‘मुक्या प्राण्यावर प्रेम करा’ या मताच्या अगदीच मी विरोधात नाही. पण ते किती करा आणि कुठे करा (कुठे? हा नियम माणसांनाही लागू होतो.), याविषयी मात्र माझी मतं अतिशय ठाम आहेत. उगाच फालतू कौतुकं आणि लाड करण्याच्या तर मी विरोधातच आहे. ‘कुत्रं’ या जमातीविषयी सध्या आपण बोलू. स्वत:च्या राहत्या घरात हे श्वानप्रेमी कुत्री पाळतात. त्यांना अगदी फॅमिली मेंबरचा दर्जा देऊन टाकतात. मग सगळय़ा फॅमिली फंक्शनमध्ये- उदाहरणार्थ लग्न, मुंज, डोहाळजेवण, एवढंच नव्हे तर कुणाच्या तेराव्यालाही त्याला घेऊन हजेरी लावतात. मग त्या कुत्र्याला कुठल्यातरी नातेवाईकामध्ये आणि स्वत:मध्ये काहीतरी साम्य आढळलं, की ते जोरजोरात भुंकायला लागतं. अत्यंत समजुतीच्या स्वरात, आवश्यकता पडल्यास लटक्या रागाने हे कुत्र्याचे मालक किंवा मालकिणी त्याच्याशी बोलायला लागतात आणि आपलं सगळं सगळं म्हणणं त्या कुत्र्याला समजलंय असा इतरांचा समज करून देतात. घरच्या माणसांवर चिडचिड करायची, दुस्वास करायचा आणि या मुक्या प्राण्यावर प्रेमाचा वर्षांव! हे असं प्रेम मिळणार असेल तर आपण पण आयुष्यभर मूक व्रत स्वीकारायला तयार आहोत! काय कारण असावं या जनावराविषयी एवढं प्रेम वाटायचं? कुत्रं प्रामाणिक असतं, हे एक क्वालिफिकेशन झालं. पण आपण आपल्या आजूबाजूच्या अशा किती लोकांवर प्रामाणिक आहेत म्हणून प्रेम करतो? उलट, अपमान आणि फसवले गेल्याची जाणीवच बऱ्याचदा अशा लोकांच्या वाटय़ाला येते. कुत्री चोरांपासून तुमच्या घराचं रक्षण करतात. चोर चोरी करून गेले तरी एखाद्या ओंडक्यासारखं निपचित पडलेली कुत्र्यांची कितीतरी उदाहरणं ऐकायला येतात. घरातल्याच लोकांना ते चावलं, असंसुद्धा उदाहरण माझ्या ऐकिवात आहे. पण तरी या प्राण्याविषयी वाटणारं प्रेम मात्र तसूभरही कमी होत नाही. नवऱ्याबरोबर डिव्होर्स घेतलेल्या एका बाईने घरी दोन कुत्री पाळलेली होती. त्यांच्यासाठी खास पलंग, जेवणासाठी खास व्यवस्था. त्यांची करमणुकीचीही व्यवस्था त्या घरात होती. उदंड करमणूक व्हावी म्हणून मांजरांची फजिती असणारी कार्टून फिल्मही टीव्हीवर लावत असे ती बाई. त्यांच्या आकाराचे कपडेपण होते. कधी कधी किंवा सणासुदीला त्यांना नवीन कपडे घालत असे ती. एकमेकांचे कपडे फाडून, चावून ती कुत्री लक्तरं करत असत. त्याबद्दल लाडिक कौतुकच त्यांच्या पदरी पडत असे. स्वत:च्या हाताने त्यांचे लाड करत त्यांना ती घास भरवत असे. ‘माझ्याशिवाय जेवत नाही जानू.’ एखाद्या नवख्याला वाटेल स्वत:च्या नवऱ्याबद्दलच बोलते आहे की काय? एकाचं ‘जानकी’ आणि दुसऱ्याचं ‘जॉन’ अशी नावं ठेवून त्यांचं बारसंही केलं होतं तिने. खाऊनपिऊन धष्टपुष्ट झालेली ती नतद्रष्ट कुत्री आजूबाजूला आग लागल्यासारखी रात्रंदिवस भुंक भुंक भुंकूनसुद्धा शेजाऱ्यापाजाऱ्यांकडून त्यांच्याविरुद्ध एक अवाक्षरही ऐकून घेत नसे ही बाई. ‘हसरी, खेळती पेट्स बघवत नाहीत शेजाऱ्यांना!’ वर हे ऐकवत असे. त्या कुत्र्यांना तिने हसताना कधी बघितलं होतं कोण जाणे. त्या बाईच्या हृदयात प्रेमाचा झरा सतत वाहतो आहे, असा काहीतरी बघणाऱ्याचा समज व्हावा इतपत ती त्या कुत्र्यांवर प्रेमाचा वर्षांव करत असे. प्रेमाच्या मूर्खपणाचा अतिरेक असा की, दरवर्षी त्यांचा वाढदिवस साजरा करत असे ही बाई. मला नेहमी प्रश्न पडायचा की, ही बाई जर एवढी प्रेमळ असेल, तर हिचं हिच्या नवऱ्याबरोबर न पटण्याचं काय कारण? यातलं अर्धा टक्का प्रेम जरी तिने नवऱ्यावर केलं असतं तर काडीमोड झाला नसता तिचा.

हे झालं घरातल्या पाळलेल्या कुत्र्याबद्दल. पण जत्रेत हरवलेल्या आणि बऱ्याच वर्षांनी अचानक सापडलेल्या स्वत:च्या मुलाबद्दल एक प्रेमाचा उमाळा यावा, तसे काही लोक रस्त्यावरच्या कुत्र्यांशी वागत असतात. त्यांना महागडी बिस्किटं काय खाऊ घालतात, पिझ्झा काय खाऊ घालतात. एवढं खाऊनसुद्धा ती कुत्री कचराकुंडय़ांमध्ये अन्न शोधायला धावतातच. उगाच नाही ‘कुत्र्याचं शेपूट कितीही काळ नळीत घालून ठेवा, वाकडं ते वाकडंच राहणार’ असं म्हणत. या रस्त्यावरच्या कुत्र्यांवर तर प्रेम, दया वगैरे तर सोडाच; मला रागच आहे. एक तर ते एवढय़ा संख्येने असतात. एकजण भुंकायला लागला की मूर्खासारखे सगळेजण भुंकायला लागतात. आपापसात गप्पा मारत असतील असं जरी गृहीत धरलं तरी भीती ही वाटतेच. कधी कधी नुसते भुंकत नाहीत, तर गाडीवर बसून जायला लागलो की तुमच्या मागे लागतात. त्यांच्या भाषेत अगदी ‘चल, बाय. पुन्हा भेटू. गाडीवरून सांभाळून जा. हल्ली ट्रॅफिक खूप असतो रस्त्याने. काळजी घे. घरापर्यंत सोडायलाच नको ना यायला? चला, ठीक आहे,’ असं जरी ते म्हणत असले तरी कुत्रं मागं लागलं की अनपेक्षित घाबरगुंडी उडतेच. एक मित्र रात्री-अपरात्री त्याच्या गाडीवरून मला घरी सोडायला येत असे. घर जवळ आलं की नेहमी एक कुत्रं मागे लागायचं. त्यामुळे घरापर्यंत पोहोचूनसुद्धा तिथे थांबता येत नसे. मीपण थोडं अंतर चालत जायला घाबरत असे. त्यामुळे परत लांब फेरी मारून त्याच क्रियेची पुनरावृत्ती व्हायची. शेवटी ते कुत्रं कंटाळून आमचा नाद सोडून द्यायचं. असं बरेच दिवस चाललं होतं. शेवटी एक दिवस ते कुत्रं कुणा कुत्रीच्या मागे आमचा एरिया सोडून निघून गेलं आणि माझ्या घराचा मार्ग मोकळा झाला.

plot developer killed by chopping his private parts in nagpur over illicit affairs
खळबळजनक! विवाहित प्रियकराचा गुप्तांग ठेचून खून? अनैतिक संबंधाची किनार…
chaturang article, mazhi maitrin chaturang
माझी मैत्रीण : जिवाभावाची…
Ulta-Chashma
उलटा चष्मा: लोक‘शाही’ लग्न 
youth dies
मस्करी जीवावर बेतली; कम्प्रेसरच्या सहाय्याने मित्राच्या गुदद्वारात हवा भरली, तरूणाचा दुर्दैवी मृत्यू

कुत्रं मागे लागूनही काही गंभीर अपघात झाल्याचं मी ऐकलं आहे. तर काही विनोदी अपघात मी स्वत: डोळ्यांनी बघितलेसुद्धा आहेत. एकदा शिवाजी पार्कमधल्या एका गल्लीतून दोन तरुण बाइकवरून चालले होते. डझनभर मुलींची छेड काढण्याची मर्दुमकी गाजवूनच घरी जायचं, असा त्यांचा आवेश होता. रंगीबेरंगी अवतार केलेले ते रोमियो बाजूच्या फुटपाथवरून चाललेल्या दोन मुलींकडे बघून आपापसात काहीतरी कुजबुजत होते. त्यांची काहीतरी छेड काढण्याची तयारी करत असावेत. आणि अचानक एका बिल्डिंगच्या गेटमधून अल्सेशियन जातीचं एक अक्राळविक्राळ कुत्रं मोठमोठय़ानं भुंकत त्यांच्या बाइकच्या समोर आलं. त्यांनी करकचून ब्रेक दाबला. पण त्या बाइकची आणि कुत्र्याची धडक झालीच. ते कुत्रं आणि ते दोन रोडरोमियो तिघंही रस्त्यावर आडवे झाले. ते दोघे चांगलेच रस्त्यावर आपटले होते. त्यांचे चेहरे भीतीने अक्षरश: पांढरे पडले होते. काहीच क्षणांपूर्वी त्यांच्या चेहऱ्यावर असणारा खटय़ाळपणा, मस्ती, बेदरकारपणा कुठल्या कुठे पळाला होता. आपण एका भयानक कुत्र्याला धडकलो, ही बाब त्यांच्यासाठी जीवनमरणाची झाली होती. बाकीच्या कुठल्याही गोष्टींची पर्वा न करता शक्य तितक्या वेगाने उठून लंगडत, पाश्र्वभाग चोळत ते दुसऱ्या एका बिल्डिंगमध्ये पळाले. त्यांनी असं का केलं असावं, याची पहिल्यांदा काही टोटलच लागेना. बाकी जग पेटो, त्या कुत्र्याने आपल्याला काही इजा करू नये, या भीतीने चपला, गॉगल, बाइक सगळं आहे तिथेच टाकून ते पळाले होते. वास्तविक ते कुत्रंही घाबरून पळून गेलं होतं. पण कुत्र्याला धडकणे हा धक्का एवढा भयानक होता, की त्या संकटमय काळात त्यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानाने हसून हसून रस्त्यावरच्या बाकी लोकांना पळता भुई थोडी झाली. पाच मिनिटांनंतर हळूच इकडेतिकडे बघत घाबरेघुबरे होऊन ते बाहेर आले आणि बाइक उचलून खाली मान घालून निघून गेले. हा संपूर्ण प्रसंग त्या फुटपाथवरच्या त्या दोन मुलींनीही बघितला आणि हसत हसत त्याही निघून गेल्या. त्यानंतर कित्येक दिवस हा प्रसंग आठवून मला खूप हसू येत असे.

कुत्र्यांचा हा अचानक हल्ला कधी कधी मनुष्यप्राणी स्वत:हून ओढवून घेतो असंही बघण्यात आहे. माझ्या आजीच्या वाडय़ात एक अण्णा नावाचा उपद्रवी माणूस राहत होता. उगाच कुणाच्या तरी खोडय़ा काढ, दिवसाढवळय़ा दारू पी हे असलेच उद्योग तो करायचा. त्यावेळी त्या वाडय़ात एक कुत्रं वास्तव्याला येत असे. या अण्णाला बघून ते नेहमी गुरगुरत असे. एक दिवस हा अण्णा  वाडय़ाच्या दारापाशी उभा होता आणि बाजूला हे कुत्रं झोपलं होतं. अचानक हा अण्णा एवढय़ा मोठय़ांदी शिंकला, की ते कुत्रं घाबरून त्याच्या अंगावरच धावलं. एक दिवस त्या कुत्र्याला धडा शिकवायचा म्हणून ते झोपलेलं असताना एक फटाक्याची माळ दारूच्या नशेत त्याने कुत्र्याच्या शेपटीला बांधली आणि त्याच माळेच्या दुसऱ्या टोकावर पाय देऊन उभा राहिला. फटाके उडायला लागल्यावर कुत्रं दचकून जागं झालं आणि पळायला लागलं. त्या फटाक्याच्या माळेच्या दुसऱ्या टोकावर अण्णा पाय ठेवून उभा असल्यामुळे कुत्रं पळाल्यावर त्याच्या शेपटीला बांधलेली दोरी हिसका लागून सुटली आणि ती दोरी अण्णाच्याच पायात अडकून फटाके त्याच्या लेंग्यात आणि अवतीभवती फुटले. शिवाय ते कुत्रं अण्णाला चावलं ते बोनस. या त्याच्या लांच्छनास्पद कृत्यामुळे लोकांना त्याच्याऐवजी त्या कुत्र्याविषयीच सहानुभूती वाटली. अशा तऱ्हेने त्या अण्णाचा ‘धोबी का कुत्ता, ना घर का, ना घाट का’  झाला.

काही पाळीव कुत्र्यांची नावं फार मजेशीर असतात. धनाजी, दशरथ, औरंगजेब, रोहिदास. एका कुत्रीचं नाव ‘द्रौपदी’ असलेलंही मी ऐकलं आहे. नावाप्रमाणे तिच्याही संग्रही चार-पाच नवरे होते म्हणे. एका मालकाने आपल्या कुत्र्याचं नाव ‘हिटलर’ ठेवलं होतं. काही कुत्री एवढी बलवान असतात की त्यांचा मालक त्यांना फिरवायला आला आहे की ती कुत्री त्या मालकाला फिरवतायत, असा प्रश्न पडावा. हे असे फिरायला बाहेर पडलेले अनेक मालक कुत्र्याच्या साखळीत पाय अडकून भुईसपाट झालेले मी अनेकदा शिवाजी पार्कवर पाहिले आहेत. काही कुत्र्यांचं तोंड कुठे आणि शेपटी कुठे, हेच पटकन् कळत नाही. पॉमेरियन कुत्रं तर कुत्रं या जातीवर लाज आहेत. घरच्याच लोकांवर विनाकारण केकटायचं. स्त्रियांची विशेषकरून ही फार लाडकी असतात. त्यांच्याकडून घनघोर कौतुकही करून घ्यायचं आणि शेपूट घालून गालिच्यावर एसीच्या खाली लोळत पडायचं. खेळायला माश्या, मुंग्या इतरत्र असतातच. आरामदायी कष्ट याशिवाय त्यांच्या आयुष्यात दुसरं काहीही घडतच नाही. त्यामुळे कुत्र्यांच्या करियरमध्ये ती मागे पडत असावीत. रस्त्याने एखादं दांडगट कुत्रं भुंकायला लागलं की लगेच मालकाच्या मागे लपतात. पोलिसांची कुत्री कशी स्वत:चं शानदार करियर घडवतात. गुन्हा शोधून काढण्याच्या तपासात कामी येतात. चोर, अतिरेकी पटकन् ओळखतात. काही कुत्र्यांना म्हणे पुरस्कार वगैरे जाहीर होतात. असं काहीतरी विधायक कार्य त्यांच्या हातून घडणार असेल तर तसल्या मुक्या प्राण्यांवर प्रेम करायला आपण तयार आहोत. पण रात्रीच्या वेळी भुंकणे, अचानक गाडीच्या मागे धावून चालकाच्या छातीचा ठोका चुकवणे आणि उगाच आपल्या जातीचा प्रसार करून संख्या वाढवणे या असल्या कार्यात हातभार लावणार असाल तर असंच म्हणावं लागेल.. साला कुत्ता कही का!

nratna1212@gmail.com