सध्या चायनिज पदार्थाची सर्वानाच चटक लागली आहे. बाहेर जेवायला जायचे म्हटले की बरेच जण चायनिज खाण्याचाच बेत करतात. पण चायनिज पदार्थाचे अतिसेवन आरोग्यासाठी धोकादायक आहे.
आपल्याला चायनिज गोष्टींचे आकर्षण पहिल्यापासूनच आहे. अगदी चिनी बनावटीच्या वस्तूंपासून चायनिज पदार्थापर्यंत. चायनिज पदार्थाची तर सध्या सर्वानाच चटक लागली आहे. चीनमध्ये मिळणारे चायनिज पदार्थ व भारतात मिळणारे चायनिज पदार्थ यात फरक आहे. भारतीयांच्या जिभेला पूरक ठरतील, अशा चवीचे हे पदार्थ तयार केले जातात. रस्त्याशेजारी फुटपाथवर गल्लोगल्ली मिळणारे चायनिज पदार्थ सहज आणि स्वस्तात उपलब्ध असल्यामुळे तेच खाण्याकडे बहुतेकांचा कल असतो. हॉटेल्स आणि रेस्टॉरन्टच्या तुलनेत हे पदार्थ स्वस्तात द्यायचे, तर त्यांचे ‘कुक’ अनेक तडजोडी करतात. त्यात निकृष्ट दर्जाचे तेल आणि भाज्या वापरल्या जातात. त्याहीपेक्षा आवश्यकतेपेक्षा जास्त प्रमाणात वापरल्या जाणारा अजिनोमोटो पचनसंस्थेसह शरीराचे इतरही नुकसान करू शकतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
चायनिज पदार्थामध्ये मोनोसोडियम ग्लुटामेट, शेजवान सॉस, कृत्रिम रंग, स्टार्च कॉर्न यांसारखे जिन्नस वापरल्यामुळे पचनशक्तीवर ताण येऊन ती बिघडू शकते. भात, बांबूचे मूळ, मशरुम्स, नूडल्स हे चिनी लोकांचे ‘स्टेपल फूड’ आहे, तसे ते आपले नाही. नूडल्स, चिकन किंवा मांस अर्धकच्चे शिजवले गेले तर पचायला हानीकारक आहेत. शिवाय मैदा आतडय़ात जाऊन चिकटत असल्यामुळे त्याचा अतिरेकी वापर घातक आहे. ‘रोडसाइड चायनिज फूड’मध्ये वापरला जाणारा तांदूळही पॉलिश्ड किंवा रिफाइंड असल्याने पचनसंस्थेसाठी हितकर नसतो.
फक्त भाज्या अर्धकच्च्या शिजवल्या तरी त्यांचा काही त्रास होण्यासारखा नाही. एखाद्या वेळी चायनिज पदार्थ खाण्याने काही बिघडत नाही; परंतु आठवडय़ातून तीन-चार वेळा तरी चायनिज पदार्थ हाणण्याची सवय हानीकारक ठरू शकते. या पदार्थामध्ये होणारा स्वस्त कच्च्या मालाचा व कृत्रिम रंगांचा वापर, सॉसेसचा व ‘प्रिझव्‍‌र्हेटिव्हज्’चा सढळ वापर, भरपूर तेल वापरले जात असल्यामुळे जास्त प्रमाणात मिळणाऱ्या कॅलरीज हे सर्व शरीरासाठी घातक आहे, असे आहारतज्ज्ञ मानसी गोगटे यांनी सांगितले.
मात्र या सर्वापेक्षा मोनोसोडियम ग्लुटामेटचा सर्रास वापर शरीराचे सगळ्यात जास्त नुकसान करणारा आहे. ते अधिक प्रमाणात वापरले गेल्यास जादा सोडियमवर प्रक्रिया करायला आतडय़ांना वेळ लागतो आणि टाकाऊ पदार्थ मूत्रपिंडांमार्फतच बाहेर टाकले जात असल्यामुळे मूत्रपिंडांच्या कार्यावर विपरीत परिणाम होण्याचा धोका वाढतो. यामुळेच ५ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना अजिनोमोटोचा वापर झालेले पदार्थ खाऊ घालणे अतिशय धोकादायक आहे. कारण त्यांची पचनसंस्था आणि आतडी नाजूक असतात, याकडेही गोगटे यांनी लक्ष वेधले.
चायनिज पदार्थामध्ये वापरलेली कोबी कच्ची असल्यास ती पचायला जड असते. शिवाय ही कोबी आरोग्यदायक वातावरणात उत्पादन झालेली नसल्यास तीत रोगजंतूंची पैदास होऊ शकते आणि त्यामुळे तीव्र पोटदुखी व पोटाचे इतर विकार होऊ शकतात, असेही त्यांनी सांगितले.
आपल्याकडे रस्त्यावर चायनिज पदार्थ विकले जाण्याचे आणि लोकांनी ते सर्रास खाण्याचे प्रकार वाढले, तेव्हापासून ‘हेपॅटायटिस सी’ या घातक रोगाचे प्रमाणही वाढले, ही बाब शीव रुग्णालयातील स्त्रीरोग व प्रसूतितज्ज्ञ डॉ. योगेश्वर नंदनवार यांनी नमूद केली. आपल्याकडील चायनिज पदार्थ भरपूर तेलकट व मसालेदार असल्यामुळे अ‍ॅसिडिटी, उलटय़ा आदी त्रास होतात. त्यांच्यातील कच्ची कोबी तर आणखी त्रासदायक ठरते. त्यामुळे गर्भावस्थेत चायनिज पदार्थाचे जास्त सेवन अतिशय घातक आहे, असे त्यांनी सांगितले.
मनोज जोशी
अन्न-औषध प्रशासनाचे दुर्लक्ष
अनारोग्यदायक चायनिज पदार्थावर अन्न व औषध प्रशासनाचे कुठलेही नियंत्रण दिसून येत नाही. खरे तर ‘मोनोसोडियम ग्लुटामेट’चा वापर कोणत्या पदार्थामध्ये करावा, त्याची ‘गुड मॅन्युफॅक्चुअरिंग लेव्हल’ काय असावी या सर्वाची अन्नसुरक्षा कायद्यामध्ये (फूड सेफ्टी अ‍ॅक्ट) तरतूद आहे. शिवाय, अजिनोमोटो वापरलेले पदार्थ १२ महिन्यांखालील मुलांना खाण्यासाठी देऊ नयेत, असे त्याच्या पाकिटावर लिहिलेले असणे आवश्यक आहे. परंतु याचे सर्रास उल्लंघन होत आहे आणि अजिनोमोटोच्या अवास्तव वापरामुळे घातक ठरणारे पदार्थ खाऊन आपण आपल्याच प्रकृतीवर विपरीत परिणाम होण्यास आमंत्रण देत आहोत.
‘अजिनोमोटो’च्या अतिरेकापासून सावधान
चायनिज पदार्थाना चव आणणाऱ्या अजिनोमोटो (मोनोसोडियम ग्लुटामेट)च्या अतिरिक्त वापरामुळे या पदार्थाचे सेवन आरोग्यासाठी अतिशय घातक ठरू शकते, असे आढळून आले आहे.‘अजिनोमोटो’ नावाची कंपनी तयार करीत असलेल्या ‘फ्लेव्हर एन्हान्सर’चे शास्त्रीय नाव ‘मोनोसोडियम ग्लुटामेट’ असून त्यात सोडियम, कार्बन, हायड्रोजन, नायट्रोजन व ऑक्सिजन ही मूलद्रव्ये असतात.  व्हिनेगरप्रमाणेच अजिनोमोटोही आंबवण्याच्या प्रक्रियेतून तयार होते. अनेक भाज्या, सॉसेस, सूप, मांस, मासे, अंडी यामध्ये अजिनोमोटो चांगल्या रीतीने मिसळू शकतो, पण तो जास्त वापरला गेला, तर मात्र पदार्थाची चवच बिघडते असे नाही, तर खाणाऱ्याचे आरोग्यही बिघडू शकते.

Health Benefits of Avocado
झपाट्याने वजन कमी करणारे हिरव्या रंगाचे ‘हे’ फळ कापण्यापूर्वी स्वच्छ धुवा; तज्ज्ञ म्हणतात, अन्यथा पडेल महागात
Skin care tips jaggery face pack helpful to glowing your skin
चेहऱ्यावर सुरकुत्या दिसू लागल्या? गुळाचा करा खास वापर; त्वचा दिसेल तरुण- चमकदार
mini paneer sabudana vada recipe
Recipe : तेलात न तळता बनवा साबुदाण्याचे कुरकुरीत ‘प्रोटीनयुक्त’ मिनी वडे! बनवताना घाला फक्त ‘हा’ पदार्थ
Can adding salt to drinking water help prevent dehydration this summer
उन्हाळ्यात पाण्यात चिमूटभर मीठ टाकून प्यावे का? डॉक्टर काय सांगतात वाचा….