गोव्यामध्ये भाजप सरकार स्थापन करण्याच्या तयारीत असल्याने काँग्रेसच्या तोंडचा घास हिरावला गेला आहे. त्यामुळे काँग्रेसच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. माजी अर्थमंत्री आणि काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी भाजपवर निवडणूक चोरण्याचा आरोप केला आहे. चिदंबरम यांनी ट्विट करत भाजपवर जोरदार टीका केली आहे.

‘निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या पक्षाला सरकार स्थापन करण्याचा अधिकार नसतो. गोवा आणि मणिपूरमध्ये भाजपने निवडणुकांची चोरी केली आहे,’ असे ट्विट करत चिदंबरम यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. गोवा आणि मणिपूरमध्ये भाजप दुसऱ्या क्रमांकावर आहे. या दोन्ही राज्यांमध्ये काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. गोव्यामध्ये बहुमताचा आकडा २१ इतका आहे. गोव्यात काँग्रेसला १७, तर भाजपला १३ जागा मिळाल्या आहेत. काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळाल्या असताना भाजपने गोव्यात सत्ता स्थापनेची तयारी केली आहे. महाराष्ट्रवादी गोमांतक पक्ष आणि गोवा फॉरवर्ड पक्षाच्या साथीने भाजप सत्ता स्थापनेच्या तयारीत आहे. महाराष्ट्रवादी गोमांतक पक्ष आणि गोवा फॉरवर्ड पक्षांसोबतच भाजपने अपक्ष आमदारांचीही साथ घेतली आहे. या सगळ्यांच्या मदतीने मनोहर पर्रिकर गोव्याचे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. यासाठी पर्रिकर यांनी केंद्रीय मंत्रिमंडळातून संरक्षण मंत्रीपदाचा राजीनामा देणार आहेत.

गोवा काँग्रेसचे प्रभारी दिग्विजय सिंह यांनी सरकार स्थापन करु न शकल्याने गोव्यातील लोकांची माफी मागितली आहे. ‘धनशक्तीसमोर जनशक्ती कमी पडली. सरकार स्थापन करण्यासाठी आवश्यक संख्याबळ प्राप्त न करु शकल्याने आम्ही गोव्याच्या जनतेची माफी मागतो,’ असे ट्विट दिग्विजय सिंह यांनी केले आहे. गोव्याच्या राज्यपाल मृदला सिंहा यांनी भाजपला सरकार स्थापनेचे निमंत्रण दिले आहे. राज्यपालांनी मनोहर पर्रिकर यांची नवे मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती केली आहे. त्यामुळे पर्रिकर १४ मार्चला गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. पर्रिकर यांना पुढील १५ दिवसांमध्ये बहुमत सिद्ध करावे लागणार आहे.

गोव्यात भाजपला १३ जागा मिळाल्या आहेत. तर महाराष्ट्रवादी गोमांतक पक्ष आणि गोवा फॉरवर्ड पक्षाला प्रत्येकी ३ जागा मिळाल्या आहेत. तर ३ जागांवर अपक्ष उमेदवारांनी बाजी मारली आहे. यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचा एर उमेदवार निवडून आला आहे. भाजपने छोट्या पक्षांसह अपक्षांची मदत घेत सरकार स्थापनेचा दावा केला आहे. भाजपला महाराष्ट्रवादी गोमांतक पक्ष आणि गोवा फॉरवर्ड पक्षाच्या आमदारांचा, दोन अपक्ष आमदारांचा आणि राष्ट्रवादीच्या एका आमदाराचा पाठिंबा मिळाला आहे. या आमदारांसह पर्रिकर यांनी १२ मार्चला राज्यपालांची भेट घेतली आहे. सध्या भाजपकडे २२ आमदारांचा पाठिंबा आहे.