३ जागांवर विजयी

२.५५: काँग्रेसचे उमेदवार ११ जागांवर विजयी; २ जागांवर आघाडी

२.५०: भाजपला १० जागांवर यश; ४ जागांवर आघाडी

२.४८: गोवा विधानसभा त्रिशंकू राहण्याची शक्यता

२.३२: भाजप आणि काँग्रेसमध्ये चुरशीचा सामना

२.१३: काँग्रेस १५, भाजप १३ जागांवर आघाडीवर

१.५०: काँग्रेस १५, भाजप १२ जागांवर आघाडीवर

१.४६: काँग्रेसचे रवी नाईक पोंडा मतदारसंघातून आघाडीवर

१.३९: काँग्रेस १४, भाजप १२ जागांवर आघाडीवर

१.३०: मडगावमधून माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे उमेदवार दिगंबर कामत विजयी

१.२४: काँग्रेस १३, भाजप १२ जागांवर आघाडीवर

१.१७: इतर पक्ष ७ जागांवर आघाडीवर

१.११: काँग्रेस-भाजपमध्ये अटीतटीची झुंज; दोन्ही पक्ष १२ जागांवर आघाडीवर

१.०४: गोवा सुरक्षा मंचचे दोन उमेदवार आघाडीवर

१२.५७: मडगावमधून माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे उमेदवार दिगंबर कामत आघाडीवर

१२.५१: काँग्रेस १२, भाजप ११ जागांवर आघाडीवर

१२.४५: भाजप आणि काँग्रेसमध्ये चुरशीची लढत

१२.३९: भाजपचे राजेंद्र आर्लेकर पिछाडीवर

१२.३४: गोवा फॉरवर्डचे जयेश साळगावकर सालिगावमधून आघाडीवर

१२.३०: काँग्रेस १३, भाजप ९ जागांवर आघाडीवर

१२.२७: दुसऱ्या टप्प्यातील मतमोजणीला सुरुवात; भाजप-काँग्रेसमध्ये अटीतटीची लढाई

१२.२३: भाजपचे राजेश पाटणेकर बिचोलीम मतदारसंघातून विजयी

१२.१९: काँग्रेस १२, भाजप ९ जागांवर आघाडीवर

१२.१७: कुनकोलिममधून काँग्रेसचे उमेदवार क्लॅफासो फेरमतमोजणीनंतर १४९ मतांनी विजयी; मतमोजणीत क्लॅफासो ५० मतांनी पराभूत झाले होते.

१२.१४: २० जागांवर मतमोजणीला सुरुवात

१२.१०: काँग्रेस १२, भाजप ८ जागांवर आघाडीवर

१२.०७: कुनकोलिममधून काँग्रेसचे उमेदवार क्लॅफासो ५० मतांनी पराभूत; क्लॅफासो यांच्याकडून फेरमोजणीची मागणी

१२.०३: आम आदमी पक्षाचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार इलव्हिस गोम्स पराभूत; अपक्ष उमेदवार विजयी

११.५८: दुसऱ्या टप्प्यातील मतमोजणीला सुरुवात; काँग्रेसकडे आघाडी कायम

११.५५: भाजपच्या गोटात चिंता; संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकरांची गोवा भाजपच्या मुख्यालयात महत्त्वपूर्ण बैठक

११.५२: भाजप पुरस्कृत दोन उमेदवार विजयी

११.४६: काँग्रेस-भाजपमध्ये अटीतटीचा मुकाबला

११.४२: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे बंडखोर सुभाष वेलिंगकर यांचा गोवा सुरक्षा मंच दोन जागांवर आघाडीवर

११.३५: भाजपचे विद्यमान आमदार ग्लेन टिक्लो अल्डोनामधून विजयी

११.२९: काँग्रेसची आघाडी कायम; भाजप अद्याप पिछाडीवर

११.२३: आम आदमी पक्षाचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार इलव्हिस गोम्स अद्याप तिसऱ्या क्रमांकावर

११.१८: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; एकाही ठिकाणी उमेदवार आघाडीवर नाही

११.१२: गोवा फॉरवर्डचे विजय सरदेसाई विजयी; भाजप उमेदवाराचा पराभव

११.०७: काँग्रेस-भाजपमध्ये थेट लढत; मतदारांनी ‘आप’ला नाकारले

११.०२: आम आदमी पक्षाचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार इलव्हिस गोम्स तिसऱ्या क्रमांकावर

१०.५६: सेंट अँड्रेमधून फ्रान्सिस्को सिल्वेरिया यांचा विजय

१०.५०: मतदानाची वाढलेली टक्केवारी सत्ताधारी भाजपच्या विरोधात

१०.४६: काँग्रेसची आघाडी कायम; सत्ताधारी भाजपला नाराजी भोवली

१०.४२: भाजपचे आमदार मायकल लोबो आघाडीवर; लोबो मुख्यमंत्र्यांच्या शर्यतीत असलेले नेते

१०.३६: पहिल्या टप्प्यातील मतमोजणी पूर्ण; काँग्रेस आघाडीवर

१०.३०: काँग्रेस ११ जागांवर आघाडीवर

१०.२७: काँग्रेस १०, भाजप ८ जागांवर आघाडीवर

१०.२६: आम आदमी पक्षाचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार इलव्हिस गोम्स १,५०० मतांनी पिछाडीवर

१०.२४: काँग्रेस ९, भाजप ८, इतर ४ जागांवर आघाडीवर

१०.२०: काँग्रेस ९, भाजप ८ जागांवर आघाडीवर

१०.१४: आम आदमी पक्षाला अद्याप एकाही मतदारसंघात आघाडी नाही

१०.०९: चुरशीच्या लढतीत काँग्रेस आघाडीवर

१०.०५: भाजप आणि काँग्रेसमध्ये अटीतटीची लढाई

१०.०१: भाजप ९, काँग्रेस ७ जागांवर आघाडीवर

९.५७: भाजप, काँग्रेस प्रत्येकी ८ जागांवर आघाडीवर

९.५१: भाजपला धक्का; मुख्यमंत्री पार्सेकरांचा पराभव

९.४३: इतर पक्ष ४ ठिकाणी आघाडीवर

९.३७: काँग्रेस ८, भाजप ७ जागांवर आघाडीवर

९.३३: काँग्रेस ८, भाजप ६ जागांवर आघाडीवर

९.२९: काँग्रेस ८, भाजप ५ जागांवर आघाडीवर

९.२५: भाजप पिछाडीवर; काँग्रेसला अनपेक्षित आघाडी

९.२०: मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर मांद्रे मतदारसंघातून १ हजारांहून अधिक मतांनी पिछाडीवर

९.१९: मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर पिछाडीवर

९.१६: काँग्रेस ६, भाजप २ जागांवर आघाडीवर

९.१३: सध्या विधानसभेत भाजपच्या २१ जागा

९.०८: भाजपला अद्याप एकाही जागी आघाडी नाही

९.०४: काँग्रेस तीन जागांवर आघाडीवर

८.५९: बहुमतासाठी २१ जागांची आवश्यकता

८.५५: गोवा सुरक्षा मंच अद्याप एकाही जागी आघाडीवर नाही

८.५१: भाजप, आम आदमी पक्ष अद्याप एकाही जागी आघाडीवर नाही

८.४७: गोव्यात काँग्रेस दोन जागांवर आघाडीवर

८.४३: आम आदमी पक्षाचा करिश्मा चालणार का, याबद्दल उत्सुकता

८.३८: गोव्यात काँग्रेस सत्तेत परतणार का, याची उत्कंठा

८.३४: भाजप गोवा राखणार का, याबद्दल उत्सुकता

८.२७: आम आदमी पक्षाचे एलव्हिस गोम्स यांची प्रतिष्ठा पणाला

८.२२: काँग्रेसचे दिगंबर कामत, प्रतापसिंग राणे यांची प्रतिष्ठा पणाला

८.१६: भाजपचे दिग्गज नेते मनोहर पर्रिकर, लक्ष्मीकांत पार्सेकर, फ्रान्सिस डिसुझा यांची प्रतिष्ठा पणाला

८.११: मतमोजणीला सुरुवात

७.५४: भाजपला बहुमताचा आकडा गाठता येणार का, याबद्दल उत्सुकता

७.५१: भाजप सर्वात मोठा पक्ष ठरेल, बहुतांश एक्झिट पोलचा अंदाज

७.४८: मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांची प्रतिष्ठा पणाला

७.४५: ४ फेब्रुवारीला गोव्यात ४० जागांसाठी मतदान

७.४१: ११ लाखांपेक्षा अधिक मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क

७.३७: यंदाच्या निवडणुकीत विक्रमी मतदान

७.३०: गोव्यात दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

७.२७: गोवा विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला थोड्याच वेळात सुरुवात