मुंबई पोलीस दलात काम करणाऱ्या आनंद व सरिता शिंदे या गिर्यारोहक दाम्पत्याला जगण्याचा सूर, ताल निसर्गामध्येच सापडतो. गड, किल्ले हे जणू यांचे सेकंड होम. या जोडीच्या अचंबित करणाऱ्या सहजीवनाचं गमक म्हणजे.. साहस हे ध्येय, निसर्ग हाच ध्यास, गिरिदुर्ग हे सगेसोयरे, सह्य़ाद्री हाच श्वास..
माझ्यासाठी पांडुरंगा तुझं गीता भागवत
पावलात सामावतं माटीमध्ये उगवतं

थोर कवयित्री बहिणाबाईं यांना ज्याप्रमाणे गीता व भागवत निसर्गात दिसत असे त्याप्रमाणे आनंद व सरिता शिंदे या जोडीलाही जगण्याचा सूर, ताल निसर्गामध्येच सापडतात. निसर्गप्रेमातून रुजवलेल्या व फुलवलेल्या गिर्यारोहणाच्या छंदामुळे त्यांच्या सहजीवनाचं सुरेल गीत झालंय. मुंबई पोलीस दलात काम करणाऱ्या या गिर्यारोहक दाम्पत्याचे सह्य़ाद्रीच्या दुर्गम पर्वतराजींतील ८० हून अधिक कडे- सुळक्यांवर मुंबई पोलिसांचा ध्वज मोठय़ा अभिमानाने फडकलाय.

bhau rangari ganpati temple fire marathi news
भाऊ रंगारी गणपती मंदिराजवळील जुन्या लाकडी वाड्याला आग
Brutal killing of daughter along with wife in Buldhana
खळबळजनक ! पत्नीसह कन्येची निर्घृण हत्या; मारेकऱ्याने स्वत:ही घेतली विहिरीत उडी…
dombivli marathi news, pedestrian bridge on railway line
डोंबिवलीतील गणपती मंदिराजवळील रेल्वे मार्गावरील पादचारी पूल धोकादायक; १ एप्रिलपासून डोंबिवली पूर्व-पश्चिमेकडे जाण्याचा मार्ग बंद
firing at ram mandir ayodhya
अयोध्या : राम मंदिर परिसरात सुरक्षेसाठी तैनात PAC जवान गोळी लागून जखमी, परिस्थिती गंभीर

आनंदने तर एक पाऊल पुढे टाकत हिमालयातील अत्युच्च अशी १३ हिमशिखरेही सर केलीयेत. पोलीस दलातील आणि गिर्यारोहणातील उल्लेखनीय कामगिरीसाठी त्यांना अनेक पुरस्कारही मिळालेत. या साहस, प्रसंगावधान, कणखरपणा, चापल्य असे अनेक गुण अंगी बाणवणाऱ्या गिर्यारोहण या अष्टावधानी क्रीडा प्रकाराचं या उभयतांनी गेल्या २० वर्षांत शेकडो मुलांना प्रशिक्षण दिलंय. चाळिशीच्या आत-बाहेर असलेल्या या धाडसी पतीपत्नीची कहाणी जितकी थरारक तितकीच प्रेरक.
छत्रपती शिवाजी महाराज हे दोघांचंही दैवत. त्यामुळे गड-किल्ल्याचं आकर्षण त्यांना लहानपणापासूनच होतं. आनंद हा धारावीच्या वस्तीत वाढलेला मुलगा. शाळेत असताना त्याचा शनिवार-रविवारचा मुक्काम शीवच्या किल्ल्यावरच असे. अभ्यासही तिथेच. या किल्ल्याचा चिरा न चिरा त्याच्या परिचयाचा आहे. प्रस्तरारोहणाचा श्रीगणेशा त्याने इथेच गिरवला. सरिता ही मुळातच चारचौघींपेक्षा निराळी. अकरावी-बारावीपासूनच तिने अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून डहाणूजवळील बोर्डी भागातील आश्रमशाळांसाठी भरपूर काम केलंय. ती कविता, चारोळ्याही करायची. महाविद्यालयीन दिवसांतच तिला ट्रेकिंगचा टिळा लागला. छात्रसेवेत असताना ओरिसातील निबिड अरण्यात केलेली भटकंती हा तिचा पहिला ट्रेक. याच मोहिमेत तिला आयुष्याचं ध्येय गवसलं आणि याच छंदाने पुढे आयुष्याचा जोडीदारही मिळवून दिला. बाण हा सह्य़ाद्रीच्या पवर्तरांगांतील सुमारे ८००० फूट उंचीचा सर्वोच्च सुळका खिंडीतील अजिंक्य मार्गाने सर करणारी ती पहिली महिला गिर्यारोहक ठरली. तसंच सह्य़ाद्रीतील अत्यंत अवघड अशा टकमक कडय़ासह इतरही अनेक कडे-सुळके तिने लीलया सर केले आहेत. एवढंच नव्हे तर कृत्रिम प्रस्तरारोहणाच्या अनेक राष्ट्रीय स्पर्धामध्ये तिने आपल्या नावाची मोहर उमटवलीय.
आनंद म्हणाला, गिर्यारोहणाच्या मोहिमांचं नेतृत्व करण्यासाठी भारत सरकारच्या मान्यताप्राप्त प्रशिक्षण संस्थांतून प्राथमिक व प्रगत असे दोन अभ्यासक्रम ‘ए’ श्रेणीत पूर्ण करणं आवश्यक असतं. ‘बी श्रेणी म्हणजे पुनश्च हरिओम. सरिताने हे दोन्ही पडाव यशस्वीपणे पार केलेत आणि आनंदने तर पुढच्या दोन अतिप्रगत कोर्समध्येही विशेष प्रावीण्यासह बाजी मारलीये. यामुळे राष्ट्रीय पातळीवरील प्रशिक्षक म्हणूनदेखील त्याला मान्यता मिळालीय.

या दोघांची गिर्यारोहणाची व्याख्या म्हणजे निसर्गाच्या अधिक जवळ जाण्याचा साधा, सोपा व शिस्तबद्ध मार्ग. त्याचं म्हणणं, योग्य प्रशिक्षण, अनुभवी मार्गदर्शक व निसर्गावर मनापासून प्रेम असेल तर याच्याइतका निखळ आनंद देणारा दुसरा खेळ नाही. फक्त ‘सशाच्या शिकारीला वाघाची तयारी’ हा नियम पक्का लक्षात ठेवायचा, मग अगदी वयाचा अडसरही तुमचा पाय मागे खेचू शकत नाही. २००४ ची गोष्ट. दिल्लीतील एक निवृत्त सनदी अधिकारी (आय.एफ.एस.) सुखदेव बाबा हे आनंदचं नाव ऐकून सह्य़ाद्रीतील एक तरी सुळका सर करावा ही इच्छा मनात धरून आले. रायगडचा पहारेकरी म्हणून ओळखला जाणारा ‘लिंगाणा’ हा दुर्गम सुळका आनंदच्या नेतृत्वाखाली सर करून त्यांनी जेव्हा तिथे तिरंगा फडकवला तेव्हा या पंजाबच्या शेराचं वय होतं अवघं चौऱ्याहत्तर!

या गिरिप्रेमी जोडप्यापाशी गिर्यारोहणाचे एवढे किस्से आहेत की त्यावर सहज मोठा ग्रंथ होईल. २६ जानेवारी २००१ हा दिवस. वेळ सकाळी आठ ते साडेआठची. आनंद सेनेची नाणेघाटातील वानरलिंगी सुळक्यावर चढाई सुरू होती. सुमारे २००० फूट खोल दरीच्या काठावर उभ्या असलेल्या या सुळक्याचा माथा गाठायला जेमतेम २०-३० फूट उरले असतील-नसतील तेवढय़ात तो प्रचंड सुळका हलायला लागला. आनंदने प्रसंगावधान राखून स्वत:ला व साथीदाराला सुरक्षित केलं. अध्र्या तासाने परिस्थिती निवळल्यावर तो सुळका जिद्दीने सर करून मंडळी खाली आली तेव्हा त्यांना गुजरातच्या प्रलयंकारी भूकंपाची बातमी समजली.

आनंद व सरिता दोघंही पदवीधर आहेत. पण केवळ एक पाय कायम डोंगरात राहावा म्हणून त्यांनी अधिकारीपदासाठी प्रयत्न केलेले नाहीत. पोलीस दलातील अत्यंत व्यस्त दिनक्रमातून सवड मिळताच हे दाम्पत्य डोंगरांच्या कडे-कपारीतून भटकत राहतं. त्यांच्या दोन्ही मुलांनाही (आदित्य ११ र्वष, समर्थ ७ र्वष) पोटात असल्यापासूनच गिर्यारोहणाचे धडे मिळाल्याने गड-किल्ल्यांवर केव्हाही जाण्यासाठी त्यांची एका पायावर तयारी असते. योगायोग म्हणजे त्यांच्या मोठय़ा मुलाचा आदित्यचा जन्मही जागतिक पर्यटन दिनाचा म्हणजे २७ सप्टेंबरचा.

गिर्यारोहणाद्वारे मुंबई पोलिसांचा नावलौकिक उंचावणाऱ्या आनंदला वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नेहमीच प्रोत्साहन दिलंय. अपर आयुक्त के. प्रसन्ना, सहायक आयुक्त राजदूत रूपवते, वरिष्ठ निरीक्षक शशांक सांडभोर, माधव मोरे, विनय घोरपडे आणि कुर्ला विभागाचे साहाय्यक आयुक्त श्रीरंग नाडगौडा या सर्वानी वेळोवेळी केलेल्या मदतीचा त्याने आवर्जून उल्लेख केला.
अत्यंत दक्षतेने आपली डय़ुटी निभावताना तिच्यातील गिर्यारोहकही सतत जागा असतो. एकदा अवाढव्य पसरलेल्या किल्ले माहुलीच्या घेऱ्यात भटकंतीसाठी गेलेली काही तरुण मुलं-मुली वाट चुकली.. घाबरली.. नशिबाने रेंज मिळाल्याने त्यांच्या मदतीसाठी धावा करणारा कॉल नेमका सरिताच्या लाइनवर आला. गड-किल्ल्यांच्या परिसरातील स्थानिकांशी आनंद-सरिताचे जिव्हाळ्याचे संबंध. तिने त्वरित माहुलीच्या पायथ्याशी राहणाऱ्या, जंगलगुरू म्हणून विख्यात गुरुनाथ आगिवले यांच्याशी संपर्क साधला. त्याने रात्रीच्या अंधारात भटकलेल्या मुलांना शोधून काढेपर्यंत सरिताने त्यांच्या घरपरतीसाठी ठाणे पोलिसांमार्फत वाहन व्यवस्थाही केली.

काळीज गोठवणारी आणखी एक घटना डिसेंबर २००७ ची. ठाणे पोलीस नियंत्रण कक्षाकडून आलेल्या संदेशावरून आनंदला कळलं की, शहापूरजवळील आजोबा पर्वतावरील सीतेचा पाळणा या सुळक्यावरून शांती शेणॉय ही मुलगी पाय घसरून खोल दरीत पडलीय. रात्रीच्या रात्री तिथे पोहोचून त्याने मोठय़ा हिमतीने त्या जंगलात पडलेला तिचा देह जंग जंग पछाडून वर आणला. अशी कर्तव्यं निभावण्यासाठी या दोघांनी आपल्या मनाचा एक उबदार कोपरा सतत सजग ठेवलाय. यासाठी करावी लागणारी पदरमोड हा त्या आनंदाचाच एक भाग.

या गिरिप्रेमींची सावरकरभक्तीही तितकीच प्रखर. स्वातंत्र्यवीरांच्या समर्पणाला यंदा ५० र्वष पूर्ण होत आहेत. म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक राष्ट्रीय समितीने एक भव्य हिमालय मोहिमेचं आयोजन करून त्याची धुरा आनंदकडे सोपवली. त्यानुसार २३ ऑगस्ट २०१५ रोजी ५ जणांच्या चमूने २०,००० फूट उंचीवरचं एक अजिंक्य, अनामिक हिमशिखर सर केलं. आता लवकरच या अभिनव स्मारकावर शिखर सावरकर या नावाने राजमान्यतेची मोहर उमटेल. २६/११ च्या हल्ल्यातील शहिदांना मानवंदना देण्यासाठी हिमालयात १६,५०० फुटांवर कायमस्वरूपी पितळी स्मारक यशस्वीपणे उभं करण्याची आनंदची कामगिरीही विशेष मोलाची.

हिमालयीन मोहिमांचा एवढा प्रदीर्घ अनुभव असूनही तुझी पावलं अजून एव्हरेस्टकडे कशी नाही वळली, या प्रश्नावरचं त्याचं उत्तर विचार करायला भाग पाडणारं. म्हणाला.. मला यशाची शंभर टक्के खात्री आहे, पण त्यासाठी लागणारे २५ ते ३० लाख रुपये आणायचे कुठून?

सांसारिक जीवनातील साहचर्याबद्दल विचारताच सरिता म्हणाली, ‘आमचे जुळणारे गुण न जुळणाऱ्या गुणांवर नेहमीच मात करतात. आम्ही बाइकवरून कुठेही फिरायला किंवा अगदी देवदर्शनाच्या निमित्तानेदेखील मुंबईबाहेर गेलो तरी याच्या पाठीवरील सॅकमधील बरीचशी जागा गिर्यारोहणाच्या साहित्याने व्यापलेली असते. त्यामुळे चुकूनही कधी छोटी-मोठी खरेदी करायची म्हटलं तर सामानासाठी जागा नाही हे उत्तर ठरलेलं. अर्थात याचीही आता सवय झालीय म्हणा..
मात्र निसर्गावरील प्रेम या समान आवडीतून घाटकोपरच्या पोलीस वसाहतीतील आपल्या घराचा एक कोपरा त्यांनी हिरवागार बनवलाय. त्यांच्या या छोटय़ाशा फळबागेत अनेक पक्षी येतात. रात्री तर घुबडंदेखील मुक्कामाला येतात. डोंगरदऱ्या पालथ्या घालताना साप-विंचू यांना अंगाखांद्यावर वागवायची सवय झाल्याने रानावनातून जखमी स्थितीत आणलेले अनेक साप यांच्या घरात राहून बरे होऊन गेलेत. आनंद म्हणतो, कान्हेरी गुंफा, नाणेघाट या जागांवर तर आम्हा गिर्यारोहकांच्या नावाचा सात-बाराचा उताराच काढून ठेवलाय. आठवडाभर काम करून या सेकंडरी होममध्ये गेलो, तिथे जमेल तितकी गिरिसेवा केली की आमची बॅटरी फुल चार्ज राहते. या जोडीच्या अचंबित करणाऱ्या सहजीवनाचं गमक आनंदच्याच शब्दात सांगायचं तर..
साहस हे ध्येय, निसर्ग हाच ध्यास
गिरिदुर्ग हे सगेसोयरे, सह्य़ाद्री हाच श्वास..
सरिता कांजूर मार्ग पोलीस ठाणेमार्फत नियंत्रण कक्षात तातडीची मदतसेवा (इमर्जन्सी हेल्पलाइन) विभागात कार्यरत आहे. तिने कळकळीने सांगितलं की, मुंबई पोलिसांच्या १०० या हेल्पलाइनवर आम्ही ३५ जण एका रात्रीत प्रत्येकी ५०० ते ७०० कॉल्स घेतो. त्यामध्ये निम्मे फोन बिनकामाचे, अनावश्यक, पाल्हाळ लावणारे व मदतीची खरी गरज असणाऱ्यांचा वेळ खाणारे असतात. नागरिकांनी या तातडीच्या व अतिमहत्त्वाचा सेवेचा वापर भान राखून केला तर मुंबई पोलीस किती तरी अधिक कार्यक्षमतेने जनतेच्या समस्या निवारू शकतील. ज्यांना खरच गरज आहे त्यांच्यापर्यंत सहजपणे पोहोचणे शक्य आहे. त्यांना मदत मिळेल. तेव्हा काम अगदी तातडीचे असेल तेव्हाच पोलिसांचा १०० क्रमांक डायल करा.

संपर्क :
anandshinde73@gmail.com
sariannu@gmail.com