साडेतीन मुहूर्तापकी एक असलेल्या हिंदू नववर्ष अर्थात गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आर्थिक उलाढालीसाठी बाजारपेठा सज्ज झाल्या आहेत. शहरातील दुकाने साखर गाठींनी सजली असून नोटाबंदीदरम्यान ठप्प पडलेल्या बाजारपेठा पुन्हा तेजीत येईल, असे चित्र आहे.

गुढीपाडव्याचा शुभ मुहूर्त बघून अनेक जण सोने, चांदी, वाहन, गृहउपयोगी वस्तू, इलेक्ट्रॉनिक वस्तू, घर, फ्लॅटची खरेदी करतात. शुभ मुहूर्तावर मोठय़ा प्रमाणावर वस्तूंची खरेदी केली जाते. या पाश्र्वभूमीवर संबंधित दुकानदारांनी गेल्या १५ दिवसांपासून तयारी सुरू केली असून ग्राहकांसाठी अनेक आकर्षक योजनांची खैरात आणली आहे. स्मार्टफोनवर सध्या चांगल्या योजना आणल्या आहेत. तसेच टॅब्स, लॅपटॉप, एलईडी, टीव्ही, फ्रीज, वातानुकूलित यंत्रणा यावर शून्य टक्के व्याजदराने उपलब्ध आहेत. शहरातील प्रमुख असलेल्या धरमपेठ,बर्डी, महाल, सदर बाजारपेठेत अशात नव्या योजनांचा पाऊस पडतो आहे. कपडय़ांपासून तर इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी शहरातील मॉल्समध्ये गुढीपाडव्याच्या आधीपासूनच मोठय़ा प्रमाणात गर्दी झाली होती, तर अनेकांनी गुढीपाडव्याच्या दिवशी वाहन घरी घेऊन जाण्यासाठी १५ दिवसांपूर्वीच वाहनांच्या शोरूममध्ये गर्दी केली होती. आज गुढीपाडवा असल्याने नवीन वस्तू खरेदीसाठी बाजारात जाम उधाण येणार आहे. गुढीसाठी शहरातील बर्डी, महाल, नंदनवन, सक्करदरा मार्केट या ठिकाणी गर्दा दिसून येत आहे. तसेच साखरेच्या माळांची विक्रीही मोठय़ा प्रमाणात होत आहे. एका माळेची किंमत २५ ते ५० रुपये आहे. गुढीसाठी ब्लाऊज पिस, साडी अशी वस्त्रे वापरली जात असली तरी खास गुढीसाठी भरजरी आणि जरीकाठेच्या साडय़ा बाजारात आल्या आहेत. तसेच गुढीपाडव्याला फुलांना मोठय़ा प्रमाणात मागणी असते. बर्डीच्या फुले मार्केटमध्ये अनेकविध प्रकारची फुले आतापासूनच यायला सुरुवात झाली आहे. झेंडू, गुलाब, शेवंती, मोगरा या फुलांना चांगली मागणी आहे. पाडव्याचा मुहूर्त साधून अनेक चारचाकी आणि दुचाकी वाहन कंपन्यांनी आज होणाऱ्या गाडय़ा वितरणासाठी शोरूमबाहेर विशेष तयारी केली आहे.

सोन्याला झळाळी

साडेतीन मुहूर्तापकी एक असलेल्या गुढीपाडव्याचा मुहूर्त साधत सोने खरेदीला पसंती दिली जाते. अशात नागपूरच्या सराफा बाजारासह अनेक सोने, चांदी विक्रीचे दुकान सज्ज झाले आहेत. नव्या प्रकारचे दागिने आणि आकर्षक योजना दिल्या असल्याने सर्वसामान्य माणसालाही या शुभ मुहूर्तावर सोने खरेदी करणे सहज शक्य झाले आहे. सणानिमित्त अनेकांनी दागिने घेणे पसंत केले आहे. काहींनी पसंतीनुसार दागिणे बनविण्यासाठी ऑर्डर दिली आहे.

बाजारात इकोफ्रेंडली गुढी 

पूर्वी गुढी उभारण्यासाठी बांबू वापरला जात होता. आजही ग्रामीण भागत तो वापरला जात असला तरी शहरातील फ्लॅट संस्कृतीमुळे सध्या इको फ्रेंडली गुढीची मागणी वाढली असून बाजारात मोठय़ा प्रमाणात आकर्षक गुढय़ा आल्या आहेत. उंच मोठय़ा गुढीची जागा आता एक फुटाच्या गुढीने घेतली आहे. पूर्वी गुढीसाठी साडी, कापड, तांब्याचा कलश, गाठी अशा वस्तू वापरल्या जात होत्या. मात्र आता हे सर्व साहित्य इकोफ्रेंडली गुढीसह मिळत आहे. तसेच बांबूच्या गुढीला सुमारे ३०० ते ५०० रुपये खर्च येत होता. त्याजागी आता इको फ्रेंडली गुढी मात्र ७० ते १०० रुपयापर्यंत मिळत आहेत. अशात दुकानदारांचीही आर्थिक उलाढाल वाढली आहे.