पाच राज्यांसाठी मतदान पार पडल्यानंतर आता विविध वृत्तवाहिन्यांचे एक्झिट पोल येण्यास सुरुवात झाली आहे. गोव्यात पुन्हा एकदा कमळ फुलण्याची दाट शक्यता आहे. मात्र ४० आमदार असलेल्या गोवा विधानसभेत बहुमताचा आकडा गाठणे भाजपला कठीण होत असल्याचे बहुतांश एक्झिट पोलमधील आकड्यांवरुन समोर आले आहे. मात्र भाजपच गोव्यातील सर्वात मोठा पक्ष असेल, हे सर्वच एक्झिट पोलमधून समोर आले आहे.

इंडिया टुडे-अॅक्सिस पोलने भाजपला सर्वाधिक जागा मिळतील, अशी शक्यता वर्तवली आहे. भाजपला ४० पैकी १८ ते २२ जागा मिळतील, असा अंदाज इंडिया टुडे-अॅक्सिसने वर्तवला आहे. तर काँग्रेसला ९ ते १३ जागांवर समाधान मानावे लागेल, असे इंडिया टुडे-माय अॅक्सिसने म्हटले आहे. यासोबत आम आदमी पक्षाला ० ते २ जागांवर तर इतरांना ५ ते ९ जागांवर यश मिळेल, असा अंदाज इंडिया टुडे-अॅक्सिस पोलने वर्तवला आहे.

इंडिया टिव्हीच्या एक्झिट पोलनुसार भाजपला गोव्यात सत्तास्थापनेची सर्वाधिक संधी आहे. इंडिया टिव्हीच्या एक्झिट पोलच्या अंदाजानुसार गोव्यात भाजपला १५ जागा मिळतील. तर काँग्रेसला १०, आम आदमी पक्षाला ७ तर इतरांना ८ जागा मिळतील. भाजपला इतरांच्या साथीने सरकार स्थापन करता येईल, असा अंदाज इंडिया टिव्हीने वर्तवला आहे.

एबीपी वृत्तवाहिनीने भाजपला गोव्यात १८ ते २२ जागा मिळतील, असा अंदाज व्यक्त केला आहे. तर काँग्रेसला ९ ते १३ तर आम आदमी पक्षाला केवळ ० ते २ जागांवर यश मिळेल, असा अंदाज एबीपीकडून वर्तवण्यात आला आहे.

टाईम्स नाऊ आणि सी व्होटर्सने भाजपला गोव्यात १५ ते २१ जागांवर यश मिळवण्याचा अंदाज वर्तवला आहे. तर काँग्रेस १२ ते १८ जागा जिंकून दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष असेल, असे टाईम्स नाऊ आणि सी व्होटर्सच्या एक्झिट पोलने म्हटले आहे. तर आम आदमी पक्षाला ० ते ४ जागांवर यश मिळेल, असे या एक्झिट पोलने म्हटले आहे.

सी व्होटरने गोव्याच्या कोणत्या भागात कोणत्या पक्षाला किती टक्के मतदान झाले आहे आणि कोणत्या भागात कोणत्या पक्षाला किती जागा मिळू शकतात, याचीदेखील आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. यानुसार उत्तर गोव्यामध्ये भाजपला ३६.७% मते मिळतील. उत्तर गोव्यात विधानसभेच्या एकूण २० जागा आहेत. यातील ७ ते ११ जागी भाजप विजयी होईल, असा अंदाज सी व्होटरने व्यक्त केला आहे. उत्तर गोव्यात काँग्रेसला ३१.१% मतांसह ५ ते ९ जागा मिळतील, असा अंदाज सी व्होटरने व्यक्त केला आहे.

दक्षिण गोव्यातही भाजप वरचढ ठरेल, असा अंदाज सी व्होटरने वर्तवला आहे. दक्षिण गोव्यात भाजप ३४.९% टक्के मते मिळवून ७ ते ११ जागांवर विजयी होईल. तर दक्षिण गोव्यात ३२.६% मतांसह काँग्रेसच्या ६ ते १० जागा मिळतील, असा अंदाज सी व्होटरने वर्तवला आहे.