मनोहर पर्रिकर यांचे मत

गोव्यात मुख्यमंत्री म्हणून पुन्हा मनोहर पर्रिकर परतण्याची चर्चा सुरू आहे. मात्र मुख्यमंत्री हा वयाने थोडा मोठा असला तरी मनाने तरुण असावा, असे मत संरक्षणमंत्री पर्रिकर यांनी व्यक्त केले.

येथील भाजप उमेदवार सिद्धार्थ कुंकळीकर यांच्या प्रचारार्थ पर्रिकर युवा मेळाव्यात बोलत होते. गोव्यात दिल्लीहून मुख्यमंत्री पाठवला जाऊ शकतो असे वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केल्याने पर्रिकर पुन्हा राज्यात येण्याची चर्चा सुरू झाली. त्यात भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी पुढचे सरकार पर्रिकर यांच्या नेतृत्वात असेल असे जाहीर केले होते. गोव्याच्या विकासासाठी स्थिरता महत्त्वाची असल्याचे पर्रिकर यांनी सांगितले. १९८९ मध्ये राजकारणात आलो मात्र पुढील दहा वर्षांत १२ मुख्यमंत्री पाहिले. दर दहा वर्षांनी राजकीय अस्थैर्य येते. आमदार नवा पर्याय शोधतात असे स्पष्ट करत, राज्याच्या विकासात स्थिरता गरजेची असल्याचे अधोरेखित केले.

आरक्षणाची गरज

संघनेते मनमोहन वैद्य यांनी नुकतीच जयपूरमध्ये जातीवर आधारित आरक्षणाचा आढावा घेण्याची भूमिका घेतलेली असताना मनोहर पर्रिकर यांनी आरक्षणाची गरज असल्याचे मत व्यक्त केले. काही प्रमाणात याचा गैरवापर होत असला तरी, वंचितांच्या प्रगतीसाठी आरक्षण गरजेचे असल्याचे पर्रिकर यांनी स्पष्ट केले. गोव्यातील अनुसूचित जाती व जमातीची परिस्थिती चांगली असली, तरी देशातील स्थिती भिन्न असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे आरक्षणाच्या धोरणाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.