कॉलेजच्या कॅ न्टीनमध्ये रोज वडा-पाव, मिसळ खाल्ल्याशिवाय आमच्या विनयचा दिवस पूर्ण होत नाही. सकाळी ८ वाजले- सूर्य डोक्यावर आला तरी आमच्या घरी उठाऊठ होतच नाही. कारण काय तर रात्री १२-१ वाजेपर्यंत टी.व्ही., कॉम्प्युटर यांच्या आहारी जाऊन कोणी झोपतच नाही. घरच्या आणि नोकरीच्या कामाच्या ताणामुळे अनिताला चाळिशीतच ब्लडप्रेशरचा त्रास सुरू झाला आहे. अशा अनेक तक्रारी आजकाल घरोघरी ऐकू येऊ लागल्या आहेत.
एकविसाव्या शतकात मानवाने विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात नेत्रदीपक प्रगती केली आहे. परंतु या प्रगतीमुळे माणूस खरोखर सुखी झाला आहे का, हा चिंतनाचा विषय आहे. आधुनिकीकरणाने मानवी जीवन अधिक सुकर झाले असले तरी सामाजिक स्वास्थ्यविषयक चित्र मात्र निश्चितच सुखावह नाही. कॅन्सर, एड्स, डायबेटीस, ब्लडप्रेशर, हृद्रोग यांसारख्या दुर्धर आजारांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.
‘कॅन्सर’ हे नाव ऐकताच रुग्ण व त्याचे नातेवाईक कोलमडून जातात. अशा वेळी रुग्णांचे शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उंचावण्याच्या दृष्टीने आयुर्वेदासारखे पुरातन वैद्यकशास्त्र निश्चितच उपयुक्त ठरू शकते.
कॅन्सरचा आयुर्वेदीय संहितांत त्या नावाने उल्लेख नसला, तरी आयुर्वेदीय संहितांमध्ये उल्लेख केलेल्या दुष्ट व्रण, दुष्ट ग्रंथी, दुष्ट अर्बुद, दुष्ट नाडीव्रण, दुष्ट विद्रधी, धातुगत – धातुपाक अवस्था यांचे कॅन्सरशी साधम्र्य आढळते.    
आयुर्वेदाच्या सिद्धांतानुसार कोणत्याही व्याधीचा विचार तीन टप्प्यांत केला जातो –
* हेतू म्हणजे व्याधीची कारणे.
* लक्षणे – व्याधीची विशिष्ट स्थानी व सर्व शरीरावर व्यक्त होणारी लक्षणे  
* औषधे – यात शोधन चिकित्सा (पंचकर्म); चूर्ण, गुटी-वटी, आसवारिष्ट अशी शमन औषधे चिकित्सा, रसायन चिकित्सा, पथ्यकर आहार-विहार व समुपदेशन यांचा समावेश होतो.
सामान्यत: कॅन्सर व्याधीस एकच निश्चित कारण नसून वेगवेगळ्या रुग्णांत वेगवेगळ्या कारणांचा समुच्चय हेतुभूत ठरतो असे आढळले आहे. यात प्राधान्याने अयोग्य आहार, अयोग्य विहार, व्यवसायजन्य कारणे, व्यसनांचे अतिरिक्त सेवन, आनुवंशिकता, मानसिक हेतू, अधारणीय वेगांचा अवरोध अशी अनेक कारणे आहेत.
आहारीय कारणांत  प्राधान्याने मिरचीसारख्या तिखट पदार्थाचे सेवन; पावभाजी, पाणीपुरी, रगडा पॅटिस यासारख्या जळजळीत म्हणजे विदाही पदार्थाचे सेवन; चिंच, टोमॅटो सॉससारख्या आंबट चवीच्या आहारीय पदार्थाचे सेवन; बासुंदी, श्रीखंड, पेढे-बर्फी, आईस्क्रीमसारख्या दुग्धजन्य व पचण्यास जड पदार्थाचे सेवन या गोष्टी वारंवार व अधिक प्रमाणात सेवन केल्या गेल्या तर कॅन्सरला हेतुभूत ठरू शकतात. याशिवाय तळलेले पदार्थ, मांसाहार, शिळे पदार्थ, आंबवलेले पदार्थ, बेकरी प्रॉडक्ट्स, प्रिझव्‍‌र्हेटिव्ह घातलेले पदार्थ, शीतपेये यांचाही अधिक वापर हा कॅन्सरला कारण ठरतो.
काही आहारीय पदार्थ दुसऱ्या आहारीय पदार्थात एकत्र करून सेवन केले तर ते शरीरावर अपायकारक परिणाम करतात, अशा मिश्र पदार्थाना आयुर्वेदात विरुद्धान्न अशी संज्ञा आहे. यात शिकरण, मिल्कशेक, दूध व मांसाहार अशा पदार्थाचा समावेश होतो. अशा विरुद्धान्नांचे सातत्याने व अधिक प्रमाणात सेवन कॅन्सरसारख्या अनेक व्याधींचे कारण होते. याशिवाय जेवणाची अनियमित वेळ, भुकेपेक्षा अधिक प्रमाणात आहार घेणे, त्या त्या ऋतूनुसार आहार न घेणे ही कारणेही अनेक रुग्णांत आढळतात.
अन्य कारणे
आहारीय कारणांशिवाय व्यायाम न करणे, दुपारी जेवल्यावर झोपणे, रात्री जागरण करणे अशी विहारातील कारणेही कॅन्सरला हेतुभूत ठरतात. या शिवाय फुप्फुसांचा कॅन्सर, मुखाचे कॅन्सर अशा काही विशिष्ट प्रकारच्या कॅन्सरमध्ये तंबाखू, मद्यपान, सिगारेट-विडी, गुटखा यासारख्या व्यसनांचे वारंवार सेवन, कापसाचे तंतू, विशिष्ट केमिकल्सशी सतत संपर्क, किरणोत्सर्गाशी वारंवार संबंध अशी कारणेही आढळतात. आयुर्वेदानुसार मल, मूत्र, अधोवात, क्षुधा, तृष्णा, निद्रा, िशक, ढेकर, जांभई, अश्रू या शरीराच्या नसíगक प्रवृत्तींना वेग अशी संज्ञा आहे. या वेगांची संवेदना निर्माण झाल्यावर त्यांचे पालन करणे हे आरोग्यास हितकर असते. वेग निर्माण झाले नसताच बळेबळे त्यांचे उदीरण करणे व निर्माण झाल्यावरही अन्य काही कारणांनी त्याचा अवरोध करणे ही सवय अनेक व्याधीप्रमाणेच कॅन्सरलाही कारणीभूत ठरू शकते. विशेषत स्तन, गुद, बीजाण्ड, आमाशय या अवयवांच्या कॅन्सरमध्ये आनुवंशिकता हेही कारण आढळते. सतत रागावणे, चिडचिड करणे, व्यवसायजन्य- कौटुंबिक- सामाजिक- मानसिक ताण अशी मानसिक कारणेही अनेक रुग्णांत आढळतात. वैद्यकीय सल्ल्याशिवाय दीर्घकाळ काही आधुनिक औषधांचे सेवनही कॅन्सरला हेतुभूत ठरू शकते.
उपरोक्त चुकीच्या गोष्टी ही कॅन्सरची सर्वसामान्य कारणे असली, तरी विशिष्ट अवयवांमध्ये निर्माण होणाऱ्या कॅन्सरची काही विशिष्ट कारणे असतात. त्यांचा विचार आपण लेखमालेतील पुढील भागांमध्ये करणार आहोत. यापुढील भागात आपण कॅन्सरच्या सर्वसामान्य लक्षणांची व चिकित्सेची माहिती घेऊ.