आमच्या ओळखीचे एक आजोबा म्हणे नव्याण्णव वर्ष जगले. अगदी थोडक्यात सेंच्युरी हुकली. (इथे ‘जीवन’ हा शब्द मी मुद्दाम टाळला आहे. का, ते पुढे कळेलच.) कारण ते रोज चार वाजता उठून योगासनं करायचे. (एवढय़ा लवकर उठून करायचं काय? एवढय़ा लवकर उठलेल्या माणसाचा चेहरा आजपर्यंत मी नेहमी त्रासलेलाच बघितला आहे. कुणालाही या जगात एवढय़ा लवकर उठून आनंद होत असेल असं मला वाटत नाही. कुठे गावाला वगैरे जायचं आहे, काही काम आहे, तर ठीक आहे. बाकी जग झोपलेलं असताना आपणच काय मूर्खासारखं उठून बसायचं?) आणि शेवटपर्यंत त्यांना एकही गोळी नव्हती.. म्हणजे औषधाची! फक्त कानाला ऐकायला फारच कमी यायचं. (बहुतेक कानाची कुठली योगासनं करत नसावेत.)

मी शाळेत असताना माझे एक काका नेहमी त्यांचं उदाहरण द्यायचे. उजव्या हातात सिगरेट धरलेली आणि चिलमीसारखा जोरात त्या सिगरेटचा झुरका ओढून मला ते म्हणायचे, ‘‘बघ गाढवा, पहाटे चार वाजता उठणं कधी जमेल का तुला? नुसतं उठायचं नाही, तर व्यायाम करायचा, योगासनं करायची. अजूनही या वयात दहा-दहा किलोमीटर चालतात आजोबा. (कामाशिवाय विनाउद्देश व्यायाम म्हणून असं चालणं म्हणजे उगाच विनाकारण वेळेचा अपव्यय केल्यासारखं आहे असं माझं स्पष्ट मत तेव्हाही होतं, आजही आहे आणि कायम असंच राहील.) बघितलंस- केवढे काटक आणि शिडशिडीत देहयष्टी आहे त्यांची या वयातही. (हे विशेषण नेहमी लागायचंच. अगदी बुळबुळीत भेंडीची भाजी जरी चावून खात असले तरी ‘बघितलंस- या वयातही..’ हे शेपूट नेहमी लागायचंच.) जांभळाच्या झाडावर चढून जांभळं काढून दिली त्यांनी. (त्यात काय कौतुक? त्यातली निम्मी जांभळं स्वत:च्या घरी नेली. एवढी टपोरी जांभळं फुकट मिळणार असतील तर मीही कुठल्याही झाडावर चढू शकतो.) आणि तू स्वत:कडे एकदा बघ आरशात. शालेय शिक्षण अजून पूर्ण नाही- आणि बेसनाच्या लाडवासारखा आकार झालाय,’’ असं म्हणणाऱ्या माझ्या त्या काकांनी आयुष्यात कधीही एखादं आसन तर सोडाच, पण दीर्घ श्वास घेतल्याचंही आठवत नाही. डायरेक्ट शवासनच केलं. तेही कायमचं. पण मला याबद्दल कधीही पश्चात्ताप किंवा कमीपणा वाटला नाही. उलट, त्या आजोबांचं कौतुक केल्याबद्दल काकांचा राग आणि त्या म्हाताऱ्याविषयी तिरस्कारच मला वाटायचा. मला तेव्हा नेहमी वाटायचं, की या आजोबांना काही काम ना धाम. दिवसभर उगाच कुणाकुणाच्या घरी जाऊन योगसाधना वगैरेविषयी बोलायचं आणि घराघरांत उगाच योगा न करण्यावरनं भांडणं लावून द्यायची. लोकांच्या घरातल्या शांततेचा भंग करायचा. आमच्या तरी घरात व्हायचा बुवा. मी जरा त्यांची माहिती काढली. तर सहा वाजता जेवण करून साडेसात-आठ वाजता झोपत असे तो म्हातारा. (माझा दिवस आठ वाजता सुरू होत असे.. म्हणजे रात्रीचे आठ.) मला वाटायचं, त्यांना कुठे शाळेत जावं लागतं? रात्र रात्र जागून अभ्यास करावा लागतो? तरीही अभ्यास करत नाही म्हणून शाळेत शिक्षकांचा आणि घरी पालकांचा मार खावा लागतो? एवढे अगदी बलवान असतील ते आजोबा- तर नुसतं माझं दप्तर उचलून दाखवा म्हणावं. यातलं काहीच त्या आजोबांना करावं लागत नाही. हे फक्त शाळा आणि घर एवढंच झालं. अजून कितीतरी अशा अ‍ॅक्टिव्हिटीज् आहेत- की माझी खात्री आहे- त्यांनी कधीही त्या केल्या नसतील. सुट्टीदिवशी किंवा खास शाळेला बुट्टी मारून पतंग उडवणं, कॅनॉलमध्ये मासे पकडायला जाणं, पत्ते वा कॅरम खेळणं, मित्रांबरोबर ट्रिपलसीट सायकलवरून मुलींच्या शाळेवरून फेरफटका मारणं, संध्याकाळी वडापावच्या गाडीवर आणि रात्री-अपरात्री भुर्जीच्या गाडीवर ताव मारणं.. अजूनही बऱ्याच अ‍ॅक्टिव्हिटीज् आहेत; ज्या उघडपणे सांगण्यासारख्या नाहीत. यातल्या कुठल्याच गोष्टीचा आनंद या योगीबाबाने अनुभवला नसणार. आणि त्यांचं कसलं एवढं कौतुक? खरं म्हणजे किती निरस आयुष्य होतं त्यांचं! आता हेच बघा ना- सात्त्विक आहार घ्यायचे म्हणजे सॅलड (मी एक वेळ विटेचा एखादा तुकडा कच्चा खायला तयार आहे, पण ते बीट, काकडी आणि टॉमेटो कच्चं खायचं म्हणजे अक्षरश: काळ्या पाण्याची शिक्षा भोगत असल्याचा अनुभव घेण्यासारखं आहे.), उकडलेल्या पालेभाज्या, फळं खायचे. कुठल्याही पदार्थातलं सत्त्व मरू न देता पोटात गेलं पाहिजे म्हणे. माझी खात्री आहे- पोटही केवळ नाइलाज म्हणून अत्यंत कडवट चेहऱ्याने ते सगळं पोटात घेत असणार. हे सगळं कमी म्हणून की काय- सकाळी आदल्या दिवशी पाण्यात भिजत घातलेले मेथीचे दाणे आणि कधी कडुनिंबाचा, तर कधी काल्र्याचा रस प्यायचे, ताक प्यायचे, कुठले कुठले काढे प्यायचे. ते नुसतेच जगले. जीवन नाही जगले. नाहीतर पिण्यासाठी अजूनही दुसरे किती असंख्य ब्रँडचे द्रव पदार्थ आहेत- की जे किती थोर आनंद देतात, याचा अनुभव त्यांना आला असता. मित्रांबरोबर बसून दारूपार्टी करण्यात काय मजा आहे, किंवा धाब्यावर जाऊन चिकन तंदुरी, गावरान कोंबडी मसाला खाण्यात काय बहार आहे, हे त्यांना कसं कळणार? कधी आजारी पडणं नाही. साधं पाठ, पोट, गुडघे, डोकं- काही म्हणजे काहीही दुखणं नाही. आजारी आहे या कारणाकरिता शाळेला बुट्टी मारून, एखाद्या मैत्रिणीला घरी बोलावून तिच्याकडून सांत्वन करून घेण्यात काय आनंद असतो, त्यांना कसं कळणार!

एकदा पहाटे माझे वडील मला त्यांना भेटायला घेऊन गेले. त्यांना मी भेटलो तेच मुळात ते शीर्षांसनाच्या अवस्थेत असताना. हा प्रकार मी आयुष्यात पहिल्यांदा पाहत होतो. त्याच अवस्थेत त्यांनी आमच्याशी बोलायला सुरुवात केली. आसनं करत करतच ते आमच्याशी बोलत होते. मला एकपात्री सर्कस बघितल्याचा आनंद होत होता. पुढे पुढे त्यांनी एवढे विचित्र प्रकार करायला सुरुवात केली; आणि अचानक म्हणाले, ‘चल, तूपण कर माझ्याबरोबर.’  आता त्या सर्कशीतल्या विदूषकाचा पार्ट माझ्या वाटय़ाला आला होता. मी आढेवेढे घेत कशीबशी सुरुवात केली. सर्वात प्रथम पद्मासन. म्हणजे एक पाय दुसऱ्या पायावर मुडपून ताठ बसायचं. बिनबुडाचा तांब्या जसा कलंडेल तसा मी कलंडायला लागलो. ठीक आहे. मग वज्रासन- म्हणजे दोन्हीही गुडघे मुडपून बसायचं. विहिरीच्या कडेला गुडघ्यावर बसून जर कोणी आत डोकावला तर जो शरीराचा आकार होईल तो माझ्या शरीराने घेतला. आसनांच्या बाबतीत तर मी कहरच केला. नौकासन! बाप रे! पोटावर झोपून गुडघे मुडपायचे आणि हात मागे नेऊन पायाचे अंगठे ओढायचे. माझ्या नौकेचा सी-सॉ होत होता. शेवटी वादळात फळ्या मोडलेल्या एखाद्या नौकेसारखं माझं नौकासन दिसत होतं. खरं तर आम्ही दोघंही एकच आसन करत होतो. पण दोन आसनं एवढी भिन्न दिसत होती, की त्या भल्या पहाटे या गमतीशीर दृश्याचा जर मी फोटो काढला असता तर विनोदी फोटोंच्या एखाद्या स्पर्धेत मी पहिलं बक्षीस अगदी सहज पटकावलं असतं. शवासनाने शेवट होऊन मी खुर्चीवर आसनस्थ झालो. आसनाचं नाव काहीही असो; माझं मात्र भयंकर विनोदासन, प्रयत्न असफलासन, निर्बुद्धासन, विचित्रासन असंच क्रमश: चाललं होतं. शवासन, मकरासन, मार्जारासन, नौकासन, भुजंगासन, ताडासन वगैरे नावं ऐकली की नरकात उकळत्या तेलात टाकण्याची वगैरे शिक्षा देणारे जे राक्षस असतील त्यांची नावं अशी असावीत असं वाटतं. ‘रोज येत जाईल आता हा..’ असं माझ्या वतीने माझ्या वडिलांनी त्यांना आश्वासन दिलं. पण दुसऱ्या दिवशी तेवढय़ाशा आसनांनीसुद्धा माझं शरीर एवढं ठणकायला लागलं, की शाळेलासुद्धा बुट्टी मारायला लागली. त्यामुळे ‘त्यापेक्षा तू नको करूस योगासनं,’ असं माझ्या आईनेच सांगून टाकलं. त्यामुळे वडीलही गप्प. पण मी मात्र ‘अशी शाळा बुडवता येणार असेल तर’ हे मनात आणि ‘मी योगासनाला कधीही जायला तयार आहे,’ अशी मोठय़ाने जाहीरपणे कबुली देऊन टाकली.

अलीकडेच आंतरदेशीय स्तरावर ‘योगा दिन’ साजरा झाला. त्यानिमित्ताने देशव्यापी योगासनांची प्रात्यक्षिकं झाली. मलाही जरा हुरूप आला आणि ‘एक दिवस गुडघ्याला डोकं टेकवीनच’ असा मनाशी निश्चय करून योगासनाच्या क्लासला नाव नोंदवून टाकलं. उत्साहाच्या भरात पहाटे साडेपाचची बॅच घेतली. आधी फक्त सकाळी लवकर उठायची सवय व्हावी म्हणून मुद्दाम चार दिवस उशिरा क्लासचा दिवस निवडला. अगदीच आपलं जनसमुदायापुढे हसं होऊ नये यासाठी आधी थोडा अभ्यास करण्याच्या उद्देशाने पुस्तकाच्या दुकानात जाऊन शांतपणे ध्यानस्थ बसलेल्या सुंदर बाईचं चित्र असलेलं एक योगासनाचं पुस्तकही विकत आणलं. अगदी सगळं पुस्तक नाही वाचून झालं, तरी निदान चित्रात तरी शांतपणे बसलेली बाई बघायला मिळेल! योगासाठी म्हणून खास सैलसर कपडे विकत आणले. भावनेच्या भरात नवीन स्पोर्ट शूजचीही खरेदी झाली. रामदेवबाबांना लाजवेल अशी सगळी जय्यत तयारी केली होती. सगळं झालं होतं. झाला नव्हता तो फक्त योगाच.

पण प्रत्यक्षात क्लासचा दिवस उजाडायला आठ दिवस लागले. म्हटलं ठीक आहे.. ‘जहॉं से जाग जाओ वहॉं से सवेरा समझो.’ आणि मी पहाटे पाच वाजून पंचवीस मिनिटांनी क्लासमध्ये दाखल झालो. सर्व आसनं अत्यंत शांतपणे आणि स्वत:च्या कुवतीपेक्षा जास्त शरीराला ताण न देता करायची आहेत, अशा काही मनाला दिलासा देणाऱ्या वाक्यांनी आसनांना सुरुवात झाली. काही केल्या माझं शरीर योगाचं ऐकेना. एक दिवस गुडघ्याला डोकं टेकवीनच असा निश्चय केलेल्या माझं डोकं तर फारच लांबची गोष्ट; हातही गुडघ्यापर्यंत पोहोचेनात. माझे गुडघे माझ्यापासून एवढे दूर होते, की ते माझ्या शरीराचा भागदेखील वाटेनात. ठीक आहे, आज पहिला दिवस आहे. थोडे दिवस जाऊ देत, असं म्हणत मी मनाची समजूत काढली.

दुसऱ्या दिवशी मेडिटेशन होतं. आपण डोळे मिटून सर्व शरीर रिलॅक्स करून शांतपणे झोपायचं आणि योगाशिक्षक सांगतील त्या गोष्टींचं पालन करायचं, ते सांगतील त्या गोष्टींची कल्पना करायची. हे करत असताना मला कधी गाढ झोप लागली, कळलंच नाही. जाग आली तेव्हा अजून चार-पाच घोरण्याचे आवाज आजूबाजूला येत होते. मीही खूप मोठय़ाने घोरत होतो हे मला नंतर कळलं. पहाटेची वेळ होती म्हणून डोळा लागला जरासा- असं म्हणून मी परत एकदा मनाची समजूत काढली.

‘होईल, होईल’ असं म्हणत पंधरा दिवस गेले तरीही मी जे करत होतो त्याला योगा म्हणावंसं वाटत नव्हतं. एक दिवस मी हळूच डोळे किलकिले करत कोण काय करतंय बघितलं आणि ते दृश्य बघून मी एवढय़ा मोठय़ांदी हसलो! एवढे शरीरांचे विचित्र आकार पाहून मला हसू आवरणं कठीणच होतं. त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून आसनं करताना योगाशिक्षक लाइट्सच बंद करायला लागले. एवढय़ा दिवसांत माझ्यासारख्याच एका योगनिराश व्यक्तीशी माझी ओळख झाली. आम्ही रोज योगा क्लास संपल्यावर श्रमपरिहारासाठी एके ठिकाणी जाऊ लागलो. कधी उपमा, कधी पोहे असं आलटून पालटून श्रमपरिहार चालत असे. एक दिवस तो म्हणाला, ‘चला, आज खिचडी खाऊ या.’ म्हणून आम्ही दुसऱ्या ठिकाणी गेलो. दोन प्लेट खिचडी खाऊन झाल्यावर ढेकर देत तो म्हणाला, ‘साला योगा से क्या होगा? इन्सान सुखी तो खाने से होगा.’ मला त्याच्याविषयी एवढी आपुलकी वाटायला लागली!  मी लगेच माझ्यासाठी दुसरी प्लेट ऑर्डर केली. खिचडीचा तोबरा भरून फक्त होकारार्थी मान हलवण्यापलीकडे मला दुसरं उत्तरच त्यावेळी सुचलं नाही.

निखिल रत्नपारखी – nratna1212@gmail.com