ज्ञानेश्वर आणि पूजा बोडके हे दाम्पत्य २८ गुंठय़ाच्या अल्पशा जमिनीतून हरितगृहातील आधुनिक शेतीद्वारे महिन्याकाठी हजारो रुपये कमवतंय. एवढंच नव्हे तर विकासाचा हा मंत्र त्यांनी अनेक शेतकऱ्यांना दिलाय. आत्महत्याग्रस्तांची मुले दत्तक घेतली आणि अनेकींना रोजगाराचा मार्ग उपलब्ध करून दिलाय..त्यांच्याविषयी..

आजकाल शेतकरी हा शब्द ऐकला, वाचला की आपोआप निराशा..कर्ज..आत्महत्या आदी प्रतिक्रिया मनात उमटतात. या पाश्र्वभूमीवर मला जेव्हा कळलं की पुण्यातील हिंजवडीलगतच्या माण या गावामधील ज्ञानेश्वर  व पूजा बोडके हे दाम्पत्य २८ गुंठय़ाच्या अल्पशा जमिनीतून हरितगृहातील (पॉलीहाऊस) शेतीद्वारे महिन्याकाठी हजारो रुपये कमवतंय. एवढंच नव्हे तर विकासाचा हा मंत्र त्यांनी महाराष्ट्रासह बाहेरच्या अनेक राज्यातील शेतकऱ्यांना दिलाय; ज्यायोगे त्यांच्याही जीवनात स्थैर्य आलंय. तेव्हा हा चमत्कार समजून घेण्यासाठी माझी पावलं ‘माण’ गावाकडे वळणं अपरिहार्यच होतं.

medical treatment, pregnant minor, hospital , police complaint issue
अल्पवयीन गर्भवतीच्या उपचाराकरता इस्पितळाने पोलीस तक्रारीचा आग्रह धरणे अयोग्य…
Dhananjay Chandrachud
‘एआय’मुळे नैतिक, कायदेशीर, व्यावहारिक प्रश्न! आधुनिक प्रक्रियांबरोबर होणाऱ्या एकत्रीकरणाकडे सरन्यायाधीशांचा इशारा
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !
wife
पत्नीने तक्रार दाखल करणे क्रुरता नाही…

ज्ञानेश्वर आकुर्डी रेल्वेस्टेशनवर त्याची गाडी घेऊन मला न्यायला आला होता. १५/२० मिनिटातच पर्सिस्टंट, विप्रो, टी. सी. एस, इन्फोसिस अशा कंपन्यांची टोलेजंग चकचकीत कार्यालयं दिसू लागली. त्यांना खेटूनच ज्ञानेश्वरचा मळा फुललाय. तो पाहाताना ८/९ वर्षांपूर्वी याच माण परिसरातली शेतीखालील साडेतीन हजार एकर जमीन महाराष्ट्र शासनाने आय-टी पार्कसाठी शेतकऱ्यांना वाढीव किमतीचं गाजर दाखवून घेतल्याची घटना मनात जागी झाली.  यासंबंधी छेडताच ज्ञानेश्वर म्हणाला, ‘‘आम्ही उर्वरित दोनशे-सव्वादोनशे शेतकऱ्यांनी मात्र निर्धाराने आमची १३५२ एकर शेती वाचवली आणि ‘अभिनव फार्मर्स क्लब’ या झेंडय़ाखाली एकत्र येऊन पारंपरिक शेतीला फाटा देत आधुनिक शेती अंगीकारली..त्या निर्णयाची फळं आज आम्ही चाखत आहोत. या उलट रातोरात श्रीमंत झालेले ते शेतकरी व्यसनात सर्व काही घालवून आज त्यांच्याच जागेत उभ्या राहिलेल्या कंपन्यात रखवालदार बनलेत.’’

ज्ञानेश्वरची जागा सगळी मिळून जेमतेम एक एकराची. त्यावर त्याचं घर, गाईचा गोठा, लहानसं गोदाम, शेतकरी प्रशिक्षणाची खोली, कार्यालय, गांडूळ खतनिर्मितीचं युनिट व उर्वरित २८ गुंठय़ांवर पॉलीहाऊस व नेटशेडमधली देशी व परदेशी भाज्यांची सेंद्रीय शेती.. ज्ञानेश्वरची पत्नी पूजानेही आपल्या पतीच्या हातात हात घेत याच कामात झोकून दिलं आहे.  पूजा म्हणाली, ‘‘सकाळी ७ ते ९ या वेळात आम्ही दोघं व आमची २ मुलं असे चौघेही न चुकता शेतात काम करतोच करतो. बोडकेसाहेब (ज्ञानेश्वर) आता व्याख्याने, दौरे यामुळे शुक्रवार ते रविवारीच घरी असतात. तेव्हाही इथे ट्रेनिंग सुरू असतंच. त्यामुळे ‘अभिनव ग्रुप’मधील आसपासच्या शेतकऱ्यांच्या, ग्राहकांच्या मागणीप्रमाणे इथे येऊन पडणाऱ्या भाज्या, फळं निवडून पॅक करून महिला बचत गटाच्या माध्यमातून पुण्यातील मॉल्सना व सोसायटय़ांना पाठवण्याची जबाबदारी आता मी व माझी मैत्रीण अरुणा शेळकेनं घेतलीय. पुण्याच्या आसपास ‘अभिनव’ची अशी ५, ६ पॅकहाऊस आहेत. शेतावरच्या घराच्या ऐसपैस पडवीत आमच्या गप्पा सुरू होत्या. टेबलांवरच्या लांबरुंद क्रेटमध्ये पालक, वाटाणा, फ्लॉवर, भेंडी, सॅलरी, लेटय़ूस..अशा भाज्यांचे तजेलदार ढीग पडले होते. बोलताना तिचे हात झरझर काम करत होते. मधून मधून फोन वाजत होता. तिची ती त्रिस्थळी धावपळ मोठी लोभस वाटत होती.  बोडके पती- पत्नी व त्यांचे सहकारी यांची कथा ऐकताना एकीचं बळ काय करू शकतं ते पदोपदी जाणवतं.

असंख्य शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन घडवणाऱ्या ज्ञानेश्वरचा जन्म एका गरीब शेतकरी कुटुंबातला. आई रोजगारासाठी इतरांच्या शेतात राबायची तर बहिणी रानातली बोरं जमा करून डोक्यावर टोपली घेऊन बाजारात विकायच्या. पुण्यामध्ये शाळेत शिकणाऱ्या ज्ञानेश्वरलाही घरी आलं की गावाकडच्या जंगलातील हातभट्टय़ांसाठी लागणाऱ्या गुळाच्या अवजड ढेपी डोक्यावर वाहून नेण्याचं काम करावं लागे. दहावी झाल्यावर त्याला लहानशी नोकरी मिळाली. लग्नही झालं आणि त्याने नोकरी सांभाळून वीटभट्टी सुरू केली. या वीटभट्टीचं सारं काम पूजा बघायची. पुढे कामगारांच्या कटकटींना कंटाळून त्यांनी हे काम बंद करून गुलाबांची नर्सरी सुरू केली. या फुलबागेत ज्ञानेश्वरच्या आईवडिलांनी व पूजाने घमेली डोक्यावरून वाहून नेण्यापासून पॅकिंगपर्यंत सर्व कामं केल्याने हातात चार पैसे खेळायला लागले. त्याच सुमारास सांगलीच्या प्रकाश पाटील या तरुण शेतकऱ्याचा लेख ज्ञानेश्वरच्या वाचनात आला. त्याला दहा गुंठय़ाच्या पॉलीहाऊसमधून कार्नेशन फुलांच्या विक्रीतून वर्षभरात १२ लाख रुपये मिळाले होते. त्याच क्षणी नोकरी सोडून हायटेक शेती करण्याचा विचार ज्ञानेश्वरच्या मनात पक्का झाला.

ज्ञानेश्वरची हायटेक शेतीची व्याख्या अगदी निराळी आहे. तो म्हणतो, काळाच्या बरोबरीने बदललेली शेती म्हणजे आधुनिक शेती..पाणी जमिनीला नाही तर रोपाच्या मुळांना द्यायचं याचा अभ्यास म्हणजे आधुनिक शेती..शेतमालाचं ब्रँडिंग, आकर्षक पॅकिंग म्हणजे आधुनिक शेती..शेती पॉलीहाऊसमधली असो वा उघडय़ावरती. आर्थिकदृष्टय़ा परवडणारी म्हणजे आधुनिक शेती..अशी विद्यापीठालाही न सुचणारी त्याची व्याख्या आहे. ज्ञानेश्वरच्या ‘अभिनव फार्मर्स क्लब’शी संलग्न असलेल्या महाराष्ट्रातील ४५०० शेतकऱ्यांनी अशा हायटेक शेतीद्वारे गेल्या १० वर्षांत अगणित कोटी लिटर पाणी वाचवलंय. तसंच थेट मार्केटिंगमुळे या शेतकऱ्यांची दलाल व मध्यस्थांच्या मनमानी लुटीतूनही मुक्तता झालीय.

‘अभिनव ग्रुप’मधील सर्व शेतकऱ्यांच्या मुली अ‍ॅग्रिकल्चरचं तर मुलगे मेकॅनिकल इंजिनिअरिंगचं शिक्षण घेताहेत. (इंजिनिअरिंग अशासाठी की पुढे-पुढे मजुरांचा प्रश्न बिकट होणार अशावेळी यंत्राधिष्ठित संशोधनासाठी ही बेगमी). बी.एस्सी. अ‍ॅग्री करणारी त्यांची मुलगी प्रिया  व मेकॅनिकल इंजिनीअरिंगच्या प्रथम वर्षांत शिकणारा प्रमोद दोघंही गेली ७/८ र्वष आपल्या शेतात काम करून स्वत:च्या शिक्षणापुरते पैसे कमावत आहेत. प्रिया म्हणाली, ‘आय.आय.टी पवईने आम्हाला एक सॉफ्टवेअर उपलब्ध करून दिलंय. ‘अभिनव’कडे नोंदणी केलेल्या, शहरातील प्रत्येक ग्राहकाला शनिवारी सकाळी, एका एस.एम.एसद्वारा त्या दिवशी कोणता भाजीपाला, फळे, कडधान्य उपलब्ध आहेत त्याची माहिती दिली जाते. त्यानुसार ग्राहक व्हॉईस एस.एम.एस.ने आपली मागणी नोंदवतात. त्यामुळे थेट विक्री सुलभ झालीय. या नोंदीची तसंच बिलं बनवण्याची जबाबदारी प्रियाने उचललीय. ती गाडीही चालवते. त्यामुळे प्रसंगी आजूबाजूच्या शेतकऱ्यांकडून भाजीपाला आणणं आणि तो शहरात पोहोचवणं या कामाचाही निपटा पाडते. अशा कर्तबगारीमुळेच अलीकडे म्हणजे (२१ फेब्रुवारी) ला १९ व्या वर्षीच  तिला महाराष्ट्र राज्य सिंचन परिषदेचा उत्कृष्ट तरुण शेतकरी महिला (२०१६) हा पुरस्कार मिळालाय. या आधी ज्ञानेश्वर (२०१०) व पूजा (२०१०) या दोघांचंही नाव या पुरस्कारावर उमटलंय.

पूजा आठवीपर्यंत शिकलेली एक सर्वसामान्य (!) स्त्री. पण ज्ञानेश्वरसारखा परीस तिच्या आयुष्यात आला आणि ती झळाळून उठली. ही कृतज्ञता तिच्या बोलण्यातून क्षणोक्षणी जाणवते. म्हणाली, ‘‘दुसऱ्या कोणाबरोबर गाठ बांधली गेली असती तर कदाचित शेतात घमेली उचलत राहिले असते, पण साहेबांनी शेतातील तंत्र-मंत्र शिकवल्याने आज स्वकमाईवर चीनला जाऊन तिथली शेती बघून आले!’’ ज्ञानेश्वरच्या अनुपस्थितीत पूजा घरची शेती तर सांभाळतेच, शिवाय दररोज भेटायला येणाऱ्या ५० ते १०० शेतकऱ्यांना प्रशिक्षणही देते. बी. एस्सी/ एम. एस्सी. अ‍ॅग्रिकल्चर शिकणाऱ्या मुली तिच्याकडे धडे घेतात. या अध्यापनाची सुरुवात कशी झाली त्याची गंमतही पूजाने सांगितली. एकदा २०० शेतकऱ्यांचा एक गट आधुनिक शेतीसंबंधी माहिती घेण्यासाठी यायचा होता आणि नेमकं तेव्हाच ज्ञानेश्वरला कुठल्याशा महत्त्वाच्या कामासाठी बाहेरगावी जाणं भाग पडलं. पूजाला प्रचंड दडपण आलं आणि तिने कोणाला तरी बोलवाच असा धोशा लावला. तेव्हा तुला जे माहीत आहे तेच तुला सांगायचं आहे, सांगत ज्ञानेश्वरने (तिच्या सोहबांनी) तिच्यातला आत्मविश्वास जागा केला आणि तिने वेळ निभावून नेली. ५/६ वर्षांपूर्वी अशी चार लोकांसमोर तोंड उघडायलाही घाबरणारी पूजा आता ‘अभिनव ग्रुप’मधील शेतकऱ्यांच्या मालाचे (डाळी, धान्ये) पैसे देण्यासाठी लाखलाख रुपयांच्या चेकवर सह्य़ाही करते. तिच्या या कामगिरीची दखल घेत राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेने (नाबार्ड) आपल्या कॅलेंडरवर (२०१२) झळकण्याचा मान तिला दिलाय. आपली पॉलीहाऊसमधली शेती मला दाखवतानाही सारं श्रेय ज्ञानेश्वरला देत तिची ‘कॉमेंट्री’ सुरू होती. ‘‘गादीवाफ्यांवर आम्ही भाताचं तूस घालतो. त्यामुळे जमीन भुसभुशीत राहते आणि सूयप्रकाश मुळापर्यंत पोहचतो..झाडांना शेणाची स्लरी घातली की तण उगवत नाही..ही स्लरी म्हणजे कणीदार शेण नाही हं..त्यात बाजरीचं पीठ, काळा गूळ, गोमूत्र घालून केलेलं जीवामृत आहे..’ (हादेखील साहेबांचा फॉम्र्युला)’’  पूजा आणि ज्ञानेश्वर यांच्या नात्याची हीच गंमत आहे. दोघंही एकमेकांना पूरक असल्याने एकमेकांना साथ देत ते पुढे चालले आहेत. एकमेकांवरचा विश्वास यापेक्षा एकमेकांविषयीचा आदरच त्यांच्यातलं नातं अधिक दृढ करतो आहे.

बोडके यांच्या घरात ‘हम दो हमारे दो’ खेरीज एक गाय, दोन कुत्रे व तीन मांजरी असं गोकुळ आहे. दिवसाला दहा लिटर दूध देणारी त्यांची लक्ष्मी (गाय) सकाळ संध्याकाळ ५ लिटर गोमूत्रही देते. त्याच्या विक्रीतून दिवसाला हजार रुपये मिळतात. ज्ञानेश्वरच्या भाषेत सांगायचं तर केवळ एका गाईच्या गोमूत्रावर एक घर चालू शकतं.

बचतगटाद्वारे १३५० स्त्रियांना महिन्याला आठ ते दहा हजार रुपयांचा रोजगार मिळवून देणाऱ्या ज्ञानेश्वरची दूरदृष्टीही वाखणण्यासारखी. ‘अभिनव’च्या माध्यमातून एकत्र आलेल्या देशभरातील लाखभर शेतकऱ्यांचं नेतृत्व करण्यासाठी त्याने १५०० प्रतिनिधींची फळी तयार केलीय; जेणेकरून कृषिविस्ताराचा हा आलेख सतत वर जात राहील. याही पुढचं पाऊल म्हणजे ‘अभिनव ग्रुप’ने गोंदिया जिल्ह्णाातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची २००० मुलं दत्तक घेतलीयेत आणि त्यांना प्रशिक्षण देऊन पायांवर उभं करण्याची योजनाही कार्यान्वित झालीय.

‘अभिनव’च्या आजवरच्या वाटचालीत नाबार्डचे सुनील जाधव, कृषी आयुक्तालयाचे संचालक
कृ. वि. देशमुख, महाराष्ट्र सिंचन आयोगाचे अध्यक्ष दि. या. मोरे, भारतीय कृषी संशोधन परिषदेचे उपमहासंचालक डॉ. किरण कोकाटे अशा मान्यवरांचं मार्गदर्शन मिळाल्याचं ज्ञानेश्वरने आवर्जून सांगितलं. ‘अभिनव गाथा’ या त्याच्या पुस्तकाच्या प्रस्तावनेत
डॉ. दि. या. मोरे लिहितात, ‘ज्ञानेश्वर बोडके या ४४ वर्षीय शेतकऱ्याच्या वाणीमध्ये एक वेगळ्याच प्रकारचं सामथ्र्य व प्रतिभा आहे. सिंचन परिषदांना आलेल्या असंख्य शेतकऱ्यांपुढे जेव्हा ते आधुनिक शेतीच्या माध्यमातून मिळवलेले अध्यात्म मांडतात तेव्हा ऐकणारे हजारो कान तन्मय होतात आणि माऊली म्हणून त्यांच्या पायावर डोकं ठेवण्यासाठी धडपडतात..’ हे वाचताना सहज मनात आलं, ‘संत ज्ञानेश्वरांनी सकलजनांसाठी ‘भूतां परस्परे जडो, मैत्र जीवाचे..हे पसायदान मागितलं, त्यानुसार हा ज्ञानेश्वर जोडीदारणीसह अनेक जीवांमधलं मैत्र जोडत प्रगतीच्या वाटेने निघालाय.

संपर्क :
ज्ञानेश्वर बोडके- ९४२२००५५६९

 

– संपदा वागळे