वर्गात तास सुरू होता. पण ‘त्या’चे मात्र शिक्षकांच्या शिकवण्याकडे मुळीच लक्ष लागत नव्हते. त्याला घाईने लघवीला जाणे भाग होते. मधुमेहामुळे त्याला अनेकदा तासांच्या मध्येच उठून शिक्षकांना ‘स्वच्छतागृहात जाऊ का,’ असे विचारावे लागायचे. पण मग सगळा वर्ग त्याच्याकडे बघायला लागायचा. शिक्षक पण कधी कधी चिडायचे. आता पुन्हा शिक्षकांना विचारावे का, ते आपल्याला ओरडतील का, की मग सगळी मुले आपल्याला हसतील, अशा विचारात तो तसाच वर्गात बसून राहिला. शेवटी व्हायचे तेच झाले, त्याला वर्गातच लघवीला झाली. त्याला एकदम रडायलाच आले, आत्ताच्या आत्ता घरी पळून जावे आणि परत कधीच शाळेत येऊ नये असे वाटू लागले.. लहान मुलांमधील मधुमेह आणि त्याच्या परिणामांमुळे येणारे मानसिक दडपण याविषयी सांगताहेत मधुमेहतज्ज्ञ डॉ. सतीश नाईक.

पालकांनाच समुपदेशनाची गरज! – अगदी लहान मुलांमध्ये दिसणाऱ्या ‘टाइप- १’ मधुमेहाचे प्रमाण आपल्याकडे कमी आहे. पण तरीही जर बालवाडीतल्या किंवा शाळेत जाणाऱ्या लहान मुलांना मधुमेह असेल तर त्या आजाराचा ताण त्या मुलांपेक्षा अधिक पालकांनाच असतो. अशा मुलांच्या बाबतीत पालकांचे वर्तन टोकाचे असते. ते मुलांची अतीच काळजी घेऊ लागतात. सतत मुलांना ‘हे करू नकोस, ते करू नकोस,’ अशी दटावणीही सुरू होते. त्यामुळे मुलांमधील बंडखोर वृत्ती जागी होते. मधुमेहाचे इंजेक्शन घ्यायला नकार देणे किंवा आईस्क्रीमसारखे गोड पदार्थ खायचा हट्ट करणे हा त्या बंडखोरीचाच एक भाग. ही बंडखोर वृत्ती आणि पालकांचे अतिकाळजी घेणे यातून घरात तक्रारीला सुरुवात होते.

children holidays, holidays, Parents worry,
सांदीत सापडलेले : सुट्टी!
chaturang article, maintain relationship, good relations, avoid assuming, assuming in relationship, assume, stay away from toxic people, spreading bad thoughts in relationship, husband wife
जिंकावे नि जगावेही : नात्यांमधला नीरक्षीरविवेक!
Maharashtra Board Class 10th and 12th Result 2024 Date Time in Marathi
१०वी १२वीच्या निकालासंदर्भात मोठी बातमी! ‘या’ तारखेला निकाल लागण्याची शक्यता; कसा पाहाल? जाणून घ्या
why Sleeping Pills Rising Among Young Adults
झोपेच्या गोळ्या निद्रानाशावरचा अंतिम उपाय आहेत का? झोपेच्या गोळ्या शक्यतो घेऊ नका असं डॉक्टर का सांगतात?

शिक्षकांनो समजून घ्या – ज्या मधुमेही मुलांची रक्तातील साखर नियंत्रणात राहात नाही तर त्यांना दैनंदिन जीवनात काही अडचणी येऊ शकतात. या मुलांना सारखे पाणी प्यावेसे वाटणे, थोडय़ा- थोडय़ा वेळाने लघवीला जावेसे वाटणे सहाजिक आहे. ज्यात इन्शुलिनची इंजेक्शने घ्यावी लागत नाहीत, अशा ‘टाइप-२’ मधुमेहातही मुलांना एकदम तातडीने लघवीला जावे लागू शकते. मुलाचे सारखे पाणी प्यायला जाणे किंवा तासाच्या मध्ये त्याने स्वच्छतागृहात जाण्यासाठी शिक्षकांकडे परवानगी मागणे हे शिक्षकांना खटकू लागते. अशा वेळी पालकांनी मुलाच्या आजाराबद्दल शिक्षकांशी सविस्तर बोलणे गरजेचे ठरते. त्याला मधुमेह आहे हे वर्गासमोर वारंवार अधोरेखित न करता त्याला पाणी पिण्याची, स्वच्छतागृहात जाण्याची किंवा इन्शुलिनचे इंजेक्शन घेण्याची गरज असल्यास ते घेण्याची सोय उपलब्ध करून देता येणे सहज शक्य असते. जेवणाची सुटी झाल्यावर भर वर्गात मूल इन्शुलिनचे इंजेक्शन घेऊ शकत नाही. पण त्याची ही अडचण समजून घेऊन त्याला हे इंजेक्शन शिक्षकांच्या खोलीत किंवा अशाच एखाद्या सुरक्षित आणि खासगी जागी जाऊन घेण्याची मुभा द्यावी.

खाण्याबद्दलच्या हट्टावर उपाय आहे – लहान मुले खूप समजूतदार असतात. आपण अपथ्य करणे बरोबर नाही हे त्यांना समजावून दिल्यास ती ते पाळतात, असा अनुभव आहे. पण खायला देताना त्यांना निवडीचे स्वातंत्र्य दिलेले आवडते. मधुमेही मुलांनी किती वेळाने खायला हवे, त्यांनी काय खावे, गोड खाण्याबद्दलचे पथ्य कसे पाळावे याविषयी पालक आणि मुलांनी एकत्रितपणे आपल्या डॉक्टरांशी सविस्तर बोलून घ्यायला हवे.  http://www.calorieking.com, http://www.acaloriecounter.com, http://www.diabetesindia.com/diabetes/indian_food_exchge.htm  अशा संकेतस्थळांवरदेखील पालकांना मुलांच्या खाण्याबद्दलचे विविध पर्याय बघायला मिळतील. शाळांमधील उपाहारगृहांमध्ये आरोग्याला हितकारक पदार्थ उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. मुले ‘हेल्थी’ समजल्या जाणाऱ्या पदार्थाची निवड करणार नाहीत हा गैरसमज असल्याचे परदेशात झालेल्या काही अभ्यासांमधून सिद्ध झाले आहे.    
     
भावनिक दडपण – पौगंडावस्थेतील मधुमेही मुलांच्या समस्या वेगळ्या असतात. या वयात देहभान आलेले असते, बंडखोरी वाढलेली असते आणि आई- वडिलांपेक्षा मित्रांचा ओढादेखील वाढलेला असतो. या वयातील ५० टक्के मधुमेही मुले आपल्याला मधुमेह आहे हे मित्रांपासून लपवत असल्याचे बघायला मिळते. मित्रांना कळू नये म्हणून स्वच्छतागृहात जाऊन इन्शुलिन घेणे किंवा इन्शुलिन घेण्याचेच टाळणे, असेही ही मुले करतात. याउलट मित्रांना मधुमेह असल्याचे सांगितल्यास अनेक गोष्टी सोप्या होतात. मैदानी खेळ खेळणे, व्यायामशाळेत जाणे यासाठी मित्रांची ‘कंपनी’ मिळते. रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठीचे उपाय लपूनछपून करावे लागत नसल्यामुळे मधुमेह नियंत्रणात राहण्यास मदत होते. वयात येणाऱ्या मुलांच्या शरीरात ‘ग्रोथ हॉर्मोन्स’ वाढतात. ही संप्रेरके इन्शुलिनचा प्रभाव कमी करणारी असतात. त्यामुळे या वयात इन्शुलिनचे प्रमाण कमी-जास्त करण्याची वेळ अनेकदा येऊ शकते. हे पालकांनी लक्षात घेऊन मुलांनाही समजावून सांगायला हवे. मधुमेह झालेल्या मुलांच्या रक्तातील साखर सारखी सारखी कमी होत राहिली तर त्यांच्या मेंदूच्या आणि एकूणच वाढीवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते. यातून मुलांना स्वत:च्या व्यक्तिमत्त्वाबद्दल न्यूनगंड निर्माण होऊ शकतो किंवा मूल अभ्यासात थोडे मागे पडत असेल तर त्याला नैराश्य येते. पण मित्रमंडळींना या मुलांच्या मधुमेहाबद्दल माहिती असल्यास हे चित्र निश्चितपणे बदलू शकते.

जास्त कॅलरीज असलेला आहार मधुमेह होण्यासाठी कारणीभूत ठरतो असा एक समज आहे. पण तो पूर्णत: खरा नाही. केवळ अधिक कॅलरीजच नव्हे तर तुम्ही नेमके काय खाता यावरही तुम्हाला मधुमेह होण्याचा धोका किती हे अवलंबून असते, असे डेन्मार्कमध्ये झालेल्या एका अभ्यासात समोर आले आहे.